Wednesday, May 6, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २० –

एक मुलगा घरातून पळून गेला. तेव्हा त्याची आई म्हणाली, ‘तो कुठेही राहू दे पण खुशाल असू दे.’ तसे तुम्ही कुठेही रहा पण नामात असा.

श्रीराम!
श्रीमहाराज म्हणायचे, लौकिक जगात मला एका आईच्या प्रेमाची कल्पना आहे. निस्वार्थतेच्या जवळ जाणारे असे एक आईचे नाते आहे म्हणत. आणि अनेकदा जेव्हा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांचा जीव कळवळायचा तेव्हा म्हणायचे, माझा देह पुरुषाचा आहे पण हृदय स्त्रीचे आहे! त्यामुळेच सद्गुरू माऊली म्हणतो आपण. माऊली म्हणण्यात रहस्य काय आहे, तर आईला आपल्या लेकराबद्दल ‘त्याचे हित व्हावे’ यापरता स्वार्थ नसतो. आईची प्रत्येक कृती ही आपल्या लेकराला सुख कसे मिळेल या दृष्टीने असते. मुलगा किंवा मुलगी जर नीट वागत नसतील तर आई जे रागावते, तो तिचा क्रोध देखील आपल्या बाळाला पुढे जगात कुणी नावे ठेवू नये, त्याचे आयुष्य चांगले जावे यासाठी असतो.

हे जसे या जगातील आईचे खरे, तसे सद्गुरू माऊली तर आपली जन्मोजन्मीची माता आहे. किंबहुना माता व पिता हे दुहेरी दिव्य नाते सद्गुरू निभावतात. आईची माया आणि पित्याच्या नजरेने आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याची चाचपणी ते करत असतात. याच जगात नव्हे तर त्रिभुवनात माझ्या बाळाची सुकीर्ती व्हावी, म्हणजेच शिष्याला कुणीही कमी लेखू नये यासाठी त्यांचा आटापिटा असतो. पूज्य बाबा बेलसरे प्रवचनात सांगायचे. “श्रीमहाराजांना आपल्या माणसाचा अभिमान फार; ‘माझा माणूस आहे तो’ असं म्हणायचे!” इतकी आत्मीयता असलेल्या सद्गुरूंना आपल्या अंतिम कल्याणाचीच तळमळ असणार यात काय नवल?

मुले म्हटल्यावर कधीतरी नको ते वागणारच हे जसे आईला माहित असते, तसेच सद्गुरूंना देखील ‘हे अज्ञानी आहेत’, हे असेच वागणार याची पूर्ण जाणीव असते आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमात कमी होत नाही. संत जन भगवंताच्या प्रेमापेक्षा जास्त मान सद्गुरू प्रेमाला देतात याचे कारण हेच. भगवंताचे प्रेम बापासारखे आहे म्हणतात; जर मूल चिखलात खेळून घाण झाले तर बाप म्हणतो, स्वच्छ होऊन ये, मग मी कडेवर घेतो. मग आई त्या मुलाला चिखलाने भरलेल्या अवस्थेतच उचलते, स्नान घालून स्वच्छ करते आणि मग बाप त्याला कडेवर घेतो. तसे संत सद्गुरू माऊली विकारांनी बरबटलेल्या आमच्यासारख्यांना नामाचे – साधनेचे – सत्संगाचे स्नान घालून स्वच्छ करतात; म्हणजेच भगवद्दर्शनासाठी तयार करतात! श्रीमहाराज उपमा देताना म्हणायचे, 'लहान मुलाचं डोकं भादरलं म्हणजे कसं खरखरीत होतं तसं भगवंताचं प्रेम आणि कोवळ्या लेकराचं कुरळं जावळ म्हणजे गुरुचं प्रेम!'

मुलगा जेव्हा वागू नये तसे वागतो तेव्हा आईच्या जीवाला वेदना या होतातच; परंतु तिच्या वेदनेमागे या अशा वागण्याने आपल्या मुलाला त्रास होईल हा भाव जास्त असतो. वरच्या वचनात महाराज म्हणताहेत, मुलगा पळून जरी गेला तरी शेवटी आई म्हणते, कुठेही राहू दे पण खुशाल असू दे. इथे या जगातील आईला खुशाली म्हणजे त्याच्या देहाची काळजी जास्त अपेक्षित असते. पण पुढच्या ओळीत जेव्हा महाराज म्हणतात, कुठेही रहा पण नामात रहा; यामागे गुरूला आपल्या मनबुद्धीची जास्त काळजी आहे. महाराज म्हणतातच, बुद्धिभेदाला अतिशय अनुकूल वातावरण सध्या आपल्या आजूबाजूला आहे. ‘कसले नाम, कसले साधन; थोडे आयुष्य आहे, मजा करून घ्या’ अशा विचारसरणीचे लोक आजूबाजूला जास्त आहेत. हाच कलियुगाचा परिणाम आहे. त्यातून तात्पुरते सुख मिळाल्यासारखे वाटते पण मनुष्य अशाश्वताच्या भोवऱ्यात सापडून, नश्वर देहाला सर्वस्व मानून आपली दुर्गती करून घेत आहे हे विदारक सत्य संतांना सहन होत नाही. म्हणून श्रीमहाराज सावध करतात.

अनेक ठिकाणी महाराज म्हणतात, तुम्ही प्रपंचात रहा पण कसे? पोहताना जसे तेल लावून पाण्यात उतरले तर अंग भिजत नाही तसे नामाचे तेल लावून तुम्ही प्रपंच करा. प्रपंच सोडा म्हणून मी सांगत नाही, तसे सांगितले तर कुणी सोडणारही नाही; पण जर तुम्ही भगवंताच्या स्मरणात तो केलात तर त्याचे सुखदुःख तुम्हाला बाधणार नाही व तुम्ही कर्मबंधनातून मुक्त व्हाल हेच महाराजांचे सांगणे आहे. ‘खुशाली’ हा शब्द केवळ तिथेच लागू होतो, जेव्हा जीव भगवद्स्मरणात स्वतःला विसरला, त्याला मीपणाचा विसर पडला.

यातून अजून एक महाराजांना सुचवायचे असावे की साधन करताना जे अनेक विकल्प किंवा बाधा येतात, जसे नाम घेताना आजूबाजूला आवाज असणे, कुणीतरी येणे, आपल्याच मनात विचार सुरु असणे, प्रापंचिक परिस्थितीत बिघाड होणे इत्यादी. महाराज म्हणतात, या गोष्टींनी तुम्ही विचलित व्हाल जर नाम मुखात नसेल. मात्र अशा कोणत्याही स्थितीत तुम्ही असा पण जर नाम मुखात असेल तर सर्व बाधा असूनही त्यांचा परिणाम तुमच्यावर न होता तुम्ही सहीसलामत स्मरणात राहू शकाल आणि जिथे भगवंताचे स्मरण आहे, तिथेच खुशाली आहे आणि आपल्या गुरुमाऊलीला सतत आपल्या खुशालीचाच विचार आहे!

म्हणूनच महाराज म्हणतात,

“दास म्हणे गुरुपुत्र | तोचि होईल जीवनमुक्त ||”

||श्रीनाम समर्थ||

No comments:

Post a Comment