Sunday, May 10, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २४ –

एखाद्या माणसाला सांगितले की, ‘तू आपल्या इंद्रियांशिवाय आणि रंगाशिवाय ये,’ तर त्याला येताच येणार नाही. तो जेथे आहे तेथे त्याची इंद्रिये आणि रंग ही असणारच. हे जसे, त्याचप्रमाणे जेथे नाम आहे तेथे संत-संगति आणि भगवंत ही असतातच. नाम, संत आणि भगवंत ही एकमेकांला लागूनच आहेत.

श्रीराम!
श्रीमहाराजांची बहुतेक सर्व वचने ही statement सारखी असतात. म्हणजे निश्चित विधान. ते तसेच असणार. जसे समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकांत, ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?’ हे एक सर्वमान्य विधान आहे. हे असेच असणार! तद्वत वरच्या श्रीमहाराजांच्या वचनात ते आपल्याला एक असे त्रिकालात, त्रिभुवनात, कोणत्याही परिस्थितीत, कशाही अवस्थेत सत्य असणारी एक गोष्ट सांगतात. एकच परम तत्त्व भक्तीच्या विलासासाठी वेगळेपणाने तीन रूपात वावरते. ती तीन रूपे म्हणजे नाम, संत (भक्त) आणि भगवंत! तीनही एकच आहेत हे परम सत्य आहे; परंतु पराभक्ती आपल्या हृदयीचा आनंद प्रकट करण्यासाठी त्या परम तत्त्वाला वेगवेगळ्या रूपात नटवते.

त् रूप परमात्मा जेव्हा विश्वात कार्य करू लागतो तेव्हा त्यास भगवंत असे संबोधतात. त्याच भगवंताच्या आनंदात त्याचेच नाम, रूप, लीला, गुणांचे भंडार सामावत नाही, तेव्हा त्याचा विलास करून या धरेवर त्याचा आनंद लुटण्यासाठी व जे या आनंदाला विसरले आहेत अशा जनांमध्ये त्याची आठवण जागवण्यासाठी संतांचा जन्म होतो. आणि या संतांच्या जन्माचे प्रतीकच जणू म्हणून भगवंताच्या नामाचा विलास या भूमीवर होतो. श्रीमहाराज म्हणतात, “नाम हे मूलद्रव्य आहे. जगतामध्ये परमात्माच भरलेला आहे; म्हणून जगामधल्या यच्चयावत वस्तूंचे मूलद्रव्य एकच आहे. अनेक रूपे आली आणि गेली तरी ते मूलद्रव्य कायम राहते म्हणून नाम श्रेष्ठ आहे. भगवंताची रूपे जिथून येतात तिथे नामाचे वास्तव्य आहे. रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. याचाच अर्थ भगवंत आणि त्याचे नाम यात भेद नाही.”

त्यामुळेच जेथे भगवंताचे नाम आहे तेथे भगवंत आहेच हे तार्किक दृष्ट्या देखील सिद्ध होते. आणि नाम हा संतांचा खुराक आहे. संत आहे आणि नामाचे प्रेम नाही हे शक्यच नाही, कारण संत म्हणजे ज्याला भगवंताचे प्रेम आहे आणि सगुण-निर्गुणाला सांधणारे असे एक भगवंताचे नामच आहे. संत तुलसीदास म्हणतात,
नाम रूप गति अकथ कहानी| समुझत सुखद न परति बखानी||
अगुन सगुन बिच नाम सुसाखी| उभय प्रबोधक चतुर दुभाषी||
-- नाम आणि रूप यांच्यातला संबंध सांगता येण्याजोगा नाही. ते समजण्यास सुखदायक आहे; परंतु त्याचे वर्णन करता येण्यासारखे नाही. मात्र एक निश्चित की, भगवंताच्या सगुण व निर्गुण रूपांमध्ये नाम हाच सुंदर साक्षीदार आहे आणि दोन्हीचे यथार्थ ज्ञान करवून देणारा चतुर दुभाषी आहे.

म्हणूनच जेथे भगवंताचे नाम आहे तेथे संतांचे वास्तव्य आहे, कारण हे नामच त्यांना त्यांच्या आराध्याशी जोडते. खरे तर उलट म्हटले पाहिजे; की जेथे संत आणि त्यांच्या हृदयात विलसणारे नाम आहे तेथे भगवंत आहेतच. त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा नाही.

संत ते, ज्यांना राहण्यासाठी केवळ एकच विश्रांतीस्थान असते आणि ते म्हणजे भगवंताचे नाम! आणि तेच नाम त्यांना अशा रीतीने व्यापून टाकते की सबंध विश्वात केवळ नामच व्यापून राहिले आहे असा स्पष्ट अनुभव त्यांना येतो व म्हणूनच ‘हे विश्वचि माझे घर’ ही त्यांची आत्मानुभूती असते! भगवंतांच्या हृदयात अशा भक्तांचे स्थान काय असते हे ज्ञानेश्वरीच्या बाराव्या भक्तियोगात ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
हे विश्वचि माझे घर| ऐसी मती जयाची स्थिर|
किंबहुना चराचर| आपणचि जाहला || (तो भक्त - संत नामरूपच झाला)
मग याहीवरी पार्था| माझ्या भजनी आस्था| (नामरूप अवस्थेला पोहोचल्यावर देखील तो नाम संकीर्तनच करतो आहे – तेच त्याचे सर्वस्व आहे, असा)
तरी तयाते मी माथां| मुकुट करी|| (त्याला मी मुकुटाप्रमाणे मस्तकावर धारण करतो)
पुढे म्हणतात, ‘तयाची टाच धरू| हृदयी आम्ही||’- अशा ज्ञानी भक्ताचे चरण मी हृदयात धारण करतो म्हणतात भगवंत!

त्यामुळेच महाराजांचे विधान या गोष्टीला पुष्ट करते की संत, भगवंत आणि नाम हे एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. याचे साधन दृष्ट्या अनन्य महत्त्व आहे. जो साधक मनापासून सद्गुरूंनी दिलेल्या नामात राहील, त्याला संतसंग मिळवून देण्याची व्यवस्था महाराज करतील हे त्रिवार सत्य आहे. कारण हे अत्यंत स्वाभाविक आहे म्हणतात महाराज. पवित्र अंतःकरणाने नाम जपणाऱ्या साधकापासून संतच दूर राहू शकत नाहीत कारण नामात भगवंताचे असलेले वास्तव्य त्यांना सहजीच खेचून आणते! आणि या भूतली संतांपेक्षा श्रेष्ठ दुसरे कुणीही आणि काहीही नाही; कारण तो परमात्माच विषयात तल्लीन असलेल्या सामान्य जनांना “आपल्या घराची” आठवण करून देण्यासाठी संतरूप घेऊन जीवांचा उद्धार करतो!

हे ज्याने खरे खरे ‘मानले’ त्याचे नाम हेच आयुष्याचे सर्वस्व बनेल यात काय नवल?

||श्रीनाम समर्थ||  




1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete