Saturday, April 25, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ९ –

एक मनुष्य बैलगाडी मधून जाताना रस्त्यामध्ये पडला. एका सज्जन माणसाने त्याला तेथे पडलेला पाहून उचलला आणि आपल्या घरी नेला. तसे नुसते विषयात राहणे हा आडमार्ग आहे, नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण भगवंताच्या नामात पडून राहावे. त्यात राहिले की कोणीही संत भेटतो आणि आपले काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.

श्रीराम!
या पृथ्वीतलावरची सर्वात अमोघ संपत्ती, अविचल पावित्र्य, अभंग भक्ती आणि करुणेचा सागर म्हणजे संत. संत नाहीत ती धरा आजपर्यंत कोणत्याही काळात अस्तित्वात नव्हती. सृष्टीचा निर्माता - नियामक भगवंताचे या दृश्यातले रूप म्हणजे संत! कलियुगात सगळीकडे वासना आणि भोगाचे साम्राज्य पसरलेले असताना वीतभर माणुसकी, काही सात्विक जनांचे पारमार्थिक आयुष्य आणि थोडीबहुत सकारात्मकता यांचे जनक म्हणजे हे संत.

माणगंगेच्या काठी असेच जे चालते बोलते ब्रह्म अवतरले, ते श्रीमहाराज सांगतात, जगाच्या चालीने चालू नका; संतांच्या चालीने चाला. ते नेहमी म्हणायचे, संतांनी अनुभवून भगवंताचे स्वरूप आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, भक्तीचे रहस्य आपल्याला सांगितले. त्यांचा त्यात काय स्वार्थ आहे म्हणायचे. ते स्वतः तर पूर्ण झाले; त्यांना आता काहीही मिळवायचे असे उरले नाही. तरीही ते जगासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्याही नंतर सूक्ष्मात झटत राहिले, याचे कारण काय? याचे कारण केवळ करुणा होय. भगवंत आहे अकारण करुण; परंतु त्या करुणेचे मूर्त स्वरूप म्हणजे हे संत! हेच संत जेव्हा गुरुरूपाने मार्गदर्शन करतात, तेव्हा ते सद्गुरू बनून त्या शिष्याच्या पारमार्थिक वाटचालीत त्याचे माय बाप बंधू सुहृद बनून त्याला अक्षरशः कडेवर घेऊन “ब्रह्म सनातन ईश्वराचे” दर्शन घडवतात. शिष्याच्या आयुष्यात परम शांती व समाधान आणण्याचे महत्कार्य सद्गुरू करतात.

हे कसे घडते हे वरच्या बोधवचनात महाराज सांगतात. वस्तुतः दोनच मार्ग आहे, एक आहे दृश्याचा लौकिक मार्ग आणि दुसरा आहे अध्यात्माचा अलौकिक मार्ग. पहिला मार्ग हा विषयाचा, पुनर्जन्म-पुनर्मृत्यु च्या भोवऱ्यात अडकवणारा आणि दुसरा वासनेचे मूळच उपटून काढून शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवणारा असा आहे. जेव्हा वाटसरू रस्त्यात पडला तेव्हाच त्याला सज्जन माणसाने बघितले व आपल्या घरी नेले. हेच जर तो आडरानात पडला असता तर तो त्याच्या दृष्टीस पडला नसता. त्या सज्जनाची इच्छा आडरानात पडलेल्याला देखील मदत करण्याची असते; परंतु तो दिसलाच नाही तर तो तरी काय करेल? तद्वत, जो विषयात आहे, त्याला देखील मदत करून निर्विषय भगवंताच्या मार्गावर घालण्याची इच्छा गुरूंना असते. परंतु, संतांना देखील काही नियम पाळावे लागतात. जोवर संसारातून विरक्तीचा थोडा तरी अंकुर त्या व्यक्तीच्या हृदयात फुटत नाही, तोवर त्याला ते भगवंताकडे वळवत नाहीत.

इथेच बुद्धीच्या निश्चयाचे काम आहे. समर्थ जे म्हणतात, “जो त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थासी”, याचा अर्थ हा एकच मार्ग आहे असे नव्हे. काही पूर्वजन्माचे अधिकारी सत्पुरुष सारासार विवेकाने देखील या असार संसाराकडून सार अशा भक्तिमार्गाकडे वळतात; परंतु समर्थांनी जे सांगितले त्या मार्गाने भगवंताकडे वळणारे साहजिकच जास्त! कारण कोणतेही असो, जोवर बुद्धीचा निश्चय होत नाही, तोवर खऱ्या अर्थाने साधनेची तळमळ लागत नाही व जड संसाराकडून निघून सूक्ष्म भगवंताच्या मार्गाची ओढ लागत नाही. हे होईतोवर तोवर मनुष्य नामाला चिकटत नाही. आपल्याला अनेक वेळा असे वाटते, की कुणीही उठून सद्गुरूंचा अनुग्रह घेऊ शकतो, मिळवू शकतो; परंतु ते तसे खरेच नाही. ज्याला कुणाला संत बोलावतात, तोच अनुग्रहास पात्र होतो. जीवाची ताकद नाही संतापर्यंत पोहोचण्याची. आज स्वकर्तृत्वावर विश्वास असल्यामुळे आम्हाला वाटते, मी अनुग्रह घेतला. पण वास्तविक सत्य हे आहे, की गुरुची अपार करुणा बरसली, कृपेचा जलनिधी द्रवला आणि म्हणून आम्ही अनुग्रहास पात्र झालो.

अनुग्रह होईपर्यंत सामान्य माणसाची ही उत्कंठा असते, की मी कुणाचा अनुग्रह घ्यावा, माझा अनुग्रह कधी होईल? त्याला वरच्या वचनात महाराज एक सूत्र सांगत आहेत, की तू फक्त नामात राहा. अनेक साधक शिष्यांचा हा अनुभव आहे, की अनुग्रह होण्यापूर्वीचे थोडेबहुत नाम साधन जे पूर्वजन्मीच्या गुरुकृपेमुळे घडले, ते या जीवनात अत्यंत महत्त्वाचे असते. हाच नामाचा अंकुर फुटण्याची बहुधा सद्गुरू वाट बघत असतात. हे ज्याने केले त्याला संत शोधत येतात म्हणतात श्रीमहाराज. हे अतिशय सूचक आहे. पुष्कळ जणांचा अनुभव आहे की आम्हाला गोंदवल्याविषयी काहीच माहित नव्हते परंतु आता वाटते श्रीमहाराज माझे गुरु म्हणून मला कसे काय लाभले? सद्गुरू लाभणे ही आयुष्यातील सर्वोच्च सिद्धी आहे आणि ती जीवाच्या थोरपणामुळे नव्हे तर सद्गुरू आपल्याला जन्मोजन्म विसरत नाहीत यामुळे आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते आपल्यासमोर येतात. मग कुणी त्यांचा अनुग्रहित आपला परिचयात येईल, त्यांच्या अनुग्रहीतांच्या घरी जन्म होईल, अगदी अनपेक्षितपणे देखील हे घडू शकते. पण जो त्यांचा आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. हे पोहचणे जर ती व्यक्ती थोडेफार जरी नाम घेत असेल तर लवकर होते म्हणताहेत श्रीमहाराज. नाम हाच सद्गुरू आणि आपल्यातला दुवा आहे, जो आपल्याला हा बोध करवून देतो की तुझे गुरु हेच नामरूप भगवंत आहेत!

सर्व बाधा आडमार्ग सोडण्याची आहे. तो सोडण्याचे एक पाऊल जरी आम्ही उचलले, तरी शंभर पाऊले सद्गुरू चालून आपल्यापर्यंत येतात हे निश्चित. आणि एकदा का ही संतभेट घडली की शिष्याचे आयुष्य अंतर्बाह्य उजळून निघते!!!

संत आनंदाचे स्थळ| संत सुखचि केवळ| नाना संतोषाचे मूळ| ते हे संत||
संत विश्रांतीची विश्रांती| संत तृप्तीची निजतृप्ती| नांतरी भक्तीची फळश्रुती| ते हे संत||
मोक्षश्रिया आळंकृत| ऐसे हे संत श्रीमंत| जीव दरिद्री असंख्यात| नृपती केले||
जे त्रैलोकी नाही दान| ते करिती संतसज्जन| तव संतांचे महिमान| काय म्हणौनि वर्णावे||
ऐसी संतांची महिमा| बोलिजे तितुकी उणी उपमा| जयांचेनि मुख्य परमात्मा| प्रगट होये||
(दासबोध संतस्तवन)  

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. श्रीराम!"नामाचा अंकुर फुटण्याची बहुधा सद्गुरू वाट बघत असतात. हे ज्याने केले त्याला संत शोधत येतात म्हणतात श्रीमहाराज." आल्हाद मिळाला!
    अनुग्रहाचं अधिष्ठान आणि सूक्ष्मता जी सांगितली आहे, त्याची जाणीव ठेवून नामात राहू! 🙏🌿🙏

    ReplyDelete