Monday, May 11, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २५ –

नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढभावना करावी.

श्रीराम!
मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात,
“असे हो जया अंतरी भाव जैसा|
वसे हो तया अंतरी देव तैसा||”
याच अर्थाने म्हटले आहे, “जा की रही भावना जैसी, हरि मूरत देखी तिन तैसी|” थोडक्यात काय तर सबंध भक्तिमार्ग हा भावनेवर अवलंबून आहे. पूज्य बाबा बेलसरे एक छान गोष्ट सांगायचे की ‘विचार उसना घेता येतो पण भावना उसनी घेता येत नाही.’ आणि म्हणूनच आपल्या आनंद-साधनेत ते म्हणाले, “माझ्या प्रापंचिक जीवनात खाजगी, गुप्त किंवा लपवण्यासारखे काही नाही, हे जरी खरे तरी भगवंताचे नाम आणि श्रीसद्गुरूंचे अनुसंधान या दोन चाकांवर चालणारे अंतःकरणातील भावजीवन किंवा प्रेमजीवन मात्र मला आणि श्रीसद्गुरूंनाच संपूर्णपणे माहीत आहे!” हे आहे भावनेचे महत्त्व; ही ज्याची त्यालाच!  

वरच्या वचनात श्रीमहाराज आपल्याला याच भावनेचे महत्त्व समजावून सांगत आहेत. नुसती भावना म्हणत नाहीत महाराज तर ‘दृढ भावना’ म्हणतात आणि खरी जी भावना असते ती अनन्यच असते. दहा दिशांना पसरलेल्या प्रेमाला ‘भावना’ हा शब्द देता येत नाही. भावना ती जी एकाच ठिकाणी केंद्रित असते व मग त्या केंद्राच्या अनुषंगाने त्याच्या संबंधित बाकीच्या गोष्टींवर देखील असते. जसे, पूज्य बाबा म्हणायचे, श्रीमहाराजांवर प्रेम असणे म्हणजेच अखंड नामस्मरण होणे. याचा अर्थ जर केंद्र ‘श्रीमहाराज’ आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने त्यांना जे जे म्हणून आवडते ते शिष्याला – भक्ताला आवडलेच पाहिजे. तरच ती ‘भावना’! महाराजांनी ‘भावना करावी’ म्हटले आहे. म्हणजे साहजिकच आमचे प्रेम दृश्यात विभागले गेल्यामुळे ‘सद्गुरूंनी दिलेले नाम’ यात प्रेम भावना ‘होणे’ सुरुवातीला आमच्यासाठी शक्य नाही. त्यावेळी ‘नामात सत्यतेची भावना करणे’ हेच आमचे ‘साधन’ आहे. थोडा तरी त्या दृष्टीने प्रयत्न केल्याशिवाय आम्हाला नाम घेणे रुचणार नाही. नामाला रंगरूप नसल्याने आणि आम्हाला सगुण रूपाची सवय असल्याने सुरुवातीला श्रीमहाराजांबद्दल प्रेमाची भावना करणे आम्हाला सोपे आहे. अनुग्रहित शिष्यांनी ‘गुरूंनी मला अमूल्य असे नाम देण्यासाठी निवडले’ या सार्थ भावनेपोटी सद्गुरूंना घट्ट धरावे. ज्याने सद्गुरूंना धरले त्याच्यासाठी ‘ज्या गोष्टीला सद्गुरूंनी धरले’ त्या गोष्टीला धरणे सोपे जाते आणि यातच सद्गुरूकडून नाम घेण्याचे महत्त्व आहे.

एकदा ही गुरुभावना दृढ झाली की मग नाम-भावना दृढ होणे सोपे जाते. कारण यात सद्गुरुंवरचा दृढ विश्वास अनुस्यूत असतो. महाराज जे जे म्हणून सांगतात ते ते ‘सर्व’ माझ्या हिताचेच आहे या भावनेने साधनेला लागलेला साधक भरभर प्रगती करतो. प्रगती मोजण्याचा मापदंड म्हणजे नामात सत्यत्वाची भावना किती तीव्र आहे. आपल्याला अतिशय सोपी गोष्ट ही आहे की नाम घेत गेले म्हणजे त्या सद्गुरू प्रदत्त नामाच्या शक्तीनेच ती सत्यत्वाची भावना दृढ होत जाते. त्यासाठी वेगळे काहीही करण्याची जरूर भासत नाही. आणि सत्यत्वाची भावना आली की नाही हे तपासण्याचे साधन म्हणजे ‘मला किती मनापासून नामात रहावेसे वाटते, नामावाचून चैन पडत नाही!’ हे तपासणे होय.

पूज्य बाबा एकीकडे म्हणतात, “नाम घेत गेल्याने ज्याचे ते नाम आहे तो भगवंत आहेच आहे ही भावना दृढ होत जाते. आपण अल्पज्ञ, अल्पशक्ति व अल्पसुखी आहोत, तर भगवंत सर्वज्ञ, सर्वशक्ति व पूर्ण सुखी आहे हा विचार नंतर मनामध्ये स्थिरावतो. प्रत्येक नामाबरोबर भगवंत माझा आश्रय व मी त्याचा आश्रित, तो माझा स्वामी व मी त्याचा सेवक, तो माझा रक्षक व मी त्याचा रक्षणीय असे भाव आपोआप निर्माण होऊ लागतात. त्यांच्यामधून शरणागत होण्याची लालसा निर्माण होते. अखेर भगवंताचे नाम सतत असे सुचवते की आपले कर्तेपण आपल्या आड येते. तेच एकदा भगवंताच्या पायी अर्पण केल्यावाचून साधकाला चैन पडत नाही. मग साधकाच्या अंतःकरणातच भगवंताच्या सूक्ष्म स्वरूपाचा अविर्भाव होतो. एकाच हृदयात जीवशिव दोघेजण एकासनी नांदू लागतात. तात्पर्य, भगवंताच्या नामाने मिळणाऱ्या मनाच्या शांतीपुढे जगातील सत्ता व वैभव कःपदार्थ वाटतात!”

जशी भावना तसे फळ. पण श्रीमहाराजच म्हणतात त्याप्रमाणे भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही! मगाशी म्हटल्याप्रमाणे ही भेसळ टाळण्यासाठीची अनन्यता देखील नामाच्याच सततच्या सोबतीने साधते. त्यामुळेच एका वाक्यात महाराज म्हणतात, “नामापरते न सत्य मानावे!” ही एक भावना ज्याने हृदयाशी दृढ धरली त्याला त्याचे फळ – शाश्वत समाधान व शांति मिळालीच पाहिजे हा महाराजांचा दावा आहे!

||श्रीनाम समर्थ||

5 comments:

  1. "एकदा ही गुरुभावना दृढ झाली की मग नाम-भावना दृढ होणे सोपे जाते." खूप भावलं! नामाप्रति निर्भेळ भावजागृतीसाठी फार महत्त्वाचे चिंतन मांडले! जय श्रीराम!!! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  3. श्री राम जय राम जय जय राम

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete