Thursday, May 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३५ –

वृत्ति शांत होणे हाच नामाचा अनुभव आहे. नेहमी सावध रहावे आणि स्वतः विसरून ऊर्मीच्या आहारी जाऊ नये. ऊर्मी आवरली पाहिजे.

श्रीराम!
“The farthest distance is the distance between the false I and the Real I”- सर्वात दूरचे अंतर जर असेल तर ते म्हणजे खोट्या आणि खऱ्या मी मधले अंतर होय. आणि म्हणूनच म्हटले जाते, The only revolution is the inner revolution!”अंतरंगाचे परिवर्तन हेच एकमेव परिवर्तन होय. सर्व अध्यात्मिक शास्त्र हे केवळ आणि केवळ याभोवती घोटाळते. ज्ञान मार्ग असो, योग मार्ग असो, कर्म मार्ग असो वा भक्ति मार्ग असो, या अंतरंग परिवर्तनावाचून जे जे काही आहे तो सर्व भ्रम होय! भक्तिमार्गात कर्माला प्राधान्य नाही किंवा पुरुष प्रयत्नाला प्राधान्य नाही हे चूक आहे. जोवर देहबुद्धी आहे, तोवर खऱ्या अर्थाने भक्ति घडू शकत नाही आणि ही देहबुद्धी जळून जाण्यासाठी नामसाधन आपल्याला सद्गुरूंनी दिलेले आहे याचे संपूर्ण भान शिष्याने ठेवणे आवश्यक आहे असे सर्व संत सांगतात. कारण, साधनाने भगवंत भेट होत नसते; ती भेट (जी मुळात आहेच) ती केवळ “कृपेमुळे” ज्ञात होते! साधन आपल्याला असाधनापासून, भगवत विमुखतेपासून दूर ठेवते आणि आपले देहाशी जे चुकीने तादात्म्य झाले आहे त्यापासून आपल्याला मुक्त करते. हे झाले की मग लक्षात येते की परमात्मा सहजच प्राप्त आहे. तो कुठून यायचा नाही, कुठून मिळवायचा नाही; केवळ भ्रमाने त्याच्यापासून निर्माण झालेला दुरावा सद्गुरू प्रदत्त साधनाद्वारे लक्षात घेऊन शरीरबुद्धी नष्ट करायची आहे. यालाच श्रीमहाराज एका वाक्यात - वृत्ति शांत होणे म्हणतात.

अनंत वृत्ति – मनाचे तरंग जे चित्तात उठत असतात त्याचे मूळ जर छाटून टाकले तरच त्यापासून निर्माण होणारी कर्माची ऊर्मी टाळणे शक्य होईल असे श्रीमहाराज सांगतात. श्रीमहाराजांसारख्या सर्व संतांच्या अमाप लोककार्याचे मूळ त्यांच्या भगवद्रूप, आत्यंतिक निस्वार्थ आणि पवित्र अंतःकरणामध्ये आहे. अशा अंतःकरण प्राप्तीची परिणती म्हणजेच भगवद्दर्शन होय!

हे होण्यासाठी श्रीमहाराज आपल्याला सांगत आहेत, सावध रहा. एकीकडे सांगताना महाराज म्हणाले, परमार्थ म्हणजे अखंड सावधानता. आणि आम्ही या प्रपंचाच्या चक्रात फसण्याचे कारणच आमचा बेसावधपणा आहे. सदसद्विवेक हा सर्व अंगांनी सावधपणावर अवलंबून आहे. समर्थ उत्तम गुणांचे वर्णन करताना म्हणतात - सावध, साक्षेपी, दक्ष! मनामध्ये ज्या ज्या वृत्ति उठतात त्यांवर प्रभुत्व येण्यासाठी ही सावधानता अतिशय जरूर असते. प्रवाहपतित न होण्यासाठी मनाची सावधानताच उपयुक्त ठरते.

पूज्य बाबा बेलसरे प्रवचनात गमतीने सांगायचे, “असं म्हणतात की राग आल्यावर दहा अंक मोजावेत; अरे, ज्याला दहा अंक मोजायचं भान राहील त्याला राग येईलच कशाला?” असे आम्ही राग, लोभ, मद, मोह, मत्सर, काम या षड्रिपूंच्या आहारी जातो. श्रीमहाराजांच्या चरित्रात अशी अनंत उदाहरणे आहेत ज्यांमध्ये श्रीमहाराज समोरच्या शिष्याला त्याच्या वृत्तींच्या आहारी जाण्याबद्दल शालजोडीतून सुनावत. त्याला प्रत्यक्ष सांगितले नाही तरी त्यांच्या बोलण्यातून ज्याला ते लागावे त्याला बरोबर लागत असे व तो सुधारण्याच्या मार्गाला लागे, कारण सर्व महाराजांना कळते अशी आदरयुक्त भीती त्यात असे. त्यातूनच पुढे तो वृत्तींना सांभाळण्याच्या कामी यशस्वी होत असे. खरोखर जर श्रीमहाराज आम्हाला प्रत्येक क्षण बघतात हे आम्हाला खरे खरे जाणवले, ते आम्ही खरे खरे मानले, तर प्रत्येक क्षण सहजच सावधान राहता येईल.

एका नितांत सुंदर अभंगात श्रीमहाराजांनी आपल्याला नामस्मरणाचे साधन काय करते आणि वृत्ति शांत होऊन त्याचे फळ आपल्याला काय मिळते हे समजावून सांगितले आहे –

मन मारुनी पहा निजधाम| 
परा जपे रामनाम||
वृत्ति राहे सदा स्थिर| 
नामी वसे निरंतर||
मी आणि विश्व एकचि आहे| 
त्यासी साक्षी होउनी पाहे||
काम-क्रोधे नाही विटाळला| 
सदा राहे उपाधिवेगळा||
निरहंकार कलेवर| 
नेत्री वसे रघुवीर||
निंदा स्तुति नाही मुखा| 
अंत नाही त्याचे सुखा||
दास म्हणे साधनापुढे| 
ब्रह्मज्ञान झाले वेडे||

हे जे पहिल्या चरणात महाराज मन मारण्यास सांगत आहेत, ते म्हणजेच प्रवाहपतित न होता आत्मानात्म विवेक करून ऊर्मींच्या आहारी न जाणे होय. संतश्रेष्ठ तुकोबांच्या सारखे महापुरुष देखील म्हणतात, “आली ऊर्मी साहे| तुका म्हणे थोडे आहे||” ऊर्मी सहन करून तिला साधनेच्या दिशेने ज्याने वळवली त्यालाच आत आणि बाहेर समतोल साधता येईल असे संत सांगतात. जगद्गुरू कृपालू जी महाराज एके ठिकाणी म्हणतात, “आपल्याला मन मारण्याची सवय आहे. आपण उगीच ते अवघड समजतो. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात खूप गरम होताना देखील कुणीही कपडे काढून नागडे फिरताना दिसत नाही. तिथे आपण आपल्या मनाला समजावतो की हे जनात चांगले दिसणार नाही, त्यामुळे आपण हे सांभाळले पाहिजे. परंतु सद्गुरू किंवा भगवंत समोर दिसत नसल्याने एकांतात कोणतीही देहबुद्धीची ऊर्मी आली की आपण तिच्या आहारी जातो. तिथे जर गुरू बघत आहेत हा भाव दृढ झाला (जे केवळ सत्य आहे), की मग कोणतीही ऊर्मी सहन करणे तितकेसे अवघड राहणार नाही.

अशा रीतीने
१) नामाचा निरंतर अभ्यास,
२) सद्गुरूंच्या सान्निध्यावर विश्वास,
३) अखंड सावधानता
४) स्वतःच्या अवगुणांचे यथार्थ दर्शन
५) त्यांवर मात करण्याची मनापासून इच्छा
६) त्यासाठी सद्गुरुंवर पूर्ण विश्वास ठेवून मुळीच हताश न होता उत्साहाने प्रयत्न आणि
७) प्रपंचात देह काम करीत असताना देखील मन मात्र गुरुचरणी ठेवण्याचा सतत अभ्यास

या सप्तपदीतून हळुवारपणे सद्गुरूंच्या अंतःकरणाशी त्यांच्या अमोघ कृपेने थोडे जरी तादात्म्य होता आले, तर वृत्ति शांत होणे हा नामाचा अनुभव आपल्याला नामात प्रेम प्रदान करेल!

||श्रीनाम समर्थ||


1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete