Saturday, May 30, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४४ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४४ –

अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो – नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय.

श्रीराम!
संत सद्गुरूंना उगीच माऊलीची उपमा दिली जात नाही. जसे आधीच्याही एका चिंतनात आपण बघितले तसे संत हे आई व भगवंत हा बाप असे म्हटले जाते. वडलांची शिस्त असते; अमुक अमुक सर्व केलंस तर तुला आवडती गोष्ट मी तुला देईन असं ते म्हणतात. आई मात्र म्हणते, असू द्या हो; तो ‘माझा बाळ’ आहे, आपण देऊन टाकू त्याला! तसे हे आजचे श्रीमहाराजांचे वचन वाचून वाटते. भगवंतांनी अर्जुनाला गीतेचे १८ अध्याय सांगितले, ज्यात ज्ञान, कर्म, योग, भक्ति वगैरे सर्व सांगितले आणि मग अठराव्या अध्यायात शेवटी शेवटी म्हणाले, तू माझा आवडता भक्त आहेस, म्हणून मी आता या सर्वांपेक्षा गुह्यतम अशी तुझ्या कल्याणाची गोष्ट तुला सांगतो. मग भगवंतांनी दोन श्लोकांत या गुह्यतम अशा गोष्टीचे वर्णन केले –

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु|
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे||
-- माझ्या ठिकाणी चित्त ठेव, माझा भक्त हो, माझी उपासना कर आणि मलाच नमस्कार कर, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. माझा तू आवडता आहेस म्हणून मी प्रतिज्ञापूर्वक हे तुला सांगत आहे.
आणि हे होण्यासाठी काय करावे व त्यामुळे काय होईल हे पुढच्या श्लोकात सांगितले,
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज|
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः||
-- सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पातकांपासून मुक्त करीन. तू आपला शोक सोडून दे.

गीता ही मायेत अडकलेल्या जीवांच्या उद्धारासाठी अर्जुनाला आमचा Representative म्हणून ठेवून भगवंतांनी लीला रचली आहे. जीव ‘मीपणा’च्या, अहंकाराच्या आहारी गेलेला असल्याने त्याला एकदम ‘शरणागत हो’ म्हणून सांगून तो होणार नाही. भगवंत जणू म्हणाले, “Let him go through the ordeal of different paths and then come to me devotedly when he will lose the battle!” – सगळे मार्ग अवलंबून बघितल्यावर देखील, अगदी विश्वरूप दर्शन झाल्यावर देखील, म्हणजेच आत्मज्ञान झाल्यावर देखील जेव्हा जीवाची तळमळ संपत नाही, तेव्हा भगवंत थेट भक्तीचा – शरणागतीचा मार्ग सांगतात.

आमच्या गुरुमाऊलीला मात्र ‘आनंदाच्या अंशांची’ विनाकारण चाललेली धडपड आणि तळमळ बघवत नाही. महाराज एकीकडे म्हणतात, ‘या जगात दुःख करावे असे काही नाहीच.’ काय जबरदस्त विधान आहे! या विधानामागचे सत्य, गुह्य महाराज आजच्या वचनात सांगतात – नामाचे प्रेम! ते जणू म्हणतात, कशाला वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे लागून अजून उपाधि ओढवून घेतोस? आहे ती देहाची उपाधि थोडी का आहे? या सर्वांतून मुक्त होऊन अखंड आनंद उपभोगण्याचा मार्ग मी तुला सांगतो, “नाम घे!” आज परमपूज्य तुकामाईंची – श्रीमहाराजांच्या गुरूंची पुण्यतिथी आहे. जे स्वतः नाथपंथीय होते, तरी देखील भक्तिमार्गाला सारभूत मार्ग मानणारे होते व त्यांच्याच आज्ञेनुसार श्रीमहाराजांनी आजन्म केवळ साराचे जे सार अशा रामनामाचा प्रसार केला!

नामस्मरण हे असे साधन आहे, ज्यामुळे वर भगवंतांनी ज्या गोष्टी सांगितल्या, चित्ताचे समर्पण व शरणागती, या सहजच होतात. नाम व शरणागती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनापासून भगवंताचे नाम घेणाऱ्याला सहजच नामाच्या – भगवंताच्या विशालतेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कितीही अहंकारी मनुष्य असला तरी देखील नामाने त्याची सदसद्विवेकबुद्धी जागी झालीच पाहिजे! नामाने अंतःकरणातील घाण वर येऊ लागते. श्रीमहाराज याला विकारांना नोटीस मिळणे म्हणतात. हळूहळू नामाच्याच अनुसंधानाने व गुरुकृपेने जर साधकाने उद्भवणाऱ्या काम-क्रोधादि विकारांकडे नुसते बघायचे व त्यांना entertain करायचे नाही असे ठरवले तर हळूहळू आपले काम आता इथले संपले असे समजून ते विकारच त्या साधकाला सोडून जातात. अशा रीतीने चित्तशुद्धी झाली की मग अजून श्रद्धापूर्वक नामस्मरणाचा अभ्यास होतो व साधक सहज त्या परमदिव्य शक्तीला शरणागत होतो.

आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला नामाचाच अनुभव जणू सांगताहेत. गुह्यातले गुह्य हे निश्चितच अंतिम साध्य असले पाहिजे नाही का? गुह्यतम गोष्ट मिळाल्यावर अजून काही मिळवायचे शिल्लक आहे हा भावच पुसला जातो. म्हणून महाराज म्हणतात, नामाचा अनुभव नामातच येईल! अजून एकीकडे ते म्हणतात,
“सांगतो ते करणे, याशिवाय दुसरे काही न करणे याचे नाव अनन्यभक्ती. या करण्याचा मोबदला मागितला तर त्याला भक्ति कशी म्हणायची? अखंड स्मरणात राहणे, दुसऱ्याची चाड नसणे हा नव्हे का अनुभव? अमुक हवे किंवा नको असे वाटले तर समाधान कसे होईल? नामाशिवाय कशाने काही मिळत नाही हे समजले म्हणजे तो शिकला! सद्गुरू आज्ञा प्रमाण माना व अनुभवाचे पाठीमागे लागू नका. इतके करूनही तळमळ लागत असली तर त्यापेक्षा आणखी काही मिळणे आहे असे नाही का होत? जे सांगितले त्यातच सर्वस्व आहे असे माना, त्यातच सत्य आहे असे माना, मग तळमळ कशी लागेल? गुरू आपल्यामागे येण्यास त्याला जे आवडते ते, म्हणजे नाम घ्या; म्हणजे वासरामागे गायीप्रमाणे ते येतील! नामातच गुरूला पहा!”

हे म्हणजे महाराजांनी आम्हाला परीक्षा देण्याच्या आरंभीच उत्तरपत्रिका तयार करून हातात ठेवण्यासारखे आहे. सर्वोच्च परीक्षकाकडून उत्तर मिळाल्यावर हेच उत्तर बरोबर असेल की नाही, अजून काही वेगळा अभ्यास करू का? असे विचारणे वेडेपणाचे नाही का? म्हणजेच नामाचा अभ्यास सुरु केल्यावर आम्हाला जे विकल्प येतात त्या सर्वांचे कारण आम्ही नामाला हवे तितके दृढ श्रद्धेने न धरल्याने येतात. जो हे सर्व मायिक अडसर दूर ठेवण्याचा प्रयत्न करून नामाला आयुष्याचे सर्वस्व मानेल, त्याला प्रत्येक क्षण हा नामाच्या – नामीच्या – महाराजांच्या प्रेमाच्या वर्षावाचा असेल... असा असेल की ज्याबद्दल बोलणे अशक्य होईल!!!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. श्री महाराज मला आईच वाटते एकदम करुणासागर ,दयासिंधु ..आणि श्री ब्रम्हानंद महाराज वडीलांसारखे नामाला बसतो की नाही की देऊ रट्टे😀
    जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete