Monday, April 20, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४ --

भगवंताचे स्मरण करावे म्हणजे प्रपंच सोपा जातो.



श्रीराम!
सुरुवातीलाच श्रीमहाराजांचे एक वाक्य डोळ्यासमोर येते – “भाजीला जसे मीठ लागते, तसा परमार्थाला प्रपंच लागतो.” इथेच श्रीमहाराजांचे प्रपंचाविषयीचे मत स्पष्ट होते. मीठ किती घालतो आपण? अजून एकीकडे महाराज म्हणतात तसे भाकरीत मीठ घालतो आपण, मिठाची भाकरी करत नाही. हे लक्षात आले म्हणजे प्रपंचाची किंमत ठरेल! भगवंताने मनुष्य जन्म दिला ते भोगण्यासाठी नव्हे तर ‘तू त्या सच्चिदानंद परमात्म्याचा अंश आहेस’ याची जाणीव करून घेऊन स्वानंदात निमग्न होण्यासाठी. परंतु हे लक्षात न आल्यामुळे विशेषतः कलियुगात, जिथे मनुष्याचे आयुर्मान आणि बुद्धी दोन्ही मर्यादित आहे, तिथे आम्ही प्रपंचात अडकतो आणि दुःख भोगतो. सध्या प्रापंचिक सुख(!) भोगणारे आमच्यासारखे महाभाग गुरूंना विचारतो की आमचा प्रपंच तर विनासायास सुखात चालला आहे, मग भगवंत स्मरणाची गरज काय? किंवा ठीक आहे, करतो आम्ही स्मरण आणि घेतो नाम; पण त्याला एवढे महत्त्व देऊन प्रापंचिक गोष्टींपेक्षा महत्त्वाचे स्थान देण्याचे कारण काय?

श्रीमहाराज म्हणतात, भगवंत स्मरणाशिवाय प्रपंचात सुखी झालेला मनुष्य तुम्ही मला दाखवा! कारण, हे जे वरवरचे सुख आहे ते एका क्षणात दुःखात बदलू शकते, परिस्थितीत बिघाड होऊ शकतो, व्यक्तींची ताटातूट होऊ शकते, तब्येत खराब होऊ शकते. समर्थांनी दासबोधात वर्णन केल्याप्रमाणे अध्यात्मिक, आधिभौतिक किंवा अधिदैविक असा कोणताही ताप मनुष्याला क्षणात त्रस्त करू शकते. या जगात संत सोडून अशी कोण व्यक्ती आहे जी छातीला हात लावून सांगेल की मी अत्यंत आनंदात आहे आणि काहीही झाले तरी माझ्या आनंदाला धक्का लागणे शक्यच नाही??

याप्रकारच्या संतांच्या विचाराला अनेक प्रापंचिक लोक नकारात्मक वृत्ती म्हणून हिणवतील परंतु ही नकारात्मकता नसून हा सदा सर्वदा सकारात्मक होण्याचा राजमार्ग आहे! देहात जीव आला की संसारचक्र सुरू झालेच. संत सांगतात, संसार किंवा प्रपंच करण्यावाचून तर गत्यंतर नाही. तो केलाच पाहिजे. फक्त हा प्रपंच देहाला लागलेला आहे आणि अशाश्वत आहे याचे संपूर्ण भान ठेवून तुमचे मन शाश्वतकेंद्री करा. अपूर्ण जिवाने पूर्ण परमात्म्याला किंवा पूर्णत्व प्राप्त झालेल्या सद्गुरूंना धरले (आणि पुढे त्या दोहोंचे एकरूपत्व मनावर ठसले) की जो प्रपंच आहे तो त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्याच शक्तीने, त्यांच्यासाठी तो उत्तम करून मन बुद्धी त्यांना समर्पित करायची आहे, हे लक्षात येऊ लागेल. हे झाले की मगच खरे शांतीचे राज्य आपल्या अंतर्मनात नांदू लागेल.

श्रीमहाराज प्रत्येक शब्द अगदी मोजून मापून वापरतात. वरच्या वचनात “प्रपंच सोपा जातो” म्हटले आहे, सुखाचा म्हटलेले नाही. महाराज म्हणतात, प्रपंच फार तर सोयीचा होऊ शकतो, सुखाचा कसा होईल? जे मुळातच अशाश्वत आहे, त्यात सुख पाहणे हाच वेडेपणा आहे आणि याच तुच्छ वेडापायी आपण अनंत सुखदुःखांच्या राशी जन्मोजन्म ओढवून घेतल्या आहेत. संत सांगतात, केवळ दुःख हाच भोग नव्हे, भगवंतावाचून मिळालेले सुख हा देखील भोगच आहे आणि भोग कधीही तुम्हाला शाश्वत समाधान देऊ शकणार नाही!

मात्र, जर आम्हाला मनुष्य देहाच्या महत्त्वाचे स्मरण झाले, सद्गुरूही भेटले, त्यांनी दिलेला उपदेशही आवडू लागला, शक्य तितके त्याचे पालनही होऊ लागले; मग मात्र आहे त्याच प्रपंचात सद्गुरू कृपेने हृदयात अवतरित झालेल्या विवेकाने हवेनकोपण जाऊन आम्हाला समाधान लाभेल! भगवंताचे स्मरण व्हावे, साधन व्हावे यासाठी घर, प्रपंच सोडण्याचे कारण नाही; किंबहुना घर प्रपंच हा मनात असतो, त्यामुळे तो सोडून कुठेही गेलो तरी कोणत्यातरी नवीन प्रकारचा प्रपंच (मान, प्रतिष्ठा यासारखा) आम्ही भोवती गोळा करू आणि खरे ध्येय गाठायचेच नाही. प्रपंचात असो वा परमार्थात, महत्त्वाचे आहे ते या देहाला चालवणारे मन! त्यावर अंकुश भगवत् स्मरणानेच घालता येतो आणि मग देह कुठे का असेना!

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना,

“देह तरी वरिचिलीकडे। आपुलिया परी हिंडे।
परी बैसका न मोडे। मानसींची।।  (ज्ञा. अ. १३, ४८६)

काहीही झालं तरी या अशा भगवंत स्मरणात, स्वस्वरूपानुसंधानात स्थिर झालेल्या साधकाची मानसिक अवस्था बिघडत नाही, तो स्थिर धी:, म्हणजे स्थिर बुद्धी झालेला बनतो!

असे झाले की मग मात्र त्याचा प्रपंच परमार्थरूपच बनतो! महाराज, भगवंताचे स्मरण करा, म्हणजे प्रपंचात दुःखेच येणार नाहीत असे सांगत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र जी काही प्रारब्धाने दुःखे येतील ती हरी-गुरू स्मरणात सोसणे सोपे जाईल आणि मनाचे समाधान टिकेल याची ग्वाही मात्र ते देतात!

म्हणूनच महाराज एके ठिकाणी म्हणतात,

विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच! 
आणि,
परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ!!! 

Very much self-explanatory, isn't it??

||श्रीनाम समर्थ||

3 comments:

  1. आमच्यासारख्या प्रापंचिकांसाठी अतिशय महत्त्वाचा संकेत!
    🙏🙏😷🙏🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  3. श्रीराम ! अप्रतिम 🙏 ❤ 👌👌

    ReplyDelete