Sunday, May 17, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३१ –

भगवंताच्या नामाची गंगा त्याच्या कृपेने वरून खाली येते; पण आपण तिला आपल्या देहबुद्धीचा बंधारा घालतो आणि अडवून ठेवतो.

श्रीराम!
एक गृहस्थ श्रीमहाराजांना म्हणाले, “महाराज आमच्यावर कृपा करा!” तेव्हा महाराज त्या गृहस्थाला म्हणाले, “अहो माझा प्राण मी तुम्हाला दिलेला आहे. गुरूची कृपा आहेच, आता तुम्हीच तुमच्यावर कृपा करा!” ही जी आपली आपल्यावर करण्याची कृपा आहे ती म्हणजेच देहबुद्धीचा बंधारा तोडणे होय! श्रीमहाराज म्हणतात, “जे नाम मी ब्रह्मानंद बुवांना दिले तेच नाम मी तुम्हाला देत आहे; त्यांनी ते सर्वस्व मानले, तुम्ही मानत नाही, याला मी काय करू?” हे नाम सर्वस्व मानण्याच्या आड येते तीच आमची देहबुद्धी.

“नामाची गंगा” म्हटले आहे. भागीरथाच्या भगीरथ प्रयत्नांनी गंगा जेव्हा पृथ्वीवर अवतरली, तेव्हा शिव शंकरांनी तिला आपल्या जटेत धारण केली, म्हणून पृथ्वी तिचा भार सहन करू शकली, इतका तिचा जोर आणि तेज विलक्षण होते. ही नाम गंगा देखील साक्षात विश्वाचा हुंकार आहे, सच्चिदानंद परमात्म्याचा ‘आनंदविलास’ आहे, त्याची शक्ती किती असेल! आज आपल्याला त्याची कल्पना नाही. श्रीमहाराजांना पूज्य बाबा बेलसरेंनी विचारले, “या नामाच्या शक्तीची कल्पना आम्हाला कशी येणार? ती शक्ती आम्हाला दाखवता येणार नाही का?” यावर श्री म्हणाले, “माझी केव्हाही दाखवायची तयारी आहे; पण ज्याला ती शक्ती दाखवायची त्याची तयारी नसेल तर ती शक्ती त्याच्याने सहन होणार नाही!” ही “तयारी नसणे” म्हणजेच आमच्या देहबुद्धीचा विलय झालेला नसणे होय. परंतु, जसे शिव शंकरांनी ही स्वर्गीची गंगा आपल्या जटेत धारण केली, तद्वत संतांनी – सद्गुरूंनी हे विलक्षण तेज, शक्ती, दिव्यता, भव्यता असणारे नाम आपल्या हृदयी धारण केले, आपल्या साधनेने, तपश्चर्येने, प्रेमाने त्याचे सिंचन केले आणि त्याचे बीजरूपात परिवर्तन करून आपल्याला दिले. हे बीजाचे रोप बनण्याची प्रक्रिया म्हणजे साधन होय. परंतु हे बीज जितके तेजस्वी आहे तितकेच आत्यंतिक नाजूक आहे. फार वर्षांनी झालेले लेकरू आई जीवापाड जपते, तसे अनंत जन्मांनी झालेल्या ‘नामाच्या लाभाला’ त्या आईसारखे जपणे जरूर आहे. आईचे ते मूल सर्वस्व असते; तिला स्वतःची थोडी देखील तमा नसते, इतकी ती त्या मुलामध्ये स्वतःला विसरून जाते. तसे जो साधक या नाम-बीजाच्या सिंचनात स्वतःला रममाण करतो, त्यातच स्वतःला विसरतो त्याचे नाम बीज एखाद्या सरसर वाढणाऱ्या वेलीप्रमाणे वाढते.

‘स्व’ चे समर्पण म्हणजे देहबुद्धीचे विस्मरण. श्रीमहाराज म्हणतात, गुरूला तुम्ही सर्व द्याल; पण ‘स्व’ दिला नाही तर काहीच दिले नाही. आणि वरच्या वचनात महाराज आपल्याला हेच सांगतात की हा जो ‘स्व’ तुम्ही एकाकार वृत्तीने जपत आहात, त्यामुळे नाम घेऊनही जुळत नाही. काय जुळत नाही? तर आपण जे दररोज म्हणतो, “सदा सर्वदा योग तुझा घडावा,” हा योग जुळत नाही आणि जीव – शिवातला पडदा दूर होत नाही.

ज्याला नाम मिळाले त्याने प्रथम कोणती गोष्ट करणे आवश्यक असेल तर ती म्हणजे ‘आमची काहीही योग्यता नसताना, आम्ही लौकिक आयुष्यात देखील अनंत चुका रोज करत असताना आम्हाला सद्गुरूंच्या केवळ अकारण कृपेमुळे नाम मिळाले आहे’ या कृतज्ञ भावनेचे पोषण होय! ज्याला ही भावना खरीखुरी जाणवली त्याला नामाचे प्रेम येईलच. आम्हाला अजूनही आमच्या भाग्याची कल्पना नसल्यामुळे नामाची किंमत आम्हाला कळलेली नाही आणि त्यामुळेच नाम-साधनेच्या आड आमच्या देह, मन, बुद्धीचे व्यापार येतात. श्रीमहाराज याला सबबी सांगणे म्हणतात. आज काय घरी काहीतरी समारंभ होता म्हणून नाम झाले नाही, उद्या कुठे जायचे होते म्हणून नाम होणार नाही, आजारीच पडलो त्यामुळे नाम झाले नाही, काही वाईट प्रसंग घडला म्हणून नाम झाले नाही अशी आमची अनंत कारणे आम्हाला सर्वांना माहीत आहेत. यालाच महाराज वरच्या वचनात ‘देहबुद्धीचा बंधारा’ म्हणतात.

मुळात ‘नाम’ हे इतके पवित्र आणि या सर्व लौकिक गोष्टींपासून विलग आहे, की या कोणत्याच गोष्टी त्याला बाधा पोहोचवू शकत नाहीत. बाधा आहे ती आमच्या ‘लौकिकात अडकलेल्या विचारांची’ आहे. त्यातल्या त्यात श्रीमहाराजांनी तर नामासाठी ‘प्रेमाने स्मरण’ ही एक भगवंताची उपाधि जवळ बाळगण्याखेरीज इतर काहीच सांगितलेले नाही. नासाग्री दृष्टी, आसन, ठराविकच वेळ, जागा यांसारख्या गोष्टींचा आग्रह श्रीमहाराज कधीच करताना दिसत नाहीत, कारण त्यांना आमची याबद्दलची असमर्थता देखील माहीत आहे व नामाची या सर्व गोष्टींना लांघून कार्य करण्याची विलक्षण क्षमता देखील! किंबहुना जेव्हा लोक विचारायचे की नाम श्वासावर घ्यावे का? तेव्हा महाराज म्हणायचे, नामाचा संबंध श्वासाशी जोडण्यापेक्षा प्रेमाशी जोडता आला तर बघावे. यातून श्रीमहाराजांना काय सुचवायचे आहे हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. स्थळ – काळ - निमित्त या सर्व उपाधि देहाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना नामासारख्या परम पवित्र साधनेसाठी फारसे महत्त्व नाही. श्री म्हणायचे की, समजा एखाद्याला लकवा झाला, बसताच येत नाही तर त्याने काय नाम घेऊ नये का? आसन एवढे महत्त्वाचे असते तर त्याचे साधन घडणार कसे? महत्त्व आसनाला नाही, तुमचे मन कोणत्याही शरीराच्या स्थितीत नामात किती तल्लीन होते याला आहे. म्हणूनच श्रीमहाराज अनेक वेळा म्हणतात की “नामाला जो उपाधि लावतो, त्याला नाम कळलेले नाही!”  

जेव्हा एखादी स्त्री महाराजांना विचारायची, ‘घरी मी नामासाठी माळ हातात घेतलेली पतीला मान्य नाही, तर मी कसे करावे? तेव्हाही महाराज हेच सांगत की पतीचे मन दुखवू नये; आणि नाम साधन किंवा भगवंताचे स्मरण हे मनाने करायचे आहे, ते बाहेर कशाला दिसायला पाहिजे? मनाने राम राम म्हणायला कुणाचीही आडकाठी असणे शक्य नाही. तेव्हा आपण आपली अध्यात्मिक शक्ती नामाने इतकी वाढवावी की आजूबाजूच्या लोकांवर त्याचा सहजी प्रभाव पडावा. या सर्व सांगण्याचे तात्पर्य एवढेच की नाम हे संपूर्णतः उपाधि रहित असे आहे; आपण त्याला आपल्या देहबुद्धीची उपाधि घालून त्याच्या शक्तीला अडवू नये. हे म्हणत असतानाच महाराज हे देखील सांगतात की साधन किंवा ठराविक वेळ, ठराविक नामाची संख्या ही उपाधि आपल्याला शिस्त लागण्यासाठी आहे. इतर उपाधींपासून दूर राहण्यासाठी ही नामाची, भगवंताच्या स्मरणाची एकमेव उपाधि धडधाकट असताना जवळ बाळगावी, म्हणजे हळूहळू आपण देहबुद्धीच्या उपाधीतून मुक्त होतो.

हे ज्याने जाणले व त्यानुसार आचरले, त्याने स्वतःच स्वतःवर कृपा केली; म्हणजेच निरंतर वर्षणाऱ्या सद्गुरू कृपेचा क्षणोक्षणी अनुभव घेतला व आयुष्य नामात धन्य केले!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. ज्याला नाम मिळाले त्याने प्रथम कोणती गोष्ट करणे आवश्यक असेल तर ती म्हणजे ‘आमची काहीही योग्यता नसताना, आम्ही लौकिक आयुष्यात देखील अनंत चुका रोज करत असताना आम्हाला सद्गुरूंच्या केवळ अकारण कृपेमुळे नाम मिळाले आहे’ या कृतज्ञ भावनेचे पोषण होय! ज्याला ही भावना खरीखुरी जाणवली त्याला नामाचे प्रेम येईलच.😷😷😷
    प्रणाम, प्रणाम, प्रणाम!!!
    श्रीराम समर्थ!!!

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete