Monday, April 27, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ११ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ११ –

आयुर्वेदाने रोग मुळापासून जातो. पण त्याला वेळ लागतो. तसे नामाने वेळ लागेल, पण सर्व रोग मुळापासून जाईल. इंग्रजी औषधाने रोग वरवर नाहीसा होतो किंवा इंजेक्शन दिल्याने दुःखाची जाणीव कमी होते, पण रोग आत असतोच. तसे इतर साधनाचे आहे.

श्रीराम!
श्रीमहाराजांच्या आयुष्याची Central Theme म्हणजे नाम.
श्रीमहाराजांचा आत्मा म्हणजे नाम.
श्रीमहाराज म्हणजे नाम.
त्यामुळे एका गोड अभंगात म्हटले आहे, “ब्रह्मचैतन्याचा गाभा प्राप्त नोहे कमलनाभा!” एक प्रकारची कोटी केलेली आहे की कमलनाभ भगवंताला देखील ब्रह्मचैतन्य महाराजांचा गाभा - जे नाम - ते प्राप्त नाही; म्हणजे आपल्याच नामाची गोडी भगवंत आपणच चाखू शकत नाही; त्यासाठी भक्तरूप घेऊन संताच्या रूपात त्याला यावे लागते त्या नामाच्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी. आणि म्हणून पावलागणिक श्रीमहाराज त्या नामाचा महिमा गाण्याचे थांबवत नाहीत, थांबू शकत नाहीत. संतांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तर्काच्या पट्टीवर घासून बघणाऱ्या काही तार्किकांना एके ठिकाणी महाराज विचारतात, संत खोटे का बोलतील? जनाच्या तोंडून नाम वदवून घेण्यात त्यांचा काय स्वार्थ आहे? किंबहुना लोक ऐकणार नाहीत हे माहित असूनही ते सांगणे सोडत नाहीत, केवळ लोकांच्या कल्याणाच्या तळमळीपोटी. त्यामुळे अनेक उदाहरणे देऊन श्रीमहाराजांसारखे संत आपल्याला भगवंताच्या नामाचे महत्त्व पटवून देतात.

श्रीमहाराजांची ही हातोटी आहे की रोजच्या, व्यवहारातल्या गोष्टींशी सांगड ते परमार्थाशी – नामाच्या साधनेशी घालतात. म्हणजे मग आम्हाला त्याचे आकलन होणे सोपे जाते. मनुष्य कर्मप्रधान असल्यामुळे त्याला काहीतरी केल्याशिवाय चैन पडत नाही. परमार्थ साधनेत देखील काही देहाची आसने, आहार नियम, काही नित्य परिपाठ, तीर्थस्थळांना भेटी, वगैरे गोष्टी तो हौसेने करतो; परंतु, गुरु जेव्हा एके जागी बसून नाम घे म्हणतात, तेव्हा त्याला ते अवघड वाटते. याचे कारण आमची बाहेर फिरणारी इंद्रिये व त्यांना चालना देणारे बहिर्मुख मन. आमची सगळी धाव दृश्याकडे असल्यामुळे आम्हाला साधन देखील त्याच दृश्यातले असावे असे वाटते आणि म्हणून आमचे मन नामात रमत नाही. ते रमावे यासाठी श्रीमहाराज वरील उदाहरण देत आहेत.

आयुर्वेदासारख्या प्राचीन औषध शास्त्रात जे रोगमुक्तीचे उपाय सांगितलेले असतात, ते रोगाचे मूळ कारण लक्षात घेऊन, कफ-वात-पित्त या त्रिदोषांचे प्रमाण लक्षात घेऊन त्याप्रमाणे सांगितलेले असतात. तद्वत, श्रीमहाराज म्हणतात, नामाचा उपाय जो आहे, तो आमचा मूळ दोष – जी देहबुद्धी – मी देहच आहे ही बुद्धी - लक्षात घेऊन व सत्व-रज-तम यांचे प्राकृतिक अधिष्ठान लक्षात घेऊन भवरोगाची उपाययोजना करतो. साहजिकच जिथे रोग मुळापासून उपटून काढायचा, तिथे वेळ हा लागणारच. साधे आपण महिनाभर गावी गेलो तर आल्यानंतर महिनाभराची घरातली धूळ झटकून टाकायला आपल्याला वेळ लागतो. आम्ही तर जन्मोजन्मीच्या देहसंस्कारांची धूळ जमा करून बसलो आहोत; ती नाहीशी व्हायला अवधी लागणारच. म्हणून अजून एके ठिकाणी श्रीमहाराज म्हणतात, ज्याची देहबुद्धी जास्त, त्याला अधिक वेळ लागतो. यासाठीच परमार्थ साधनेत वाट बघण्याची तयारी हवी व ही वाट बघताना चुकूनही मनाला मरगळ येणार नाही वा निरुत्साह होणार नाही याची दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे.

आपले सद्गुरू आपल्या रोगाला वरवर मलमपट्टी कशी बरं करतील? अनेकदा असे घडते की आपण एखाद्या शिबिराला जातो, जिथे काही योगसाधन शिकवले जाते. तिथे आठवडाभर असेपर्यंत आपले देह मन बुद्धीचे व्यापार अतिशय सुरळीत चालतात. आपल्याला नवीन जोम वाटून एक प्रकारची प्रसन्नता वाटते; परंतु परत आपण आपल्या संसारात आल्यानंतर एक प्रकारचा विरोध सुरु होतो. अनुभवलेल्या गोष्टीकडे मन धावत असते; परंतु प्रपंच आपल्याला जखडून ठेवतो व त्यामुळे हळूहळू आलेली प्रसन्नता निघून जाते. यालाच महाराज तात्पुरता उपाय म्हणतात, जो त्यांना मान्य नाही.

आपले लेकरू अधूनमधून आरोग्यपूर्ण असते आणि वरचेवर आजारी पडते हे कोणत्या आईला सहन होईल? ते लेकरू नेहमी टवटवीत प्रसन्न कसे राहील हीच त्या आईची इच्छा. अगदी तसेच आपण सर्व संतांची - सद्गुरूची लेकरे आहोत आणि आपल्याला जन्मोजन्मीच्या आजारपणातून मुक्त करण्याची आपल्या सद्गुरू आईला तीव्र तळमळ आहे, जी दुर्दैवाने आम्ही जाणत नाही. आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या नामाव्यातिरिक्त काहीतरी इंजेक्शने अधूनमधून घेण्याची आम्हाला हुकी येते. एखादे ग्रंथ पारायणाचे अनुष्ठान आम्ही करतो; ते करू नये असे नाही; परंतु बहुतेक संत ग्रंथातून नाम व भक्तीचेच महत्त्व वर्णन केलेले असते. ते लक्षात घेऊन आचरणात आणण्याऐवजी जर केवळ पारायणालाच आम्ही सर्वस्व मानू लागलो, तर ते इंजेक्शन देऊन भूल दिल्यासारखे आमचे काम-क्रोधादि विकार काही दिवस आम्ही त्या पांघरुणाखाली दडवून ठेवतो, जे पुन्हा ते अनुष्ठान संपल्यावर उसळी मारून वर येतात. या उलट जो “नामात राहतो” त्याच्या अंतर्मनावर नामाचा प्रभाव थेट परिणाम करत असल्यामुळे आणि त्यात सद्गुरूंची अध्यात्म शक्ती अनुस्यूत असल्यामुळे साधक हळूहळू त्या विकारांच्या कचाट्यातून पूर्ण सुटतो.

म्हणूनच श्रीमहाराज म्हणतात, संपूर्ण दुःखनिवृत्ती आणि अखंड आनंदप्राप्ती ही नीति धर्माची पथ्ये पाळून केलेल्या नाम साधनेशिवाय शक्य नाही, नाही, त्रिवार नाही!

||श्रीनाम समर्थ||



3 comments:

  1. भवव्याधीचे मूळापासून उच्चाटन करण्यासाठी नामौषधी! वाह.
    उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम्।
    सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम्॥
    नामाचा उत्साह हेच जिवंतपणाचे लक्षण, हाच जन्मजन्मांतरीचा भवरोग समूळ नाहीसा करून अभंग समाधान देण्याचा रामबाण उपाय! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  3. भक्ती आणि नामहें महत्वाचे, श्रीराम।

    ReplyDelete