Monday, May 4, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १८ --

दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. ‘हेच माझे सर्वस्व आहे’ असे नामात प्रेम असावे. त्रिभुवनात नाम अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे.

श्रीराम!
श्रीमहाराजांच्या आवडत्या गीतेच्या नवव्या अध्यायात भगवंत म्हणतात,
“मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना||” मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे जग विस्तारले आहे. भगवंताचे वर्णन करताना म्हटले आहे, स्थिर-चर व्यापुनि तो जगदात्मा दशांगुले उरला. ही जी दश अंगुले तीच भगवंताचे नाम, रूप, लीला, धाम अविरतपणे अविचलपणे भगवंताच्या अंतरंग शक्तीकडून प्रकाशित होतात. सत् रूप परमात्म्याचा त्याच्या शक्तीच्या चित् रूपाशी संयोग असल्या कारणाने सच्चिदानंदघन बनतो.

श्रीमहाराज व तुकाराम बुवा वलव्हणकर यांच्या संवादात (चरित्र पान ३१२) श्रीमहाराज त्यांना विचारतात, “या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना तऱ्हेचे पक्षी, नाना तऱ्हेचे प्राणी, असे किती प्रकार सांगावेत! या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांच्यात व्यापून असणारा कोणता गुण आहे? सांगता का?” यावर तुकाराम बुवा म्हणाले, “महाराज, आपण जे प्रकार सांगितले त्यांचे दोन मुख्य भेद करता येतील. एक सजीव आणि एक निर्जीव.” श्रीमहाराज यावर म्हणतात, “उत्तम; पण एक पाऊल आणखी पुढे जा आणि या दोन्हीला सामान्य असे काय असावे याचा विचार करा.” जेव्हा त्यांना सांगता आले नाही, तेव्हा महाराज म्हणाले, “असे पहा, सजीव प्राणी झाला तरी तो ‘आहे’ आणि निर्जीव वस्तु झाली तरी ती ‘आहे.’ हा जो ‘असणेपणाचा’ गुण हा यच्चयावत सर्व वस्तूंना लागू आहे की नाही याचा विचार करा. अगदी ‘आनंदाला’ देखील ‘आहे’पणाचा गुण आहे. या असणेपणाच्या गुणाला ‘नाम’ असे म्हणतात, यालाच कार असे म्हणतात.” श्री ज्ञानेश्वर महाराजांनी यालाच आदिबीज म्हटले आहे.

म्हणजेच अव्यक्तातून परमात्मा जेव्हा व्यक्त झाला या सांध्याला जोडणारी साखळी म्हणजे नाम होय. म्हणूनच वरच्या वचनात महाराज म्हणताहेत, दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. म्हणजेच नाम हीच खरी भगवंताला ओळखण्याची खूण आहे. श्रीमहाराज म्हणतात, रूप येईल आणि जाईल पण नाम त्या रूपाला व्यापून पुन्हा उरेल आणि हाच नामाचा महिमा आहे. द्वापाराच्या शेवटी व कलियुगाच्या सुरुवातीला अवतार समाप्तीच्या वेळी तर भगवंतांनी सांगूनच ठेवले की मी माझी सर्व शक्ती नामात ठेवून अवतार संपवीत आहे. म्हणजेच तिथे दृश्य रूप अंतर्धान पावले तरीही नाम हे सदा सर्वदा मागे राहिले आणि राहील! आणि म्हणूनच सर्व भक्तिमार्गी संतांनी नामाला प्रत्यक्ष परमात्मस्वरूप असल्याचे अनुभवले. नामाशिवाय सिद्ध झाला हे तो कल्पांती न घडे असे छातीठोकपणे त्यांनी सांगितले.

श्रीमहाराज अतिशय तार्किक व्यक्तींना एकच गोष्ट विचारत, नारद महर्षींपासून सर्व संतांपर्यंत, ज्यांनी ज्यांनी नाम महिमा गायला त्यांचा त्यात कोणता स्वार्थ होता? विश्वास ठेवावा की ठेवू नये हा प्रश्न तेव्हा उद्भवला पाहिजे, जेव्हा कोणत्याही सांगण्यामागे काही कामनिक हेतू असेल. स्वतः नामात रंगून जाऊन, त्यातला स्वानंद रस चाखल्यानंतर विनाकारण सुखदुःख भोगत गुरफटलेल्या लोकांना नामाचे श्रेष्ठत्व सांगण्यामागे लोक कल्याणाखेरीज संतांचा कोणता हेतू असू शकतो असे महाराज विचारायचे व म्हणायचे, औषध घेण्याआधीच मला गुण यावा असा हट्ट करून कसे चालेल? तसेच नाम घेण्याआधी मला नामाची प्रचीती दाखवा हे वक्तव्य चुकीचे आहे म्हणत. नामाची प्रचीती सूर्यासारखी स्वच्छ आहे, ज्याला हवा त्याने अनुभव घ्यावा. मात्र त्यासाठी संतांच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून मनापासून नाम जपणे जरूर आहे असे महाराज म्हणतात.

एक नामनिष्ठ संत होते. त्यांचे जे शिष्यगण होते, त्यांना त्यांनी एकदा सांगितले, ज्याला भगवंताचे दर्शन घ्यायचे आहे त्यांनी माझ्या खोलीत आज दुपारी 3 वाजता यावे. शिष्यांना अत्यंत आनंद झाला व ते बरोबर 3 वाजता त्यांच्या दाराशी हजर झाले. आत आल्यावर ते संत म्हणाले, तुम्हाला मी जे नाम दिले आहे, त्याचा मनोभावे जप करीन असा इथे संकल्प करावा; त्या नामातच तुम्हाला भगवंताचे दर्शन होईल. हे ऐकून काही शिष्यांचा हिरमोड झाला. ते ‘भगवंताला’ बघायला तिथे गेले होते. ते जाणून ते संत म्हणाले, “पहा अशी स्थिती असते आपल्या श्रद्धेची. गुरु सांगताहेत, वेद-पुराणे-शास्त्रे यांचा आधार घेऊन तुम्हाला सांगत आहेत की नाम हाच भगवंत आहे; परंतु तुमची श्रद्धा नाही; कारण प्रत्येक नामामध्ये भगवंत प्रत्यक्ष वसलेले आहेत हे तुमच्या दृष्टीने केवळ शब्द आहेत. परंतु मी त्याची अनुभूती घेतली आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे. जे या वचनावर दृढ निष्ठा ठेवून नाम जपतील त्यांना नामात दर्शन झालेच पाहिजे हा माझा दावा आहे!”

आणि हे होण्यासाठी श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘हेच माझे सर्वस्व आहे’ असे नामात प्रेम असावे. हा ज्या प्रेमाचा उल्लेख महाराज करताहेत हे अनुभूती पूर्वीचे सद्गुरूंनी सांगितले म्हणून माझे गुरुवचनावर आत्यंतिक प्रेम आहे या अवस्थेत जपलेले नाम होय. यातूनच ‘नाम हेच प्रेम’ या अनुभूतीचा जन्म होतो! भगवान सदाशिव आणि पार्वती माता बसलेले असताना माता म्हणाल्या, मी जरा जाऊन येते. तेव्हा भोलेनाथांनी कारण विचारताच म्हणाल्या, ‘माझा आजचा विष्णु सहस्रनामाचा पाठ राहिला आहे, तो पूर्ण करून येते. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, ‘उमा, इथे बसून “राम” हा शब्द ३ वेळा उच्चारला तरीही तुझ्या पाठाची परिपूर्ती होते! – सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने!!

महाराज म्हणताहेत, त्रिभुवनात नाम हे अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. आणि म्हणूनच संत म्हणतात,
“जबहिं नाम हृदय धरयो, भयो पाप को नास |
जैसे चिनगी आग की, पड़ी पुराने घास||”
जुन्या वाळलेल्या गवतावर आगीची ठिणगी पडून ते जसे भस्मसात होते, तसे ज्याने नामाला हृदयात धारण केले त्याच्या पापाचा नाश होतो आणि म्हणूनच “राम नाम लेत लेत भव सिंधु सुखाही!” परंतु हे होण्यासाठी त्या दृढ बुद्धीने व अविरत अनुसंधानाने नाम ‘जपणे’ आवश्यक आहे.

श्री रामकृष्ण परमहंस म्हणत, भगवंताच्या नामात कसे प्रेम पाहिजे? तर सामान्य प्रापंचिक मनुष्याची पैशाची जबरदस्त आसक्ती, आईची लेकरातील आसक्ती आणि पतीची आपल्या चांगल्या पत्नीमधील आसक्ती या तीनही मिळून जेव्हा नामाकडे – भगवद् चिंतनाकडे लागतील, तेव्हा खरे प्रेम येईल व या प्रेमानेच आपल्याला खऱ्या शाश्वत समाधानाची – आनंदाची – शांतीची चुणूक याच भव पसाऱ्यातही येईल! श्रीमहाराजांची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. नाम स्मरे निरंतर किती नामाच महाते आहे या युगात.श्रीराम समर्थ.

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete