Sunday, May 3, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १७ –

एखादा मनुष्य ‘मी नामस्मरण करीत नाही’ असे म्हणाला तरी मला चालेल; कारण त्याला नामाची आठवण आहे.

श्रीराम!
पूज्य ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा विचारले, श्रीमहाराजांचा तुम्हाला भावलेला असा एक गुण सांगा; तेव्हा ते म्हणाले, ‘दयासिंधु!’

ज्ञानेश्वर माऊली सद्गुरूंचे वर्णन करताना अमृतानुभवात म्हणतात,
‘अमूर्तचि परि मूर्ती कारुण्याचा!’

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
‘काय वाणू आता न पुरे हे वाणी | मस्तक चरणी ठेवितसे ||
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह कष्टविती परोपकारे ||
भूतांची दया हे भांडवल संता | आपुली ममता नाही देही ||
तुका म्हणे सुख पराविया सुखे | अमृत हे मुखी स्त्रवतसे ||’

श्रीमहाराजच आपल्या एका अभंगात म्हणतात,
‘माय बाळापाशी चित्त | तैसे संत करिती हित ||’

संतश्रेष्ठ तुलसीदास रामचरितमानस मध्ये म्हणतात,

‘मुद मंगलमय संत समाजू | जो जग जंगम तीरथराजू ||
(संत समूह हा आनंदमय अणि कल्याणमय असा आहे. तो जगातला चलता बोलता तीर्थराज प्रयाग आहे!)

संत सद्गुरू हे ‘कल्याणानां निधानम्अशा कलि-मल दहन करणाऱ्या परम पावन भगवंताचे पृथ्वीवरील रूप. त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक संकल्प हा केवळ अज्ञानाच्या खाईत दुःख भोगणाऱ्या जीवांना आनंदाच्या राशीकडे कसे घेऊन जाता येईल यासाठीच असतो. श्रीरामपाठात श्रीमहाराज म्हणतात,

“तुझे ब्रीदाचे महिमान | कित्येक उद्धरिले पापी जन |
विरोध भक्तीने रावण | वैकुंठपदी पावविला ||”

रामरायाने रावणासारख्या क्रूर दैत्याला देखील वैकुंठ पद दिले. कारण, विरोधी भावनेने का होईना, त्याला प्रभूंचे सतत स्मरण होते. हेच भगवंतांनी शिशुपाल, कंस यासारख्यांच्या बाबतीत देखील खरे केले. भक्तीच्या साम्राज्यात आनंदाने संचार करणाऱ्या संतांनी याला विरोध भक्ति म्हणून संबोधले.

श्रीमहाराजांकडे अनेक मोठमोठे विद्वान यायचे व सर्वांचा काही भगवंताच्या नामावर इतका दृढ विश्वास नसायचा. मोठमोठे तंत्रमंत्र, जारण-मारणादि विद्या (!) अवगत असलेल्या अनेकांशी महाराजांची गाठ पडायची. मोठमोठे योगी त्यांच्या पायाशी लागत; परंतु अनेकांना आपल्या सिद्धींना अजून सामर्थ्य प्राप्त व्हावे ही इच्छा असे. श्रीमहाराजांचा तर नाम म्हणजे प्राण! ते त्यांना समजावून सांगायचे, की या सिद्धी कशा कवडीमोलाच्या आहेत व भगवंताचे ना कसे अमूल्य आहे. त्यांची सांगण्याची पद्धत व शैली इतकी खुबीची असे के बहुतेक लोकांना त्यांचे म्हणणे पटायचे व ते नामाला लागायचे. अर्थातच ही केवळ बाह्य खुबी नसायची; त्यामागे श्रीमहाराजांच्या नामाच्या निश्चल प्रेमाचे तेज होते, त्यांची अध्यात्म शक्ती होती. परंतु काही करंटे जन कितीही सांगितले तरी नामास न वरता इतर साधनात आपली शक्ती आणि वेळ नष्ट करत. त्यावेळी श्रीमहाराजांच्या जवळचे लोक त्यांना विचारत, लोक ऐकत नाहीत तरी तुम्ही का एवढे सांगता? महाराज आईच्या अंतःकरणाने म्हणत, “आज त्याने ऐकले नाही तरी आयुष्याच्या शेवटी त्याला आठवेल, अरे, आपल्याला असे कुणी सांगितले होते आणि एवढे आठवले तरी त्याचे काम होईल!” ते म्हणायचे, “व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे, की मला कोणाचे दुःख पाहवत नाही” आणि म्हणून सुख-दुःखादि भोगांत गुरफटलेल्यांना आत्यंतिक तळमळीने श्रीमहाराज भगवंताच्या नामाचे महत्त्व समजावून सांगत.

वरच्या वचनात देखील हीच अपरिमित अकारण करुणा श्रीमहाराजांची दिसून येते. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, काय ही करुणा; पण त्यांची इतकी करुणा आहे तर आपलीही काही जबाबदारी आहे की नाही? असा सवाल ते करायचे. त्यांनी किती आपल्यासाठी compromise करायचे म्हणत.

संतांच्या वाणीत विलक्षण सामर्थ्य असते. त्या सामर्थ्यामुळेच अज्ञानी जीवांचा देखील अंतकाळ साधण्याचे ब्रीद श्रीमहाराजांसारखे संत सांभाळतात. मग जे त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून नामाला लागले त्यांच्या परम दुर्लभ सद्गतीबद्दल काय बोलावे?

म्हणून श्रीमहाराज शेवटी म्हणाले,
“एक वेळ राम बोला!!!”
एकदा जरी कोणी माझ्या रामाचे नाम उच्चारले तरीही त्याची दुर्गती होणार नाही असे जबरदस्त आश्वासन श्रीमहाराज देतात. आणि म्हणून आजन्म रामनामाची महती गाणारा हा महात्मा म्हणतो,

“माझ्याकडे जो येईल त्याला मी ‘राम’ म्हणायला लावीनच; निदान ‘मी राम म्हणणार नाही’ असे म्हणवून तरी त्याला “राम” म्हणायला मी लावीन!!!

||श्रीनाम समर्थ||

4 comments:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. श्रीराम जयराम जय जय राम

    ReplyDelete
  3. दया सिंधू महाराज माझे.

    ReplyDelete
  4. माझे महाराज म्हणजे दयेचा सागर.श्रीराम.

    ReplyDelete