Friday, May 8, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २२ –

नाम हे घराच्या छपराप्रमाणे आहे. इतर साधने खोल्यांप्रमाणे आहेत.

श्रीराम!
श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, अनन्यते शिवाय परमार्थ नाही. ‘अनन्यता’ या शब्दाचे अनेक आयाम आहेत. अनन्यता हा शब्द एककेंद्री दृष्टी दर्शवत असला, तरी ही एककेंद्री दृष्टी एकदम तशी होत नाही. एकदम तशी दृष्टी होणारे कृपापात्र पूर्वजन्मीचे अधिकारी सत्पुरुष. मात्र बहुतेकांचा प्रवास हा अनेकत्वातून एकत्व, बहुकेंद्री दृष्टीकडून एककेंद्री दृष्टी असा असतो. या अर्थाने अनन्यतेचा अर्थ विविधतेतून एकवटून एका ठायी स्थिर होणे असा करता येईल. त्यातही पुन्हा ‘स्थिर होणे’ ही पुढची पायरी; त्या आधी ‘स्थिर करणे’ यालाच साधना म्हणतात. मुळात प्रत्येक जीवाला ही अनन्यतेची कळत नकळत ओढ असते. कारण त्याला माहित असो वा नसो, त्याचा उगम हा एकाच केंद्रातून – त्या परमात्म्यातून झालेला असल्याने त्या केंद्राकडेच त्याची ओढ असते. हे केंद्र म्हणजेच आनंद! भगवंत आनंदकंद आहे आणि आपण त्याचे अंश आहोत; असे असल्यामुळे त्या एकाच केंद्राकडे आपली ओढ आहे. प्रत्येक मनुष्याची धाव वेगवेगळ्या मार्गाने त्या आनंदाकडेच आहे; फक्त नेमके केंद्र कोणते याबद्दल न कळल्याने (विसरल्याने) त्याच केंद्राच्या ओढीने तो अनेक दिशांनी धावतो.

मात्र जेव्हा सद्गुरू उपदिष्ट मार्गाने साधन सुरु होते, तेव्हा सद्गुरू त्याला ‘नाम’ देतात. हे नाम म्हणजेच त्या मूळ केंद्राचे ओळखपत्र होय. या सद्गुरूंनी अनुभवून, तद्रूप होऊन दिलेल्या पत्त्याच्या दिशेने जर प्रवास घडला तर मात्र आपण न चुकता मुक्कामी पोहोचतो हे निश्चित. किंबहुना पत्ता देणारा, ओळखपत्र आणि मुक्काम हे तिन्हीही एकरूपच आहेत हे प्रवासात लक्षात येऊन प्रवासी देखील अनुभवरूप बनतो! पण हे एवढ्याशा परिच्छेदात सांगितले तरी ते आचरणे इतके सोपे नाही. किंवा असे म्हटले पाहिजे, की सोपे असलेले आम्ही आमची चहू दिशांनी धावण्याची खोड न सोडल्यामुळे आमच्यासाठी ते अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सद्गुरूंना सतत आम्हाला केंद्राकडे खेचून नेण्यासाठी बोध द्यावा लागतो. वरच्या एका ओळीत श्रीमहाराजांनी आम्हाला ‘अनन्य रहा’ हा जणू इशारा दिलेला आहे. समर्थ म्हणतात,

“नाना पंथ नाना मते| भूमंडळी असंख्याते||
आता शरण कोणा जावे| सत्य कोणते मानावे||”

या प्रश्नाचे एकच उत्तर सर्व संतांनी दिले, “सद्गुरू प्रदत्त मार्ग”!!!

श्रीमहाराज एकीकडे म्हणतात, गुरूने सांगितलेल्या मार्गाने चालावे; मधूनच दुसरा मार्ग घेतला तर मुक्कामी कधीच पोहोचणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात, “नामापरते सत्य न मानावे!” आणि ही अनेकानेक संतांची प्रत्यक्ष जिवंत अनुभूती आहे की नामाशिवाय जीवाला विश्रांती मिळणार नाही! असे प्रत्यक्ष नामावातार श्रीमहाराजांनी आम्हाला सांगितल्यावर देखील आम्ही नामाच्या जोडीने योगाची साधनाही करू, ज्ञानमार्ग देखील अधूनमधून आम्हाला खुणावतो; मग भक्ति सोडून आम्ही ज्ञानमार्गाचे श्रवण वाचन करतो हे सर्व आमच्या अनन्यतेत बाधा आणते. परंतु श्रीमहाराजांना आमची खोड माहीत आहे व ती माऊली आम्हाला सगळे सोडा असे म्हणाली तरी आम्ही ऐकत नाही अशी लेकरे आहोत. म्हणून मग महाराज थोडे नरमाईने घेतात व आम्हाला सांगतात, की इतर साधने चूक असे नव्हे पण जर तुम्ही घरात राहत आहात तर घराच्या खोल्या जास्त महत्त्वाच्या की छप्पर? छप्पर आहे म्हणून खोल्या आहेत; खोल्या नसल्या तरी चालेल, छप्पर मात्र असलेच पाहिजे. तद्वत, “नाम हे घराचे छप्पर आहे आणि इतर साधने खोल्या आहेत” म्हणतात महाराज.

हे शरीर – मन - बुद्धी जणू घर आहे आपले आणि त्यांचा भगवंताप्रति एकविध भाव टिकवण्यासाठी नामाचे छप्परच आवश्यक आहे; ज्यायोगे मन-बुद्धीत सद्गुरूंनी पेरलेले नाम-बीज सुरक्षित राहील.

पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, आपली साधनेतली गडबड ही आपले ध्येय निश्चित झालेले नसल्यामुळे आहे. मोनो-आयडीझम – एकविध भाव – याला खतपाणी घालेल असेच वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे, ऐकले पाहिजे म्हणायचे. हा अभ्यासच आहे. म्हणूनच अनेक दिशांना विखुरलेल्या आपल्या मनाला एकदेशी, एकविध करण्यासाठी नामाखेरीज अन्य उपाय नाही! हे भान आम्हाला लवकर येवो ही प्रार्थना आपण सद्गुरुंजवळ करावी; म्हणजे मग श्रीमहाराज नामाला का एवढे महत्त्व देतात, कदाचित या प्रश्नाच्या उत्तराला याच देहात निदान स्पर्श करण्याचे भाग्य त्यांच्या कृपेने आपल्या मिळेल! ते म्हणतात,

नाम जपा रात्रंदिन| नलगे शास्त्रांचे शोधन||
वाया गेले शास्त्राध्ययन| वाचोनि अवघाचि भ्रम||
नको नको आत्मज्ञान| नामाविणे आहे शीण||
नलगे मानवाची आस| नाम जपा श्वासोच्छवास||
दीनदास म्हणे रघुनाथ| सर्व पुरवी मनोरथ||  

हे जर असे आहे, तर उगीच काखेत कळसा आणि गावाला वळसा या न्यायाने सर्व मार्ग, सर्व साधने फिरून आल्यावर मग शेवटी नाम हेच खरे हे लक्षात येण्यापेक्षा आधीच जर गुरूंनी सांगितलेल्यावर विश्वास ठेवला की ‘नामात सर्व साधने येतात!’ तर आमच्या उगीच उठाबशा काढण्याच्या चुकतील व आम्ही प्रत्येक स्टेशनावर थांबणारी passenger गाडी न घेता direct गाडीने मुक्कामी पोचू!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. एकदेशीय साधनेतूनच एकत्वाची अनुभूती! नामाप्रती अनन्यतेची अनिवार्यता मनावर कोरली गेली! श्रीराम समर्थ!!! 🙏🌿🙏

    ReplyDelete