Saturday, May 16, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३० –

इतर साधनांमध्ये उपाधींमुळे थोडी तरी चलबिचल आहे. पण नाम हे स्थिर आहे.

श्रीराम!
साधी सोपी व्याख्या देण्यात ज्यांचा हात कुणीही धरू शकत नाही असे म्हणजे श्रीमहाराज! परमार्थाबद्दलच्या वाचन – श्रवणात अनेक ठिकाणी ‘उपाधि’ हा शब्द येतो. त्याची व्याख्या करताना महाराज म्हणतात, “भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधि होय.” या व्याख्येचे वैशिष्ट्य असे की एकाच फटक्यात बाधक गोष्टी सगळ्या साधनबाह्य होऊन जातात! आणि त्यामुळे साधनात केवळ एक विधिनिषेध उरतो, विधी ते स्मरण, निषेध ते विस्मरण! आणि हाच मुद्दा श्रीमहाराज वरच्या वचनात सांगत आहेत.

जोवर कोणत्याही प्रकारची देह मन बुद्धीची उपाधि आहे, तोवर स्वस्वरूपापासून जीव दूर आहे. कारण,
उपाधि म्हणजेच अस्थिरता
उपाधि म्हणजेच विषयांची समीपता
उपाधि म्हणजेच भटकंती.

उपाधीचे अस्तित्व मायेमुळे आहे हे जरी खरे तरी कालच्या चिंतनात आपण बघितले त्याप्रमाणे आपल्याला मायेलाच हाती धरून, या मायिक देह मन बुद्धीकडूनच साधन करवून घेऊन त्या माये पल्याडच्या आपल्या घरी पोचायचे आहे. आणि बाकीच्या सर्व साधन पद्धतींमध्ये हाच मुद्दा उचलून धरला जातो. जसे, तुम्हाला योग साधन करायचे असेल तर हा देह अतिशय सदृढ आणि पवित्र ठेवावा लागेल. मनाच्या विचारांवर ताबा आणावा लागेल. हे सर्व करून आपल्याला भगवंताभिमुख किंवा स्वरूपाभिमुख राहायचे आहे. हा मार्ग किंवा कोणताही मार्ग चुकीचा कधीच नसतो, किंबहुना साधला तर योग मार्ग अत्यंत परिणामकारक आहे हे आपल्याला ज्ञानेश्वरीच्या सहाव्या ध्यानयोगात सहज लक्षात येते. मग चलबिचल होते असे जे श्रीमहाराज म्हणतात ते कशामुळे असा प्रश्न पडणे साहजिक आहे.

परमार्थ मार्गात जे जे मार्ग आहेत, त्या सर्वांना ‘मार्ग’ किंवा ‘साधन’ म्हणून संबोधले आहे. साधन जे असते ते साध्य असेलच असे नाही. जसे योग, प्राणायाम करून आपण आपल्या प्राणांवर ताबा आणला. पण हे कशासाठी करायचे? तर या योगे आपल्याला त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचता यावे, अखंड समाधान या ‘अवस्थेप्रत’ आपल्याला पोहोचता यावे. आपले जगणे सहज व्हावे. कोणत्याही अंतर्गत अथवा बाह्य विरोधाशिवाय आपल्याला जगता यावे. आपले हवेनाकोपण शून्य व्हावे. म्हणजेच बाकीच्या मार्गांमध्ये जी साधने आहेत ती साध्य मिळाल्यावर विसर्जित होतात वा त्यांचे महत्त्व उरत नाही. याचाच अर्थ साध्याकडे घेऊन जाणारी असली तरी देखील ती उपाधीच होय! जसे, पायात काटा रुतला तर दुसऱ्या काट्याने तो काढला तरी रुतलेला काटा निघाल्यावर दोन्ही काटे जसे आपण फेकून देतो, तसे कोणतीही उपाधीयुक्त गोष्ट जर असेल तर त्यात न अडकता आपल्याला केवळ तिचा उयोग करून घ्यायचा आहे हे भान सदोदित ठेवणे जरूर आहे. पण तसे होताना बहुधा दिसत नाही. कारण ‘भगवंत किंवा स्वरूप स्मरण’ हे एकमेव साध्य आहे याचा विसर पडतो. स्थूलमानाने विपरीत वाटेल परंतु सध्या जगभर जे योग किंवा प्राणायामाचे ‘क्लासेस’ चालतात, त्यांचा सर्वांना ‘कायमचे समाधानी’ होण्यासाठी उपयोग का होत नाही? याचे कारण इथे आहे. बहुतांश लोक त्या योग-प्राणायामाकडे तेच साध्य अशा दृष्टीने बघू लागले, त्यामुळे त्यातून साधायचे काय हे बाजूला राहिले व साध्य डोळ्याआड झाल्यामुळे “अखंड समाधान” साधलेच नाही. यालाच श्रीमहाराज इतर साधनांमध्ये उपाधींमुळे असलेली चलबिचल म्हणतात.

आता वचनाचा दुसरा भाग, जो अत्यंत महत्त्वाचा आहे - “नाम स्थिर आहे.” श्रीराम त्रेतायुगात अवतार समाप्ती करण्यास निघाले, तेव्हा त्या सुकुमार सगुण रूपावर आत्यंतिक प्रेम करणारे दास-शिरोमणी हनुमंत म्हणाले, जानकी मातेकडून मला जे अजर – अमर होण्याचे वरदान मिळाले आहे, ते मी समर्पित करू इच्छितो व तुमच्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा करुणानिधान श्रीराम म्हणाले, असे तुला करता येणार नाही. नामाचा महिमा किती थोर आहे हे तू जाणून आहेस; पुढे कलियुगात जेव्हा अंधकाराचे साम्राज्य पसरेल, लोक अनीतिला नीति समजू लागतील, तेव्हा याच ‘नामाने’ तुला भक्तीमार्गातील पथिकांना तारायचे आहे; कारण देह अंतर्धान पावला तरी नाम मात्र स्थिर आणि शाश्वत आहे! तेव्हापासून हा एकच ध्यास धरून हनुमंत अनंत संतांच्या रूपात रामनामाचा महिमा गात आहेत. द्वापाराच्या शेवटी अवतार समाप्तीच्या वेळी देखील श्रीकृष्णांनी हेच सांगितले की माझ्या सर्व शक्ती मी नामात ठेवून जात आहे. मी नामरूप आहे!

नाम हे साक्षात भगवत् रूप असल्यामुळेच “पूर्ण” आहे. “स्वयंभू” आहे. त्याला कोणत्याही आधाराची वा टेकूची जरूर नाही. नाम हे “नामाच्याच खऱ्या दर्शनापर्यंत” घेऊन जाणारे साधनही आहे व तेथे पोहोचल्यावर सर्वार्थाने दिव्य भव्य असे तेच साध्य आहे, ही अनुभूती देणारे आहे. आणि असे असल्यामुळेच ते कोणत्याही उपाधीपासून दूर आहे. किंबहुना सर्व उपाधि जिथे संपतात तिथे नामाचा खऱ्या अर्थाने उदय होतो. म्हणूनच केवळ नामातच या देहाचा व देहाला लागलेल्या सर्व नश्वरतेचा विसर पाडण्याचे सामर्थ्य आहे. आणि देहबुद्धीचा विलय जिथे झाला तिथेच स्थिरता आहे. असा हा नामाचा सरळ आलेख आहे. इतर साधनात असलेले खाचखळगे नामसाधनात येणार नाहीत, जर साधक खऱ्या अर्थाने नामाला वरेल; पण त्यासाठी नामाशी आत्यंतिक विकल्परहित अनन्यतेची गरज आहे. “पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी” अशी न डगमगणारी अनन्यता ज्याची नामाशी जुळेल, त्याचे याच आयुष्यात कोटकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा भरवसा श्रीमहाराज आपल्याला पदोपदी देताना दिसतात; गरज आहे ती फक्त ‘आम्ही उपाधीत अडकतो आहोत’ हे जाणण्याची व त्यातून शक्य तितक्या त्वरेने बाहेर पडून, सहज सरळ आयुष्याचे नामस्मरण हे ध्येय बनवण्याची!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. हे एकच चिंतन सगळे सांसारिक आणि त्याहीपेक्षा तथाकथित पारमार्थिक पाश दूर करण्यासाठी पुरेसे आहे!
    श्रीराम समर्थ!!!

    ReplyDelete