Thursday, April 30, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १४ –

नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. काही काळ तो त्या अवस्थेत राहील. त्यातून थोडा खाली आला तर त्याची दृष्टी निराळी असेल; पण नाम पचले की मग तो साध्या माणसासारखाच दिसेल.

श्रीराम!
श्रीमहाराज एका अभंगात म्हणतात,
“श्रीराम म्हणा मुखी राम म्हणा मुखी | तेणे सर्वसुखी होशील तू ||
धन्य तो जगी होय रामदास | संसारी उदास असोनिया||”

हेच परम सुख सर्व संतांनी अनुभवले. ज्ञानियाच्या राजाचे गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ एका अभंगात म्हणतात,

“हरिविण दैवत नाही पै अनुचित्ती | अखंड श्रीपती नाम वाचे ||
राम कृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती | नित्य नामे तृप्ती जाली आम्हां ||
नामाचेनि स्मरणे नित्य पै सुखात | दुजियाची मात नेणो आम्ही ||
निवृत्ती जपतु अखंड नामावळी | हृदयकमळी केशीराज ||”

श्रीमहाराज म्हणतात, नामाबद्दल ज्याची शुद्ध बुद्धी, तोच संत! आणि अशी शुद्ध बुद्धी केवळ हरिनामाच्या ‘आश्रयानेच’ साध्य होते. नामाचा आश्रय म्हणजेच नामीचा आश्रय हे सर्व संतांनी ठासून सांगितले. वरच्या वचनात श्रीमहाराज जे म्हणतात, त्या नामाचा आनंद असा आहे की मनुष्य स्वतःला विसरेल. सर्व अध्यात्म साधनेचे फळ आहे ‘खोट्या मी ची विस्मृती’! श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, जर भगवंताने विचारले की तुला काय पाहिजे तर मी म्हणेन, माझी मीपणा ची जाणीव काढून घ्यावी, कारण मीपणाची जाणीव परमार्थात फार घात करते. नाम साधनेने काय होते हे सांगताना सर्व सत्पुरुष अंतःशुद्धी वर भर देतात, याचे कारण नामाने आतून सुधारणा घडून मनुष्य ‘मी, माझे, मला’ या त्रयीच्या कचाट्यातून सुटतो. याच त्रयीच्या आधाराने मनुष्याचे जग असते. आम्ही दिवसभरात जेवढा म्हणून जगाचा विचार करतो, तो माझ्या संदर्भातले जग असाच असतो; विचार केला तर हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. म्हणून नामाने अंतःशुद्धी होत ज्याला मीपणाचा विसर पडला, त्याला साहजिकच जगाचाही विसर पडला. नामाची ‘आनंदावस्था’ याचे मूळ इथे आहे.

साधकावस्थेत सतत वरच्या अभंगांमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘दुजियाची मात नेणो आम्ही’ किंवा ‘संसारी उदास असोनिया’ या संत वचनांचे भान ठेवून साधकाला संसारापासून मनाला ओढून नामाकडे – साधनेकडे लावावे लागते. पण ज्याच्यावर नामाची कृपा झाली (त्याने नामाशिवाय इतर सर्व ‘आश्रय’ वर्ज्य केल्यामुळे), त्याला संसाराचा विचार सोडावा लागत नाही; तो विचारच त्याला सोडून जातो व त्यामुळेच तो नामानंदात निमग्न होतो. ही अवस्था नामाला सर्वस्व मानून गुरु-आज्ञेने चालणाऱ्या प्रत्येक साधकाच्या आयुष्यात येतेच. श्रीमहाराज म्हणतात, याच शांत, निर्द्वंद्व, भाव समाधी सदृश अवस्थेमध्ये तो साधक काही काळ राहतो. ही गुरुकृपेने आलेली साधकावस्थेतील सर्वोच्च अनुभूती होय. त्याचे संपूर्ण साधक आयुष्य सद्गुरू आपल्या हातात घेतात व त्याला ‘चालविसी हाती धरोनिया’ हा अनुभव येतो.

महाराज म्हणतात, ‘काही काळ तो त्या अवस्थेत राहील.’ हा जो काळ आहे तो गुरु-शिष्य संबंधाचा पर्वकाळ म्हणता येईल. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात जे म्हणतात, “जीवू परमात्मा दोन्ही, बैसवूनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती” ही जिवंत अनुभूती तो शिष्य अनुभवतो. याच कालावधीत त्याला आपल्या गुरूच्या कृपेचा वसंत अनुभवता येतो. याच कालावधीत त्याला गुरू आणि भगवंत यातील अभेद प्रत्ययास येतो. याच कालावधीत तो नित्यतृप्त अवस्था आणि तरीही नामातली अतृप्ती अनुभवतो!

यातून तो थोडा खाली आला, म्हणजे, गुरूने त्याला या जगात काही कार्य करण्यासाठी अथवा सामान्य लौकिक आयुष्य जगून साधनेतला आनंद उपभोगण्यासाठी नेमले, तर मग तो कायम लौकिक आयुष्याच्या परती अशी तरंगती अवस्था अनुभवतो. लौकिक जीवनातील सुख-दुःख, चढ-उतार यांच्याशी त्याचा संबंध उरत नाही. काही साधक त्यात सहभागीही होऊ शकत नाहीत; मात्र काही गुरुकृपेने सहभागी होत असल्याचे दाखवू शकतात. जगाची स्तुती निंदा त्याच्या साधनेवर यत्किंचितही परिणाम करू शकत नाही. सद्गुरूंची आज्ञा त्याला पदोपदी मार्गदर्शन करते व त्यानुसारच त्याच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय असतो – घ्यावा लागतो. ही निराळी सूक्ष्म दृष्टी त्याला केवळ आणि केवळ गुरु आज्ञेत राहून केलेल्या अलौकिक अशा नाम साधनेने प्राप्त होते. भगवंत जे गीतेत वचन देतात, ‘ददामि बुद्धियोगं तं’ तो निश्चल बुद्धियोग प्राप्त झाल्यामुळे नामाच्या अद्वितीय स्वरूपाचे सार्थ दर्शन त्याला होते; परंतु, याच्याही पुढे जाऊन जेव्हा त्याला गुरुकृपेने नाम पचते, म्हणजे त्या नामाचे भव्यदिव्य स्वरूप त्याच्या ठायी जिरते, तेव्हा आत्मानंदात राहूनही तो जगाचा कारभार अलिप्तपणे करू शकतो.

हीच बहुतेक सर्व संतांची अवस्था असते, जे गुरु-भगवंत आज्ञेने प्रवृत्ति मार्ग स्वीकारून अमाप भगवत् कार्य जगात करतात. जे श्रीमहाराज म्हणतात, “उपासनेचा जोर पाठीशी आहे तोच जगात खरे कार्य करतो” ते वास्तविक अशा महानुभावांच्या संदर्भात आहे. आणि हे असे संत ओळखणे अत्यंत कठीण आहे. जोवर ते स्वतः आपली खरी ओळख देत नाहीत वा जोवर गुरुकृपेने आम्हाला ती दृष्टी आलेली नाही, तोवर अनेकदा अशा संतांचा उपहासच होतो. अर्थातच त्यांना त्याचे सोयरसुतक नसते, कारण त्यांना ‘निजसुखाचा नाम-साठा’ गवसलेला असतो!

||श्रीनाम समर्थ||





2 comments:

  1. गुरूकृपेचा वसंत, सद्गुरू-नाम-नामी यांच्यातील अभेदाची, अभिन्नतेची अनुभूती आणि नामप्रेमातून येणारी अत्युच्च अतृप्त तृप्ती! आहाहा!!!
    केवळ वाचून भरून पावलो; अनुभवायला मिळालं तर क्या बात! पुन्हा पुन्हा वाचेन; कारण त्या त्रिगुणातीत अनुभूतीची लालसा पेटून उठली,तरच कल्याण! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete