Friday, April 17, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १ --

नामाचे महत्त्व आपल्यासारख्याला कळणे फार कठीण आहे. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत आणि नाम तर निरुपाधिक आहे. म्हणून संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. –

श्रीराम!
श्रीमहाराजांचे शब्द म्हणजे इंग्लिश मध्ये ज्याला terseness म्हणतात तसे आहेत. म्हणजे, एका शब्दात किंवा एका ओळीत सबंध जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगावे तसे आहेत. एखादा प्रिय पदार्थ मिळाला म्हणजे तो पुरवून पुरवून लेकरू खाते, तद्वत संत वचने ही किती वेळा परत परत वाचली तरीही दर वेळी त्यांची नित्यनूतन गोडी अनुभवास येते. श्रीमहाराजच म्हणायचे तसे, प्रत्येकाला संत वचनांचा अर्थ कळावा याच उद्देशाने संतांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्या कळतातच. जेवढे कळलेले असते तेवढे जरी साधकाने आचरणात आणले तरी त्याला पुढचा मार्ग निश्चित प्रकाशित होईल आणि हळू हळू त्या वचनातील गर्भितार्थ लक्षात येऊ लागेल.

श्रीमहाराज जे बोलायचे त्यात बऱ्याचदा काय करावे आणि काय करू नये हे कधी directly तर कधी indirectly सांगितलेले असते. जसे, वरच्या वचनात नामाच्या महत्त्वाबद्दल महाराज सांगतायत. ‘नाम काय आहे’ हे तार्किक दृष्ट्या विचार करणाऱ्या आजच्या जगातील लोकांना कळणे खरोखर दुरापास्त आहे म्हटले तर वावगे ठरू नये. कळणे कठीण तेव्हा होते, जेव्हा आमच्यासारखे लोक स्वतः ‘जड’ झालेले असतात. सर्व अध्यात्म प्रवास हा जडत्व टाकून हलके होण्यात आहे. आणि हे हलके होणे म्हणजे उपाधींपासून मुक्ती! अनंत उपाधींनी आपण आजवर अनंत जन्म ओढवून घेतलेत. उपाधी वासनेतून येते, मग ती कोणतीही वासना असो. वासनेचे मूळ आहे देहबुद्धी. “मी देहच आहे ही बुद्धी म्हणजे देहबुद्धी!” हाच तो सूक्ष्म अहंकार ज्यामुळे देहात अडकलेल्या, परंतु परमात्म्याचा अंश असलेल्या जीवास मी बद्ध आहे हा आभास निर्माण होतो! शाश्वताचा अंश हा नित्य सिद्धच आहे हे ज्याने जाणले, मानले आणि अनुभवले तो संत आणि अशा संताला त्या नामाचे – म्हणजेच शाश्वताच्या हुंकाराचे महत्त्व कळते.

त्यामुळेच श्रीमहाराजांसारखे संत नामाला एवढे महत्त्व देताना दिसतात. किंबहुना सबंध भारतातील संत परंपरेचा इतिहास बघितला, तर हेच दिसून येईल की ज्ञान मार्गी असो, योग मार्गी असो वा भक्ती मार्गी, कोणत्या ना कोणत्या साधनेच्या सांध्यावर त्यांनी भगवंताच्या नामाचेच प्रतिपादन केले आहे. भक्तीमार्गी संत तर नामालाच आपले जीवन सर्वस्व मानून त्यासाठीच आपले आयुष्य खर्चतात आणि सिद्ध स्थितीस पोहोचतात. शंकराचार्यांसारखे महान अद्वैती देखील अद्वैत साक्षात्कारानंतर त्याच बाल गोपालाला भजण्याचे महत्त्व सांगून म्हणतात, “भज गोविन्दं मूढ मते!!” नाही रे, तुला त्या साक्षात्काराने समाधान मिळणार नाही. ज्ञान झाले तरीही जोवर ईश्वर शरणागती नाही तोवर हलके होता येत नाही आणि हलके झाल्याशिवाय शाश्वत आनंद नाही! म्हणूनच पूज्य गुरुदेव रानडे म्हणायचे, योगसूत्रात जे म्हटले आहे, “ईश्वर प्रणिधानात् वा”, म्हणजे योगसाधनेने किंवा ईश्वराला शरण गेल्याने अखंड समाधान आणि शाश्वत शांति लाभेल ह्यात थोडा बदल केला पाहिजे. ते म्हणत, “ईश्वर प्रणिधानात् एव” म्हणजे केवळ एका ईश्वराला शरण गेल्यानेच हे साधु शकेल, अन्य कोणताही उपाय नाही.

आणि म्हणून श्रीमहाराज इथे म्हणतात, जोवर ही शरणागती साधलेली नाही, तोवर देहबुद्धी पुष्ट आहे आणि तोवर नामाचे खरे महत्त्व कळणे अवघड आहे. नाम हे संपूर्णपणे निरुपाधिक आहे. म्हणजेच नाम हे स्वतःसिद्ध, स्वयंभू आहे. आणि असे नाम ज्यांनी हृदयी धारण केले तेही निरुपाधिक होतील हे निश्चित, कारण जसा संग तसे फळ. पूज्य बाबा बेलसरे यांनी जी ‘नामचंद्रिका’ लिहिली आहे, त्यातला एक अप्रतिम श्लोक आहे,

“सर्व साधन हीनानां नामैवालम्बनं परम् |
सर्व साधनमुक्तानां नामैवालम्बनं पुनः ||”

भगवद नामाचे सर्व सार या श्लोकात आहे. पूज्य बाबा सांगतात, कोणतेही साधन करत नाहीत, त्यांना तर नामासारखे साधन नाही, त्यांनी नामालाच चिकटून राहिले पाहिजे. आणि सर्व साधन करून जे मुक्त झाले आहेत, त्यांनी देखील पुन्हा एकदा नामाचेच अवलंबन केले पाहिजे, केल्याशिवाय चैन पडत नाही! कारण वरच्या वचनात जसे श्रीमहाराज म्हणतात, उपाधिरहित असे नाम उपाधींनी ग्रासलेले लोक समजू शकत नाहीत; परंतु जर त्यांनी नामाची कास धरली तर मात्र या उपाधींतून त्यांची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सुटका झाल्यावर देखील त्या नामाचे प्रेम इतके अनाकलनीय अतर्क्य आणि irresistible असते की ते मुक्त होऊन पुन्हा त्या नामाचाच आश्रय घेऊन जनमानसात त्याचे महत्त्व रुजवतात. म्हणून श्रीमहाराज म्हणतात, संतांनाच नामाचे महत्त्व कळते. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, “करून बघितल्याशिवाय कसे कळेल? हा जन्म दिलं नामाला म्हणावं आणि नामाला वाहून घ्यावं. नुकसान होणार नाही मी खात्री देतो!” ही संतांची आश्वासने काळ्या दगडावरची रेघ असते; ज्याने अनुभव घेतला तो मुक्त झाला!

||श्रीनाम समर्थ ||

3 comments: