Tuesday, April 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५ –

नामाचे साधन हे ‘फास्ट’ गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोचवते.

श्रीराम!
साधनाचे महत्त्व आणि किंमत वाढत जाण्यास परमार्थात काही परिमाणे आहेत-- 
(१) साधन किती सुलभ व सहज आहे
(२) साधन किती आनंददायक आहे
(३) साधन दृश्यापासून किती विलग आहे
(४) साधन साध्याच्या किती जवळ आहे

या चारही परिमाणांना पुरून उरेल असे असेल तर केवळ भगवंताचे नाम आहे! उपनिषदात भगवंताला म्हटले आहे, “रसो वै सः||” म्हणजे भगवंत हा रसरूप, आनंदरूप आहे. भगवंतामध्ये रस आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे असे म्हटलेले नाही हे ध्यानात येते. तो स्वतः आनंदरूपच आहे असे म्हटले आहे. त्याच धर्तीवर वरचे चारही मुद्दे नामाच्या संदर्भात बघता येतील.

(१) नाम हीच सुलभता आणि सहजता आहे. नामाच्या साधनेसाठी जिवाला कसलीही आटाआटी करण्याची जरूर नाही. आपण जिथे असू तेथे, कोणत्याही परिस्थितीत, कशाही वातावरणात नाम घेऊ शकतो; किंबहुना शासोश्वासी नाम जपावे हाच आग्रह सर्व संत करताना दिसतात. आणि श्वास किती सहज आहे! तितकेच सहज नाम अभ्यासाने जमू शकते.
(२) नाम खचितच आनंदरूप आहे. नामैव परमानंदो म्हटलेले आहे. येथे आनंद चा अर्थ लौकिक सुख नव्हे; त्याला दुःखाची बाजू असते. जो खरा आनंद असतो, तो सूर्यासारखा असतो. सूर्याला जसा अंधार माहिती नाही, तद्वत नामाच्या आनंदाला दुःखाची बाजूच नाही. कारण, या जगातील सुख आणि दुःख हे उपाधींवर अवलंबून असते आणि नाम हे संपूर्णपणे निरुपाधिक आहे आणि तसे ते असल्यामुळेच आनंदरूप आहे!
(३) निरुपाधिक सद्वस्तु दृश्यापासून विलग असेलच यात काय संशय? अद्वैत वेदांतामध्ये दृश्याला मिथ्या म्हटले आहे किंवा केवळ सद्वस्तु चे एक projection म्हटले आहे. त्यामुळे या दृश्यातील जी जी म्हणून साधने आहेत (योग, याग, तप, देहदंडण वगैरे), ती बव्हंशी मूळ तत्त्वाच्या एका आयामातून आलेली आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. परंतु, नाम हा विश्वाच्या उगमाचा हुंकार आहे, राम हे तत्त्वच विश्वाचा उगम आहे आणि उगम हा मायेच्या पलीकडे असतो. त्यामुळे नाम हे दृश्यापासून विलग आहेच यात शंका नाही.
(४) सत् असा परमात्मा चित् रूप झाल्या झाल्या जे प्रकट झाले ते नाम! (इच्छा असलेल्यांनी चरित्रातील श्रीमहाराज आणि तुकाराम बुवा वलव्हणकर यांमधील संवाद वाचावा) आणि असे हे सत् चित् एकत्र येऊन पराशक्ती द्वारा आनंद निर्मिती झाली! तेच सच्चिदानंद परमात्म्याचे रूप! त्यामुळे अगदी तार्किक रीतीने देखील हे स्पष्ट होते की नाम आणि नामी किंवा भगवंत यांत भेद नाही! त्यामुळे नाम साधन हे साध्यरूपच आहे यात मुळीच शंका नाही!

श्रीमहाराज जे म्हणतात, “नामाचे साधन ‘फास्ट’ गाडीप्रमाणे आहे”, याचे कारण हे! श्रीमहाराज अजून एकीकडे जे म्हणतात, जो नाम घेईल त्याच्या मागे पुढे मी घोटाळत राहतो, तसे केल्याशिवाय भगवंताला गत्यंतर उरत नाही, याचेही कारण हेच! की साधक नाम घेऊ लागला याचाच अर्थ प्रत्येक नामागणिक तो सद्वस्तु च्या निकट चालला. भक्त म्हणेल, मला सगुण रामाच्या सन्निध राहून दास्यभक्ती करायची आहे आणि ज्ञानी म्हणेल मला त्या शाश्वत राम तत्त्वाशी एकरूप व्हायचे आहे! आंतरिक भाव कोणताही असला तरीही नाम साधन त्या साधकाला त्याच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहायचे नाही हे निश्चित!

बाह्य साधने करणाऱ्यांना बहुतेक वेळा साधनात काही सिग्नल्स किंवा संकेतस्थळे अपेक्षित असतात. प्रकाश दिसणे, सुगंध येणे, आवाज ऐकू येणे, रंग किंवा चांदण्या दिसणे आणि काही लहान मोठ्या सिद्धी या त्या गोष्टी होत. नेमाने केलेल्या नामानेही काहींना हे अनुभव येतात. परंतु या वचनात श्रीमहाराज मुद्दाम हे सांगत आहेत की हे अनुभव आले म्हणजेच तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना इतरही अनेक ठिकाणी महाराजांनी सावध केले आहे, की हे संकेत अनेकदा साधकाला त्याच्या मार्गावरून भ्रष्ट करतात, कारण मग साधक त्यात अडकतो आणि त्याचा पुढचा मार्ग अवरुद्ध होतो. पूज्य बाबा बेलसरे यांनी एका प्रवचनात श्रीमहाराजांनी दिलेले एक सुंदर उदाहरण सांगितले आहे. ज्याला या प्रकारचे अनुभव येऊ लागतात किंवा काही सिद्धी नाम साधनेने येऊ लागतात, त्यांना सद्गुरू सांभाळतात. कसे? तर, श्रीमहाराज एक उदाहरण द्यायचे, एक घोडा होता. त्याच्यावर स्वार होऊन रोज एक घोडेस्वार एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचा. रोजचा तोच रस्ता. पण हा रस्ता एका जंगलातून जायचा आणि जंगल आले म्हणजे तो घोडा बुजायचा आणि नीट पुढे जायचा नाही. मग हा स्वार काय करायचा, की ते जंगल सुरु व्हायच्या आगोदर घोड्याला जोरात टाच मारायचा की तो घोडा चौखूर उधळून वेगाने धावू लागायचा आणि त्या नादात जंगल पार व्हायचे! तसे महाराज म्हणाले, जेव्हा असे लौकिक अनुभव किंवा सिद्धी साधकाला येतात, तेव्हा असे काहीतरी सद्गुरू घडवून आणतात की त्या सिद्धी राहतात बाजूला आणि हा त्यांना त्यागून किंवा ओलांडून पुढे जातो आणि ही खरी सद्गुरूची कृपा आहे म्हणतात महाराज!

आपलं प्राप्तव्य काय आहे हे क्षणभर देखील नजरेआड होऊ नये यासाठी हे श्रीमहाराजांचे वचन आहे. भगवंत – अखंड समाधान – शाश्वत आनंद हे आपले मनुष्य जन्मातील प्राप्तव्य आहे. एक संत सांगायचे, अशी छोट्या छोट्या सिद्धी रूपी आमिषे मला जेव्हा भगवंत साधन मार्गात देऊ लागला, तेव्हा मी त्याच्यासोबत भांडण आरंभले. “तू काय मला लहान लेकरू समजलास होय? लेकरू आईला त्रास देऊ लागले की आई त्याच्यासमोर काहीतरी खेळणे टाकायची आणि तात्पुरते ते लेकरू शांत व्हायचे. तसे या लहान सहान अनुभवांचे, सिद्धींचे खेळणे टाकून तू मला शांत करू बघतोस होय? मुळीच नको. भगवंता, मला तू हवा आहेस आणि तू मिळाल्याशिवाय तुझे हे लेकरू शांत होणार नाही!” 
साधनेतील वरवरचे अनुभव, सिद्धी यांची किंमत यावरून स्पष्ट व्हावी!

आणि म्हणून साधन जितके उपाधिरहित, तितके ते साधन करणारा हळूहळू का होईना उपाधिरहित होऊ लागतो; निदान उपाधिरहित व्हावे अशी आस तरी त्याच्यात निर्माण होते आणि तो सरळ त्या शाश्वत तत्त्वाच्या कुशीत जाऊन विसावतो!

||श्रीनाम समर्थ||




3 comments:

  1. अतिशय महत्त्वाचे चिंतन! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  3. उपाधी रहित होऊ लागतो ,सहज नाम,भगवंताची प्राप्ती हे साध्य श्रीराम।

    ReplyDelete