Friday, May 15, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २९ –

आपली वृत्ति आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय. म्हणून आपली वृत्ति नामामध्ये गुंतवून ठेवावी.

श्रीराम!
योगाची व्याख्या करताना पतंजलीने “योगः चित्तवृत्ति निरोधः” अशी केली. चित्तात उठणाऱ्या विविध तरंगांना वृत्ति ही संज्ञा आहे. योग साधनेत या वृत्ती ताब्यात आणण्यावर भर असतो. सर्व योगिक क्रिया आणि साधन यावर अवलंबून आहे. या वृत्तींना एवढे महत्त्व देण्याचे कारण काय? तर, श्रीमहाराज एकीकडे म्हणतात, “विस्मरण ही वृत्ति आहे आणि स्मरण ही कृती आहे”. जीव जेव्हा इथे जन्माला आला तेव्हा गर्भात त्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होते, तिथे तो कारण देहातील जन्मोजन्म साठलेल्या वृत्तींना विसरून आपल्या स्वरूपात स्थित होता; परंतु या जगात येता क्षणी तो ‘कोहं’ म्हणून रडू लागला व जणू सर्व जन्मोजन्मीच्या वृत्तिसंस्काराचा पुनर्संचार त्याच्यात झाला. त्यामुळे भगवंताचा अंश असल्याच्या स्वरूपाचे त्याला विस्मरण झाले आणि म्हणूनच विस्मरणाला महाराज वृत्ति असे संबोधतात. श्रीमहाराजांचे हे वचन इतके वेदांतिक आहे, की बाकीच्या सर्व वृत्तींचा – मनस्थितीचा – मनातील तरंगांचा अंतर्भाव या ‘भगवंताच्या विस्मरणाच्या वृत्ति’ अंतर्गत येतो. जिथे विस्मरण घडले तिथे सर्व अंतस्थ विरुद्ध वृत्ति जन्माला आल्याच!

योग साधनात या एकेक वृत्तींना त्या उगवतील तशा हेरून त्यांचा बिमोड करणे हा उपाय. तर भक्तिमार्गात उठणारी प्रत्येक वृत्ति भगवत् सन्मुख करणे हा राजमार्ग! कसे आहे, वृत्तीचा जन्म अपरा मायेतून झाला. ही माया जरी जीवाला भगवत् विमुख करत असली तरी अगदी भगवत् प्राप्तीपर्यंत तिच्यापासून सुटका नाही. भगवान स्वतःच म्हणतात, ‘मम माया दुरत्यया’!! किंबहुना संपूर्ण साधना ही याच मायेतील देह, मन, बुद्धीकडून आपल्याला करवून घ्यायची आहे. म्हणजे याच मायेला हाताशी धरणे जरूर आहे. ते कसे करावे हेच श्रीमहाराज आपल्याला आजच्या वचनात सांगत आहेत. वृत्ति जिथून उठते तिकडे थोडे लक्ष पुरवले व त्या वृत्तीची दिशा बदलली तर आपल्याला हे शक्य होईल म्हणतात महाराज. पण हे इतके सोपे नक्कीच नाही. कारण वृत्ति उठली रे उठली की ती ऊर्मीत परिवर्तित होते आणि त्या ऊर्मीतून झटदिशी कृती घडते हा सर्वमान्य अनुभव आहे. परंतु, जर अध्यात्मिक शक्ती थोडी जरी जागृत झाली तर मात्र ही वृत्ति आपल्याला लक्षात येणे सुरु होते. आणि ही अध्यात्मिक शक्ती जागृत करणे हे केवळ नामस्मरणानेच शक्य आहे असे महाराज सांगतात. कारण नाम ही एकमेव भगवंताची शक्ती – प्रेरणा – भक्ति अशी आहे जी जीवाच्या अंतरंगाचे परिवर्तन घडवून आणू शकते. हे कार्य सद्गुरूंनी दिलेले नाम असल्यास निश्चित होतेच होते असे सर्व संत सांगतात. कारण माझी माया दुरत्यया म्हणताना भगवंत हे देखील सांगतात की, “मामेव ये प्रपद्यन्ते मायां एतां तरन्ति ते!!” आणि भगवंताला शरण जाण्यासाठी ना योग उपयोगी पडतो, ना माझी शक्ती! शरणागतीचा एकमेव मार्ग म्हणजे सर्व दृष्ट्या बलहीन होऊन त्या विश्वाच्या नियंत्याला अखंड साद घालणे आणि हेच नामस्मरण होय!

म्हणूनच नामाच्या अखंड स्मरणाने वृत्तीचे पोषण त्या नामीच्या चिंतनाने होण्यास प्रारंभ होतो. हळूहळू उठणारी प्रत्येक वृत्ति हे स्मरण घेऊनच उठते म्हणतात महाराज. त्यामुळे जरी ती वृत्तिची दिशा भगवत् विमुख असेल तरी देखील ती स्मरणाने युक्त असल्यामुळे तिची विमुखता बलहीन होते, तिचे ऊर्मीत होणारे रूपांतर टळते आणि मग साहजिकच कृती स्मरणयुक्त घडते. जर एखादी वाईट वृत्ति आपल्याला नाम सुरु असताना देखील पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे कृती करण्यास भाग पाडील तरी देखील ती कृती अंतरंग जळवेल, आतमध्ये शांति वाटणार नाही आणि हीच अशांती आपल्याला हळूहळू वाईट वृत्तींच्या उद्दीपनापासून परावृत्त करेल. अशा रीतीने नामाची साखळी आपल्या वृत्तींना भगवंताशी जोडेल.

श्रीमहाराज म्हणतात, वृत्ति नामात गुंतवून ठेवावी. आणि हीच साधना आहे. संपूर्ण साधनेचा प्राण असेल तर हे महाराजांचे वाक्य आहे. सतत श्रीमहाराजांचे स्मरण – गुरुस्मरण टिकले तर हे शक्य होईल. याचे पुन्हा दोन फायदे होतील. एक म्हणजे आपल्याला महाराजांच्या सततच्या सहवासाचा अभ्यास करणे जमू लागेल व जितका जितकी ही भावना दृढ होऊ लागेल, तसतसे हातून वाईट कृती घडणे हळूहळू अशक्य होईल आणि मग तशी कृती न घडावी यासाठी तिचा उगम असलेल्या वृत्तीकडे आपण सावधपणे बघू. ब्रदर लॉरेन्स त्यांच्या Practice of Presence of God” या पुस्तकात सांगतात, “आपण भगवंतासोबत (सद्गुरुंसोबत) सततचा संवाद प्रस्थापित करावा. हे अतिशय लज्जास्पद आहे की आयुष्यातल्या फालतू छोट्या छोट्या गोष्टींमुळे (वृत्तींमुळे) आपण हा संवाद थांबवतो आणि त्या वृत्तीत गुंततो. त्याऐवजी आपण आपल्या चित्तवृत्ती केवळ भगवंताबद्दलच्या विचारांनी भरून टाकाव्या.” पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, “आपले स्मृती, भावना, कल्पना, विचार सगळे श्रीमहाराजांनी भरून गेले पाहिजेत.”

या सगळ्या मागचा हेतू हा की जी विस्मरणाची वृत्ति घेऊन आम्ही जन्मोजन्म वेगवेगळ्या योनीतून फिरत आहोत, त्या विस्मरणाचे आम्हाला विस्मरण व्हावे इतकी आमची वृत्ति भगवंताच्या – म्हणजेच त्याच्या नामाच्या स्मरणाने तल्लीन होऊन जावी. खरोखर ही नामाची साखळीच अशी एकमेव साखळी आहे जी आम्हाला जन्मोजन्मीच्या कर्मबंधनातून मुक्त करेल व आमचे जीवन सुफळ संपूर्ण होईल. कारण वृत्ति ही वासनेतून निर्माण होते आणि वासनेचे मरण केवळ आणि केवळ भगवंत स्मरणातच शक्य आहे! म्हणूनच पूज्य बाबा नामचंद्रिकेत म्हणतात,

नामाभ्यासेन तेनैव वासना दहति सत्वरम् |
आत्मा प्रकाशते स्वच्छ: नामसाधनतत्पराः ||

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. श्रीराम!
    एखादी वाईट वृत्ति आपल्याला नाम सुरु असताना देखील पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे कृती करण्यास भाग पाडील तरी देखील ती कृती अंतरंग जळवेल, आतमध्ये शांति वाटणार नाही आणि हीच अशांती आपल्याला हळूहळू वाईट वृत्तींच्या उद्दीपनापासून परावृत्त करेल. अशा रीतीने नामाची साखळी आपल्या वृत्तींना भगवंताशी जोडेल!
    वाह! नामशास्त्र किती सूक्ष्म आणि त्याचबरोबर व्यापक आहे, याचे प्रतिपादन आणि दृढीकरण करणारे चिंतन!
    यानूसार आचरण हीच परमसुखाची वाट!

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete