Friday, May 22, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३६ –

सावधानता ठेवून नाम घ्यावे. नामाची सतत धार धरावी म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोचते.

श्रीराम!
गेल्या सहा सात वचनांमध्ये श्रीमहाराजांनी आपल्याला नाम वृत्तीपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व विषद केले. आता त्यांना जणू म्हणायचे आहे की तुम्हाला महत्त्व पटले असे मी समजतो; आता काय करायला पाहिजे ते सांगतो. आज महाराज आपल्याला Practical Approach शिकवत आहेत. असे वाटते, जणू सद्गुरू शिष्याला समोर बसवून आता तू तुझा साधक दिनक्रम कसा आखावा याचे एकंदर चित्र तयार करून समोर ठेवत आहेत.

पूज्य रामानंद महाराजांना अत्यंत कठीण असे ‘असिधारा व्रत’ देऊन तीर्थाटन, अखंड मौन आणि मुखाने केवळ नामस्मरण यांची आज्ञा करताना श्रीमहाराजांनी जसे कडक नियम आखून दिले, तसे आम्हाला आखून दिलेले नाहीत महाराजांनी. केवळ एक नियम सांगितला आहे, नामाची सतत धार! आणि यासाठी सांगितली सावधानता! कसे आहे, जेव्हा आम्ही पूज्य रामानंद महाराजांसारख्या, पू प्रल्हाद महाराजांसारख्या सत्पुरुषांची चरित्रे वाचतो, तेव्हा आम्हाला गलबलते, त्यांच्या पायी मस्तक नमवावे वाटते, याचे कारण त्यांनी गुरुनिष्ठा दृढ राखून गुरुआज्ञेचे केलेले तंतोतंत पालन! आता जर आम्ही ‘त्यांची गोष्ट वेगळी, आमची वेगळी’ अशी पळवाट धरली तर मात्र ते दुर्दैव ठरेल. श्रीमहाराजांच्या कृपाशीर्वादाची, त्यांच्या अलोट प्रेमाच्या अनुभूतीची ज्याला मनापासून तीव्र इच्छा असेल, त्याच्या मनात हा विचार येणार नाही. तो फक्त याचाच विचार करेल की हे जे थोर सत्पुरुष श्रीमहाराजांच्या आज्ञेत राहून पोचले त्यांनी काय केले व तसे करण्यासाठी मला काय करणे आवश्यक आहे.

नामाची संतत धार लागण्यासाठी ज्या सावधानतेचा उल्लेख श्रीमहाराज करीत आहेत, ती सावधानता कोणती हे लक्षात घेताना श्रीमहाराजांनी पूज्य रामानंद महाराजांना सांगितलेली नऊ सत्शिष्याची लक्षणे बघावी असे वाटते. ज्या योगे ही लक्षणे अंगी बाणवता येतील ते करणे आणि ज्या योगे यापासून आपण दूर जाऊ ते टाळणे यालाच सावधानता म्हणता येईल. पूज्य रामानंद महाराजांच्या चरित्रात वर्णन आहे, जेव्हा श्रीमहाराज तीर्थाटनास निघण्यापूर्वी त्यांना ही लक्षणे सांगत होते, तेव्हा यांचा संबंध आचरणाशी कसा लावावा हाच विचार पूज्य रामानंद महाराज करीत होते. म्हणून महाराज म्हणतात, सर्व परमार्थ आचरणाशी संबंधित आहे.

श्रीमहाराजांनी सांगितलेली सत्शिष्यांची नऊ लक्षणे म्हणजे –

(१) सन्मान मनी इच्छू नये| झाला तेथे थांबू नये| परेच्छेने घेऊ नये प्रथम लक्षण शिष्यांचे|| (कोठे मानसन्मान होत असेल तर तो कटाक्षाने टाळणे)

(२) कोणाही भूताचा मत्सर| मनाने न करावा क्षणभर| जाणावे द्वेष-मत्सर महा घोर शत्रू थोर| द्वितीय लक्षण शिष्याचे|| (कोणाबद्दल द्वेष मत्सर नसणे)

(३) सच्छिष्य आळस दूर फेकी| जवळ येऊ न दे जरा की| कारण तो महापातकी| तिसरे लक्षण शिष्याचे|| (साधनेत आळसाला थारा न देणे)

(४) अहंमन्यतेने घेतल्या ठाण| शिष्य सर्वस्वी बुडाला जाण| दूर राही शिष्य यापासोन| चौथे लक्षण शिष्याचे|| (अहंभावनेचा - कर्तेपणाचा वाराही न लागू देणे)

(५) सद्गुरूठायी अधिकाधिक प्रेम| सेवेचा उल्हास वाटे परम| तो जाणावा शिष्य सर्वोत्तम| पाचवे लक्षण शिष्याचे|| (चित्त परमार्थ साधनेत गळून जाणे – चित्त चित्तरूपाने न उरणे – चित्त सद्गुरुंमध्ये विरघळून जाणे)

(६) सद्गुरूठायी निश्चल श्रद्धा| ढळविल्याही ना ढळे कदा| तोची सत्शिष्य विशुद्धा| सहावे लक्षण शिष्याचे|| (बुद्धिभेद कदापि न होता कोणत्याही परिस्थितीत सद्गुरूंच्या ठायी श्रद्धा न ढळणे)

(७) परमार्थाची अति प्रीति| उत्तरोत्तर अति तीव्र ती| कृपायोग्य ती शिष्यमूर्ती| सातवे लक्षण शिष्याचे|| (नित्य वाढतच जाणारी परमार्थाची प्रीति)

(८) खरा खरा तो शिष्यवर| असूया नसे ज्या तिळभर| अनसूयेचे माहेरघर| आठवे हे लक्षण|| (कुणाशीही लौकिक वा पारमार्थिक बाबतीत असूया तिळमात्र नसणे)

(९) बुद्धी वेदशास्त्र पारंगत ऐसी| सच्छिष्य न करी वाद कोणासी| करी सत्य पवित्र नम्र भाषणासी| नववे हे शिष्य लक्षण|| (शास्त्रांमध्ये पारंगत असूनही चुकूनही कुणाशी वादविवाद न करणे व लीनता अंगी बाणवणे)
(संदर्भ : श्री रामानंद कल्पतरू)

थोडक्यात श्रीमहाराज आपल्याला काय केले म्हणजे आमची सावधानता टिकेल याचा स्पष्ट संकेत यातून करत आहेत. जसे तुकाराम महाराज म्हणाले, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी|” कारण आमची मुख्य बाधाच कुपथ्याची आहे. कुपथ्य टाळले की पारमार्थिक चिदारोग्य आमची वाटच पहात आहे.

ही सावधानता अखंड बाळगून जो तैलधारावत नामस्मरण सांभाळेल त्याचे नाम वृत्तिपर्यंत निश्चित पोहोचेल अशी ग्वाही श्रीमहाराज आजच्या वचनात देत आहेत आणि वृत्तिपर्यंत नाम पोहोचले की काम झाले. श्रीमहाराज एकीकडे म्हणतात, वृत्ति या बेंबीपाशी साठलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा महाराज तैलधारावत नाम सांगत आहेत, ते नाम असे बेंबीच्या देठापासून – अगदी आर्ततेने घेतलेले असेल, सद्गुरूंच्या प्रति पूर्ण निष्ठेने घेतलेले असेल तर ते नाम या जागी साठलेल्या वृत्तींपर्यंत पोचून वृत्तीच नाममय – स्मरणमय होतील. मग ज्या काही मनाच्या वृत्ति उठतील त्या नामाला घेऊनच उठतील व नामीच्या स्मरणात उठणाऱ्या वृत्ति या त्या सत् चित् स्वरूपाकडे घेऊन जाणाऱ्याच असतील. फक्त त्यासाठी एकच करणे आवश्यक आहे; जसे समर्थ म्हणतात,

“सद्गुरुवचन तोचि वेदांत|
सद्गुरुवचन तोचि सिद्धांत|
सद्गुरुवचन तोचि धादांत|
सप्रचीत आता||”
त्यापलीकडे बघण्याची आवश्यकताच नाही. हे करणे आम्हाला शक्य होवो हीच त्या अनंतकोटी ब्रह्मांडनायकाच्या चरणी प्रार्थना!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. श्रीराम! आजच्या चिंतनाने नामसाधकासाठी नऊ सोपान मांडून कळस गाठला आहे. अनेकानेक धन्यवाद आणि शत शत नमन! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete