Saturday, May 23, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३७ –

विषयाचे विष मन पीत असल्यामुळे त्यासाठी आतून निर्माण होणारेच औषध पाहिजे. असे औषध म्हणजे नाम. मनाने भगवंताचे नाम घेतले तर आतून दुरुस्ती होईल.

श्रीराम!
विष हे दोन प्रकारचे असते. एक विष ते, जे एका स्पर्शात किंवा एका घासात आयुष्य संपवते. असे हे विष स्पष्ट दिसते, जसे काही विषारी पदार्थ, सर्प वगैरे विषारी जनावरांचे विष इत्यादी. या प्रकारच्या विषाला परमार्थ दृष्ट्या महत्त्व नाही, कारण यापासून दूर राहण्यासाठी आवश्यक खबरदारी जितकी म्हणून शक्य आहे तितकी मनुष्य घेतो. दुसरे जे विष ते विष आहे हे लक्षात न येता हळूहळू आपले काम करते व माणसाच्या देह मन बुद्धीला पोखरते. हे विष पहिल्या विषापेक्षा अनंतपटीने घातक असूनसुद्धा त्याकडे फारसे कुणी लक्ष देताना दिसत नाही. जे संतसंगात आहेत, नित्य संत श्रवण करीत आहेत, सत्संगात रमत आहेत त्यांना मात्र हळूहळू आपल्या शरीर मन बुद्धीमधल्या या ‘विषाच्या प्रमाणाची’ जाणीव व्हायला सुरुवात होते. याच विषाला श्रीमहाराज ‘विषय’ असे म्हणतात.

विषयाची व्याख्या करताना श्रीमहाराज म्हणतात,

“भगवंताच्या स्मरणाशिवाय जेथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा.”

“स्वानंदस्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय होय.”

अगदी सहज सरळ व्याख्या आहेत या. ज्यावरून आपण दिवसभरात करत असलेली कर्मे, करत असलेले विचार हे कशामध्ये मोडतात याचे सम्यक आकलन आपल्याला होईल. महाराजांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. जसे या आजच्या वचनात महाराज “विषयाचे विष ‘मन’ पीत असल्यामुळे” म्हणतात, देह नव्हे. याचाच अर्थ आम्ही जे म्हणतो अनेकदा की देवा, तूच आम्हाला या संसाराच्या कर्मांमध्ये गुंतवले आहेस, याला हे योग्य उत्तर आहे महाराजांचे. ते म्हणतात, देह विषयात राहिला तरी बिघडत नाही. किंबहुना भगवंतच निर्वाळा देतात कर्मयोगात की,

नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः||”कुणीही झाला तरी काही ना काही कर्म न करता क्षणभर देखील राहू शकत नाही. प्रकृतीच्या त्रिगुणांनी सर्व प्राणी परतंत्र असल्यामुळे ते गुणच त्यांच्याकडून कर्म करवतात. अगदी सुरु असलेला शासोच्छ्वास हे देखील कर्मच आहे. परंतु जर कर्माची प्रेरणाच वासनेतून – विषयातून आहे, तर मग जे महाराज सांगत आहेत, त्या विषयापासून सुटका होणार कशी? याचेच उत्तर श्रीमहाराज देतात, औषध असे हवे जे आतून निर्माण झालेले आहे. बाह्य औषधाने थोडीफार मलमपट्टी होईल परंतु मुळातून विष-प्रभाव नाहीसा होण्यासाठी आतले औषध हवे. हेच औषध भगवंत आपल्याला दुसऱ्या सांख्यायोगात सांगतात, “युक्त आसीत मत्परः||” ज्याचा भगवंताशी - सद्गुरूंशी सहज योग आहे, जो भगवंताशी सहजतेने जुडलेला आहे तोच या विषयरूपी मायेला परास्त करू शकतो. आपले श्रीमहाराज भगवंताचे हे सांगणे खरे कसे करावे हे आपल्याला सांगतात – हा भगवंताशी सतत सहज विनासायास घडून येणारा योग “नामस्मरणाने” साध्य होतो. नामाचे औषध हे एकमेव असे औषध आहे जे आपल्याला चहु बाजूंनी सहाय्यक ठरते. कसे? –

साधक सद्गुरूंनी दिलेले नाम घेऊ लागला, म्हणजे सर्वप्रथम त्याला वर म्हटल्याप्रमाणे आपल्या आतील विषय वासनेच्या प्रमाणाची जाणीव होऊ लागते. त्यानंतर त्यामुळे तो कसा मायेच्या आधीन होऊन तिच्या तालावर नाचतो आहे याची जाणीव होते. मन – जो खरे तर माझा नोकर आहे, मी जे सांगेन तसे त्याने केले पाहिजे, मात्र तेच मन माझे मालक बनून मला कसे नको त्या बाजूला ओढते आहे याची जाणीव होऊ लागते. नामस्मरण जसजसे खोल जाऊ लागते, तसतसे माझे नामाचे साधन देखील कसे आतून झाले पाहिजे, माझी बहिर्मुखता कशी कमी झाली पाहिजे, याची जाणीव देखील नामच करून देते. म्हणून महाराज वचनात म्हणत आहेत, “मनाने” भगवंताचे नाम घेतले तर! कबीर जसे म्हणतात,

“माला तो कर में फिरे, जीभ फिरे मुख माही|
मनवा तो चहुं दिसि फिरै, यह तो सुमिरन नाही||”

या अर्थानेच महाराजांना हळूहळू आम्हाला पुढच्या इयत्तेत घालायची इच्छा आहे असे दिसते. आधी सुरुवातीला हरकत नाही, कसेही घ्या पण नाम घ्या म्हणाले. परंतु आता तुम्हाला नामाची थोडी का होईना चटक लागली असेल, जेणेकरून मनातल्या खोल कप्प्यातील विषय समजू लागले आहेत आणि ते जावेत अशी इच्छा निर्माण झाली आहे, तर मग नाम देखील आता जास्त मनापासून झाले पाहिजे. प्रत्येक नामागणिक भगवंताचे – सद्गुरूंचे स्मरण टिकले पाहिजे. इतर विचार हळूहळू कमी झाले पाहिजेत. हे सर्व कधी होईल तर जेव्हा आमची बहिर्मुखता कमी होईल तेव्हा होईल. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, TV बघून तुम्ही नामाला बसलात तर विचार जे बघितले त्याचेच येणार यात काय नवल? अशी ही आमची बहिर्मुखता चारही दिशांनी पसरलेली आहे. महाराज म्हणायचे, साधकाने कुणाही बद्दल बोलू नये, विचार करू नये. स्वतःहून तर दुसऱ्याच्या आयुष्यात मुळीच ढवळाढवळ करू नये. पूज्य बाबा खूप छान उदाहरण द्यायचे. म्हणायचे, ‘छान नाम झालं तास दोन तास आणि बाहेर येऊन कुणी भेटल्यावर तुमची सून कशी, माझी सासू कशी? यासारखे बोलणे केले तर नामाने जी सूक्ष्मता मनाला आली होती ती सगळी निघून जाते.’ श्रीमहाराजांच्या, पूज्य बाबांच्या वेळी इंटरनेट नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता, नाहीतर काय उदाहरणे असती लक्षात येणे अवघड नाही. आजच्या घडीला बहिर्मुखता कमी करणारा चांगलाच ताकदीचा असला पाहिजे!  

त्यामुळे जो मनापासून नाम घेईल त्याची दुरुस्ती आतून होईल, म्हणजे ही जी बहिर्मुखता आहे त्याचा दुष्प्रभाव नामामुळे जाणवायला लागून ती कमी करण्याची ऊर्मी नामाच्या जोडीने जाणवू लागेल व मन नामात जास्त जास्त रमू लागेल! देह यथायोग्य कर्तव्यकर्म करेलच मात्र त्याचे मन मात्र सदैव स्वानंदयुक्त असेल. अशा मनुष्याला काय प्राप्त होते सांगताना भगवंत म्हणतात,

“रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्|
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति||”
-- प्रीतिद्वेषरहित व पूर्णपणे स्वाधीन अशा इंद्रियांनी विषयातच वावरणाऱ्या परंतु स्वाधीन अंतःकरणाच्या मनुष्याला ‘समाधान’ प्राप्त होते!

श्रीमहाराजांची सर्व धडपड आम्हाला ‘समाधान’ प्राप्त करून देण्याची आहे आणि म्हणूनच ते अंतरंगाच्या रामबाण औषधाचा – नामाचा इतका अट्टाहास करतात!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete