Friday, May 1, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १५ –

नामाची गंमत अशी आहे की, नामांत मनाला उलटे केले जाते. (म-ना चे ना-म बनते)

श्रीराम!
श्रीमहाराज एकदा म्हणाले, “परमार्थ साधण्यासाठी घर सोडून कुठे जायची आवश्यकता नाही. जसा एक self-contained block असतो, जिथे सर्व काही त्या block मध्ये – त्या घरामध्ये असते. त्यामुळे तिथे राहणाऱ्याला बाहेर जाण्याची जरूर नसते. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्येच परमार्थाची सगळी व्यवस्था आहे. आपण कुठेही गेलो तरी ती व्यवस्था आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो.” जर असे आहे, तर कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भगवंत सन्मुख किंवा सत्य-शाश्वत-सन्मुख राहता येणे सहज जमले पाहिजे. मग ते तसे जमत का नाही? याचे उत्तर ‘मन’!

याचे उत्तर दोन उपनिषदांमध्ये स्पष्ट दिले (ब्रह्मबिन्दूपनिषद व अमृतबिन्दूपनिषद),

‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो: |
बन्धाय विषयासक्तं मुक्तै निर्विषयं स्मृतम् ||’

मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मुक्तीचेही कारण आहे. ते विषयासक्त असेल तर बंधनाचे कारण आहे आणि जर निर्विषय असेल तर तेच मन मुक्तीचे – मोक्षाचे कारण आहे. म्हणूनच ‘मनाचे श्लोक’ लिहून समर्थांनी या मनाची मुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी ‘मना सज्जना’ म्हणत मनधरणी केली. मनाला एवढे महत्त्व का? तर मनाच्या तळाशी जन्मोजन्म गोळा केलेले संस्कार धारण करण्याची शक्ती आहे. ते संस्कार मनुष्याच्या विविध मानसिक प्रतिक्रियांचे कारण आहेत. मानसिक प्रतिक्रियांनाच वृत्ति म्हणता येईल, ज्यातून कर्म करण्याची ऊर्मी जन्म घेते व ऊर्मीचे रूपांतर कृतीत होते. हे असे अनंत काळाचे संस्कार साहजिकच मनुष्याला बहिर्मुख इंद्रिय वृत्तींकडे वळवतात. याच मनाच्या बाहेर धावण्याच्या स्वभावामुळे मनुष्य प्रवाहपतित झाला, होतो आहे. निसर्गाने म्हणा किंवा भगवंताने म्हणा, ज्या अनेकविध धोक्याच्या सूचना आम्हाला दिल्या – देत आहे, त्याकडे काणाडोळा करण्याचे कारणही हेच उपद्व्यापी मन होय.

परंतु, जसे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, तसे विवेकवंत संतांनी या मनाची चांगली बाजू तपासली, त्याला हाताशी धरला आणि याच मनाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्यासाठी तयार केले. तेव्हा त्यांना असे आढळून आले की मनाला वळवण्याचे दोन मुख्य उपाय आहेत. एक उपाय असा की विवेक सतत जागा ठेवत ज्या ज्या म्हणून वृत्ति मनामध्ये उठतील त्यावेळी सावध राहून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. हा ज्ञानमार्ग होय, सांख्यमार्गींनी यावर भर दिला. परंतु कलियुगातील भक्तिमार्गी संतांच्या असे ध्यानात आले की अशा मार्गाने मन वळवणे व त्याला किमान दुष्प्रवृत्तींपासून रोखणे हे देखील अतिशय अवघड आहे; कारण ते मन आपल्या मूळ स्वभावानुसार सारखे अधोगतीस जाते. मग त्यांनी दुसरा मार्ग शोधला. लहान मूल जर एखादी गोटी तोंडात घालत असेल तर आई ओरडते, गोटी तोंडात घालू नकोस. पण ते मूल काही ऐकत नाही. मग ती आई काय करते? तर त्याला असे एखादे चांगले खेळणे देते जे त्याचे लक्ष वेधून घेईल व तो गोटी विसरेल. ही आईची युक्ती सफल होते. त्याचप्रमाणे संतांनी बाहेर धावणारे, शंभर व्याप करणारे मन वळवण्याचा उपाय शोधला, त्याला अशा वरच्या पातळीवर न्यायचे जेणेकरून ते खालचे व्याप हळूहळू विसरेल. आणि ही वरची पातळी म्हणजेच अखंड भगवंत स्मरण. या भगवंत स्मरणाचा उत्तम उपाय, ज्यात अव्याहत स्मरण टिकेल तो म्हणजे भगवंताचे नाम!

गंमत अशी की ‘मना’ लाच उलटे केल्यावर ‘नाम’ येते; म्हणजेच मनाची बाहेरची धाव कमी कमी होऊ लागली की मगच –
१) नामात रुची येते,
२) नाम जास्त जास्त घ्यावेसे वाटते,
३) नामाचे महत्त्व कळते,
४) नामाला इतर सर्व व्यवहारातल्या गोष्टींपेक्षा अधिक किंमत दिली जाते
५) नामात हरवलेला आनंद गवसतो
६) बाहेरची धाव कमी होऊ लागल्याने आहे त्यात समाधान वाटू लागते
७) अधिकाधिक ओढ त्या नामीच्या आतल्या सहवासाची, संभाषणाची लागते,
८) नाम देणाऱ्या गुरूंचा मार्ग अनुसरावा व त्यांच्या आज्ञेत राहावे असे स्वाभाविकच वाटू लागते
९) लौकिक वस्तू - मान मर्यादेची इच्छा, पैशाची आसक्ती, जननिंदेचे दुःख, सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहायची वृत्ति, वगैरे गोष्टी हळूहळू कमी होऊ लागतात.
१०) आतमध्ये आनंद लहरींचा स्वच्छ स्पष्ट अनुभव येतो.

अशा रीतीने जे मन संतांनी हाताशी धरून त्याला घडवण्याचे ठरवले, ते जर एकदा नामाच्या सहवासात घडले तर तेच संस्कार त्याच्या मुळाशी कायम निवास करून ते पुढच्या जीवाच्या गतीसाठी सहाय्यभूत होतात.

श्रीमहाराजांची आपण नाम जपावे, नामात राहावे यासाठीची तळमळ ही केवळ आपल्या मनाच्या गाभ्यात असलेला ‘साठा’ सुधारून, त्याचे परिवर्तन करून आपल्याला शाश्वत आनंद मिळावा यासाठी आहे! कान्हनगडला जे स्वामी रामदास म्हणून होऊन गेले, त्यांना एकाने विचारले, मन ताब्यात यावे यासाठी आपण काय केलेत? ते म्हणाले, मी मन ताब्यात येण्यासाठी काही केलेच नाही. फक्त नाम जपले. आणि असेच नाम जपत जपत एक दिवस ते मन नाहीसेच झाले!!!
याचाच अर्थ मनाने आपले जन्मोजन्मीचे संस्कार पूर्णपणे सोडले व त्यावर नाम-संस्कार होऊन ते भगवद्रूप झाले! अनेक नामनिष्ठ संतांचा हा स्पष्ट अनुभव आहे की याच मनाला हाताशी धरून, त्यावर नाम-चिंतनाचे संस्कार करून, याच मनावर आम्ही स्वामित्व गाजवले.

रोज सद्गुरूंनी सांगितले म्हणून काही ठराविक माळा जपणाऱ्यांना देखील माळ करताना एक प्रकारचे समाधान व चिंता काळजी यातून मुक्तीची भावना सुखावते. जे साधक नामालाच सर्वस्व मानून आपल्या जीवनाचे ध्येयच ‘त्या नामाचे प्रेम आपल्याला यावे’ हे मानतात व यासाठी गुरु-प्रार्थना व साधन यांना सर्वोच्च स्थान आयुष्यात देतात त्यांच्याबद्दल काय बोलावे? त्यांची खूण श्रीमहाराज एका पत्रात सांगतात. म्हणतात,

“चित्त जडल्याची खूण | 
रामनामात हयगय करू नये जाण ||
रामनाम अंतःकरणाचे आत | 
बाह्य प्रारब्ध वागवी तसे राहात ||
तेथे काही इच्छा न होता राहे निभ्रांत ||”

आणि अशाच नामप्रेमी साधकासंदर्भात समर्थ म्हणतात,

“निवाला मनी लेश नाही तमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||”

||श्रीनाम समर्थ||




1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete