Thursday, April 23, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७ –

नाम उपाधिरहित असल्यामुळे आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही.

श्रीराम!
उपाधि म्हणजे काय याची व्याख्या करताना श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, “भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधि होय!” आता उपाधिची ही व्याख्या आपण वरच्या श्रीमहाराजांच्या वचनाला लावू. पहिल्या वचनाच्या भागात महाराज म्हणतात, नाम उपाधिरहित आहे. म्हणजेच भगवंतावाचून इतर जे जे म्हणून आहे, त्याविरहित असे त्याचे नाम आहे. म्हणजेच भगवंताचे नाम म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आहे! सरळसरळ इक़्वेशन आहे हे. याला वेदात ‘नेति नेति’ चा मार्ग म्हणतात. महाराज या छोट्याशा वचनात आपल्याला जणू वेदांचे सार सांगत आहेत. युरोपियन तत्त्वज्ञ याला “Reaching The Absolute Via Negativa” असे म्हणतात. म्हणजे, दृश्य जगात जे जे म्हणून आहे, जड वस्तूंपासून, जीव चराचरापर्यंत आणि त्यातही अगदी मनुष्यप्राण्याचा देह, मन, बुद्धी, अहंकारापर्यंत ही सगळी दृश्यातली उपाधि आहे आणि ही गळून पडली म्हणजे मग खऱ्या परमात्व तत्त्वाचा, जे नामरूप आहे, त्याचा बोध होतो असे महाराज सांगतात.

अजून एक मार्ग आहे तो म्हणजे “स इति स इति” किंवा “ReachingThe Absolute Via Affirma” हा मार्ग होय. म्हणजे जे दिसते आहे ते सर्व ईश्वरच आहे हा बोध होय. परंतु ज्ञानमार्गी असो वा भक्तीमार्गी, हा समग्रतेचा बोध त्याला सुरुवातीला नेति नेति या मार्गातून गेल्यावर मगच अनुभवास येतो. सर्व तोच आहे, हे नुसते म्हणणे आणि ते अनुभवास येणे या दोन गोष्टी साहजिकच परस्पर भिन्न आहेत. उपाधि देखील तोच आहे हे म्हणताना त्या उपाधि त्या मूळ तत्त्वाचे केवळ projection आहे हा विसर पडला तर मनुष्य गाभ्याला विसरून केवळ फोलपटालाच सर्वस्व मानू लागतो व आज आमचे तसेच झाले आहे. त्यामुळे श्रीमहाराज जे सांगतात, ‘भगवंतावाचून सर्व उपाधि’ हाच मार्ग आम्हास या वरवरच्या दृश्य जगापासून ‘मनाने’ दूर ठेवून त्या खऱ्या ईश्वर तत्त्वापर्यंत पोहोचवू शकतो.

वचनाच्या दुसऱ्या भागात जे सांगितले महाराजांनी, उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही, हे सर्व अध्यात्म साधनेचे रहस्य आहे. एका वाक्यात बघायचे तर “बहिर्मुखता मनाने त्यागल्याखेरीज नामाचे प्रेम येणार नाही.” संत जे एकांतात नाम किंवा ईश्वराचे चिंतन करण्यास सांगतात, त्यामागे हाच हेतू आहे. जीव बहिर्मुख झाला म्हणून कर्मबंधनात अडकला. ‘मी कुणीतरी आहे’ हा अहंकार आणि त्यापोटी गोळा झालेली ‘माझे घर, माझी माणसे, माझा पैसा, माझा देह, मला अमुक आवडते, अमुक आवडत नाही, मला हे व्हावे वाटते, हे व्हावे वाटत नाही, मला मानसन्मान प्रतिष्ठा लाभावी वाटते, माझे कौतुक व्हावे वाटते” वगैरे भुते मनुष्याला उपाधींचा दास बनवतात. एकच उदाहरण घ्यायचे तर हा देह जो भगवंताने आम्हाला त्या भगवंताची भक्ती करण्यासाठी किंवा ‘मी कोण आहे’ याचे शोध घेऊन आत्मानंदात स्थिर होण्यासाठी दिला त्याचा उपयोग आम्ही केवळ त्या देहाचे लाड करण्यासाठी करतो आणि वर हा माझा देह म्हणून मिरवतो, त्याला सजवतो, त्याची वारेमाप काळजी घेतो. हे म्हणजे कुणीतरी आम्हाला नारळ दिला आणि आम्ही त्यातले गोड पाणी पिण्याऐवजी किंवा मऊ खोबरे खाण्याऐवजी त्याची करवंटी खाण्याचा चंग बांधण्यासारखे आहे. या सर्व देहाच्या उपाधि त्या करवंटी सारख्या आहेत. भगवत् तत्त्व त्यातले गोड पाणी व खोबरे म्हणजे त्या तत्त्वाची सगुण भक्ती होय! परंतु करवंटी फोडल्याशिवाय हे मिळणार कसे? तद्वतच जोवर बाह्य गोष्टींचा मनाने त्याग होत नाही, तोवर आतला भगवंत प्रेमाचा – नाम प्रेमाचा मधुर गर चाखायला मिळणार कसा?

त्याग मनानेच करायचा आहे हे मान्य; परंतु संत काय म्हणतात की, ही उपाधींच्या त्यागाची सुरुवात थोडी तरी बाहेरून केली पाहिजे. एकदम मी आतून विरक्त होईन हे आजच्या भोगप्रधान संस्कृतीत कसे शक्य आहे? जितके शक्य तितके साधे खाणेपिणे, कमीतकमी कपडा लत्ता, नको असलेल्या खरेद्या टाळणे, अनावश्यक लोकसंग्रह टाळणे, वगैरे साध्या साध्या गोष्टी तरी नाम साधकाने करायला नकोत का असे संत विचारतात. जगाच्या प्रवाहात पडलेल्यांना हा मूर्खपणा वाटणे साहजिक आहे. पूज्य बाबा बेलसरे प्रवचनात म्हणायचे, तुम्हाला साधक बनायचे आहे ना? मग हे केले पाहिजे! मी आता आहे तसाच राहणार, वागणार आणि तरीही मला परमार्थ मार्गात प्रगती साधायची इच्छा आहे, तर हे जमणे शक्य नाही. एक संत आपल्या अभंगात म्हणतात, “देव बाजारचा भाजीपाला न्हाय रं||” त्या शाश्वत परम तत्त्वाची ओळख अशी बरी आहे त्या जागी होईल? मनाची उत्क्रांती होणे हाच मार्ग त्याच्याप्रत घेऊन जाऊ शकतो. तुम्ही बाहेरून काय करत आहात याला भगवंताच्या राज्यात फारसे महत्त्व नाही; तुमचे मन कुठे आहे, मनाचे व्यापार काय सुरु आहेत, यावर त्याची प्राप्ती अवलंबून आहे. म्हणून म्हटले आहे, “चिंतने चिंतने तद्रूपता” आम्ही दिवसभर जगाच्या व्यापारांचेच चिंतन केल्यामुळे आज बहिर्मुख होऊन जगाशी, दृश्याशी तद्रूप झालो आहोत. हेच जर आम्ही भगवंताचे चिंतन मनापासून आरंभले, सद्गुरू उपदिष्ट मार्गाने नाम साधन सुरु केले व जास्तीत जास्त काळ भगवत चिंतनात राहिलो, तर तुम्ही का भगवत रूप होणार नाही? असे श्रीमहाराज विचारतात.

प्रेमाचे रहस्य तादात्म्य होण्यात किंवा तद्रूप होण्यात आहे. ज्याने भगवंताच्या नामाला, जे सदगुरूंकडून आपल्याला मिळालेले आहे, तेच आपल्या जीवनाचे सर्वस्व मानले व स्वतःला गुरूच्या स्वाधीन केले त्याला या बाह्य उपाधि काय बाधा पोहोचवू शकतील? गुरुदेव रानडे म्हणायचे, “या विश्वात अशी शक्ती नाही जी नामाच्या शक्तीला बाधा पोहोचवू शकेल! अशी कोणतीही गोष्ट नाही जी नामाच्या साधकाला साधनेमध्ये विघ्न निर्माण करू शकेल.” सर्व विघ्न हे आपल्या मनाच्या विकल्पांमुळे आहे. संकल्प विकल्प असलेले हे मनच ज्याने सद्गुरू चरणी अर्पण केले त्यालाच ते परम पावन नामाचे प्रेम जाणवेल व त्याचे आयुष्य कृतकृत्य होईल असे श्रीमहाराज म्हणतात!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. श्रीराम! चिंतन वाचून उपाधीचा महापूर असलेल्या तथाकथित साधनेतून उपाधीचे खडे काढून टाकण्याची अनिवार्यता मनावर कोरली गेली. नामप्रेमाचा मधुर गर चाखायला मिळावा, यासाठी अंतर्बाह्य विषयत्यागाचा गुरूकृपेने नक्कीच प्रयत्न करू! 🙏🌿🙏

    ReplyDelete