Sunday, May 24, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३८ –

नाम हे आतून आणि बाहेरून घेता येते. नामात राहावे म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होईल आणि अंतःकरण शुद्ध झाले की भगवंताचे प्रेम येईल.

श्रीराम!
या एका वचनात साधनाचा संपूर्ण आलेख श्रीमहाराजांनी मांडला आहे. साधनेची सुरुवात गुरु-प्रदत्त नाम – नामस्मरण साधनेला वैखरीने सुरुवात – हळूहळू अंतःकरणाची शुद्धी – भगवंताचे प्रेम असा तो सरळ आलेख आहे. हे सांगायचे कारण असे की नामस्मरण हे स्वतःमध्ये एक सर्वांग सुंदर आणि संपूर्ण साधन आहे. हे वचन वाचल्यावर डॉ कुर्तकोटी जे म्हणायचे की महाराज फक्त वेदांत बोलत हे तंतोतंत पटते. पहिल्याच वाक्यात महाराजांनी साध्या शब्दात पाच कोष आणि चार अवस्था याबद्दल सांगितले आहे. परंतु साधनेच्या दृष्टीने बघितले तर महाराज नेमाचे नामसाधन आणि प्रेमाचे नामसाधन असा भेद इथे करत आहेत हे कळते.

आम्ही जेव्हा साधनेला सुरुवात करतो, तेव्हा (काही सन्माननीय अपवाद वगळता) अजून आमची लौकिक भोग लालसा गेलेली नसते. त्यामुळे सदगुरूंकडून नाम मिळाले म्हणजे आता मला माझ्या लौकिक आयुष्यात कुठे काही कमी पडू नये, आहे ते टिकावे व वाढावे, नको ते टळावे या दृष्टीने आम्ही नामसाधन करण्यास सुरुवात करतो. थोडेसे नाम घेतले की आम्ही लगेच काय सकारात्मक अनुभव आले हे बघण्यास सुरुवात करतो. ते जर आले तर ते तसेच टिकावे यासाठी मग काही विशिष्ट नेम केला जातो व तो पाळायची कसरत सुरु होते. सवयीचे गुलाम झालेल्या देह मनाला याची सवय नसल्यामुळे ते थकते, कंटाळते; पण तरीही गुरूंनी सांगितले आहे या भावनेने रोजचे नाम (काही ठराविक संख्या) पुरी करते. अशा नामजपातले नाम हे बहुधा बाहेरून घेतलेले असते; म्हणजे ते फारतर अन्नमय कोषापर्यंत पोहोचते. पण हे देखील उपयोगाचे ठरते – दोन अंगांनी – एक तर आम्हाला थोडी का होईना नेमाची सवय लागते, दुसरे म्हणजे श्रीमहाराज म्हणतात, नामाचा उगम परे (परा वाणी) मध्येच आहे. वैखरीने नाम घेतले तरी देखील त्याचा उगम परेत असल्याने कोणतेच नाम वाया जात नाही, असा एक जबरदस्त दिलासा श्रीमहाराज आम्हाला देतात. याला नाम ‘घेणे’ असे म्हणतात.

मात्र जर या टप्प्यावर गुरुकृपेने आम्हाला खरा चांगला सत्संग लाभला, संत श्रवण घडले, सद्ग्रंथ वाचनात आले किंवा काही आयुष्यातले प्रसंग आम्हाला अंतर्मुख करून गेले, तर हळूहळू दृश्याचे नश्वरत्व मनावर ठसू लागते. हे जे गुरुप्रदत्त अमोघ असे नामसाधन मला मिळालेले आहे ते मी असे लौकिक गोष्टींसाठी वाया घालवणे योग्य नाही, यातून मी माझे कोटकल्याण करून घेतले पाहिजे हा विचार मनामध्ये मूळ धरू लागतो. आणि हे झाले की मग गुरुकृपेचा वर्षाव होऊन मन नामामध्ये रमू लागते. नामात शरीर रोमांचित होऊ लागते. भगवंताचे गुण वर्णन / लीला / कीर्तन / श्रवण याखेरीज मनाला चैन पडत नाही. आणि हे साधकाला नामाच्या खऱ्या स्थितीप्रत घेऊन जाते, ‘साधक नामात राहू लागतो’. अधूनमधून विसर, अधूनमधून नाम हे असले तरी विसराचे प्रमाण निश्चित कमी होऊ लागते व नाम वैखरीतून मध्यमेपर्यंत व हळूहळू पश्यंतीत पोचते. हेच आतून नाम चालणे होय. “राम हमारा जप करे, हम बैठे आराम” अशी अवस्था देखील मधे मधे अनुभवाला येते.

या बाहेरच्या आणि आतल्या नामाच्या मधला टप्पा म्हणजे अंतःकरण शुद्धी! संपूर्ण शुद्धी ही संपूर्ण शरणागतीनेच साधते आणि म्हणूनच नामस्मरणाच्या साधनेत शरणागती हळुवारपणे अनुस्यूत आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. जसे म्हटले जाते, लौकिकातले कोणतेही ज्ञान मिळवण्याचा फायदा काय? तर ज्ञानाने माझ्यातल्या अपूर्णतेचे दर्शन मला होते. तसे मनापासून नामस्मरण करणाऱ्या साधकाची अंतःशुद्धी सहजच होत जाते. भगवंताला जाणण्याचा अट्टाहास जाऊन त्याला मानण्यातले सुख समाधान जाणवते. भगवंताला जाणण्याच्या किंवा तत्सम कोणत्याही अट्टाहासामागे माझा लौकिकातल्या आग्रही वृत्तीच होती हे लक्षात येऊन साधक हळूहळू निष्काम, निरहंकार व ‘नामासाठी नाम’ या भूमिकेवरून सहज नामात राहू लागतो. हे असे नामात राहणे अंतःकरण शुद्धीनेच साधते म्हणून महाराज म्हणतात, शुद्धी झाली की प्रेम आलेच.

भगवंताच्या प्रेमाला आडकाठीच आमचे दृश्यात हिंदोळे खाणारे मन आहे. जेव्हा नामाच्या मनःपूर्वक केलेल्या साधनाने चित्तशुद्धी होते तेव्हा साहजिकच ज्याकडे जीवाची स्वाभाविक ओढ आहे, स्वाभाविक प्रेम आहे, ते भगवंताचे प्रेम आम्हाला जाणवू लागते आणि यायोगे पुन्हा नामाचे प्रेमच दुणावते हा अनुभव साधक घेतो! यालाच ‘प्रेमाचे नामसाधन’ म्हणता येईल. इथे पूज्य भाऊसाहेब केतकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. “महाराजांना आवडते म्हणून नाम घ्यावे” या प्रेमाच्या भूमिकेवर राहून अमाप नामस्मरण त्यांच्याकडून झाले. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यावर त्यांना आज्ञा केली होती की बारा वर्षे गोंदवल्यातच रहावे. त्या वेळची परिस्थिती अनुकूल नसताना देखील त्यांनी या आज्ञेचे पालन केले. नंतर वाणीरूपात जेव्हा पूज्य बाबा बेलसरे श्रीमहाराजांना म्हणाले, “भाऊसाहेबांकडून ही तपश्चर्याच झाली” तेव्हा लगेच महाराज म्हणाले, “छे छे, ते त्यांनी प्रेमापोटी केले” म्हणजेच प्रेमापोटी केलेल्या कोणत्याही गोष्टीत कधीही कष्ट नसतात. असेच जो साधक प्रेमाने नामस्मरण करतो, त्याला ते साधन वाटत नसते. किंवा त्यातून त्याला काही प्रापंचिक वा पारमार्थिक देखील मिळवायचे नसते. त्याला नामानेच समाधान प्राप्त झालेले असते आणि त्या समाधानाने नाम हेच साध्य असल्याची दृढ जाणीव त्याच्यात निर्माण झाल्याने सहज आनंदात तो नाम घेतो!

(अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष असे हे बाहेरून आतपर्यंत पाच कोष आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीया अशा चार अवस्था आहेत. बाहेरून आत असा हा प्रवास आहे. हाच प्रवास नामाने होतो असाही अर्थ वरच्या वचनातून ध्वनित होतो)

||श्रीनाम समर्थ||

No comments:

Post a Comment