Tuesday, April 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १२ --



श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १२ –

‘मी ब्रह्म आहे’ या अनुभवातसुद्धा मीपण आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे.

अद्वैत सिद्धांताचे दर्शन म्हणजे “अहं ब्रह्मास्मि”| तो सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीवात्मा हे भिन्न नाहीत हे ‘अनुभवणे!’ परंतु, अशी अनुभूती मिळणारे साधक – सिद्ध अत्यंत दुर्मिळ. जिथे ‘लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्म विवेक’ असे समर्थ म्हणतात, म्हणजे आत्म काय आणि अनात्म काय हा विवेक करणारेच लक्षामध्ये कुणी एक म्हटले आहे. तिथे तो विवेक होऊन, तदनुसार साधन घडून, ही सर्वोच्च अनुभूती मिळवणे किती दुर्लभ असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे कुठेतरी श्रीमहाराजांसारख्या सगुण भक्तिचे प्रतिपादन करणाऱ्या संतांना असे लक्षात येते की मनुष्य देहबुद्धी मध्ये इतका अडकलेला आहे की केवळ काही ग्रंथ वाचून, थोडेफार साधन घडून, काही श्रवण करून तो ब्रह्मपदाला पोहोचल्यासारखा दाखवतो. आमचा मार्ग ‘दर्शनापेक्षा’ ‘प्रदर्शन’ असतो आणि हे झाले म्हणजे हाती काहीच न लागता समर्थच म्हणतात त्याप्रमाणे, “सगुण नेले ब्रह्मज्ञाने, निर्गुण नेले संदेहाने | दोहीकडे अभिमाने वोस केले||” अशी आमची अवस्था होते. निर्गुण देहबुद्धी असताना कळू शकत नाही. त्यामुळे त्या संशयाने निर्गुण हातचे गेले. दुसरीकडे ब्रह्म स्वरूपाच्या शब्दज्ञानाने सगुण खरे नाही असे वाटू लागले. अशा रीतीने देहाभिमानामुळे दोन्हीकडचा पाहुणा उपाशी अशी गत होते असे समर्थ सांगतात.

याच्याही पुढे जाऊन श्रीमहाराज वरच्या वचनात म्हणतात, ‘मी ब्रह्म आहे’ या अनुभवात मीपण आहे. कारण, जोवर हा अनुभव सांगता येतो आहे तोवर तो अनुभव नव्हेच. एकदा एक विद्वान श्रीमहाराजांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी महाराजांना विचारले, “महाराज तुम्हाला संपूर्ण समाधान मिळालेले आहे का?” तेव्हा महाराज म्हणाले, “ते काही मला माहित नाही बुवा; मला फक्त रामाचे नाम आवडते व ते मी सर्वांना सांगतो” त्या गृहस्थाचा प्रथम गैरसमज झाला की महाराजांना ब्रह्मज्ञानी सत्पुरुष म्हणतात आणि हे माहित नाही असे कसे म्हणतात? नंतर त्यांना पू कुर्तकोटींनी सांगितले, “तुम्हाला महाराजांचे बोलणे कळले नाही. जोवर मी समाधानी आहे असे वेगळेपणाने सांगता येते तोवर समाधान मिळालेले नाही. श्रीमहाराज समाधानरूप आहेत, तेथे वेगळेपणाच नाही, ते शब्दात सांगणार कसे?”

दुसरी गोष्ट अशी की ही ब्रह्माची अनुभूती तेव्हाच शक्य आहे जेव्हा साधकाची देहबुद्धी संपूर्णपणे गळून जाते, त्याचे मन उन्मन होते व तो या दृश्य संसारापासून पूर्णपणे मनाने विगलित होतो.आणि हे ज्याचे होते, तो ‘मी ब्रह्म आहे’ हे सांगायला उरतच नाही; केवळ आत्मानंदात मग्न होतो. किंबहुना, ही अनुभूती घेतलेले श्रीमहाराजांसारखे अनेक महात्मे भगवंताशी एकात्म भाव सहन न झाल्यामुळे द्वैतात येऊन सगुण भक्ती करतात. ज्ञानी भक्त ते हेच. म्हणूनच ‘ब्रह्मरस अंगी ठसावला’ सांगणारे तुकोबा ‘तू देव मी भक्त ऐसे करी’ अशी आळवणी भगवंताजवळ करतात.

अद्वैत चूडामणी शंकराचार्य “भज गोविन्दं मूढमते” असे सांगून “इह संसारे बहु दुस्तारे, कृपयाSपारे पाहि मुरारे” असे म्हणून भगवंताजवळ हा संसार तरून जाण्यासाठी याचना करतात. आणि इथेच श्रीमहाराजांनी वारंवार प्रतिपादन केलेल्या भगवद् नामाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. खरोखर नामस्मरणाचा सरळ सरळ अर्थ ‘मी तुला शरण आहे आणि म्हणून मी तुला प्रेेेमाने हाक मारतो आहे’ असा होतो. म्हणून काही उत्तरेकडील संत आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान असा भेद करताना दिसतात. आत्मज्ञान स्वरूप साक्षात्काराला थांबते; इथे संपूर्ण दुःखनिवृत्ती होते. ब्रह्मज्ञान यापुढे संपूर्ण भगवत् शरणागतीने होते; इथे दुःखनिवृत्ती बरोबर अखंड आनंदप्राप्ती होते. कारण शरणागती शिवाय, तू बाप-मी लेकरू, तू स्वामी- मी दास या भावांशिवाय जिवाला खरी विश्रांती लाभू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणतात, ‘मी ब्रह्म आहे’ या अनुभवात सुद्धा मीपण आहे. आणि नाम त्याच्या पलीकडे आहे, कारण शरणागती नामानेच घडते, अन्यथा नाही. आणि या अशा अद्वैत सिद्धीनंतर देखील ज्ञानी भक्ताच्या भूमिकेवर राहून निरंतर नाम स्मरणारा भक्त हा माझा आत्मा आहे, असे भगवंत गीतेत म्हणतात.

एकूण काय, मुमुक्षु असो, साधक असो वा सिद्ध, प्रत्येकाला या भवसागरातून तारून नेणारे एक भगवंताचे नामच आहे; ते ज्याने धारण केले, त्याच्याच हृदयात “नामापरते सत्य न मानावे” ही अनुभूती जिवंत रूपात नांदते!

||श्रीनाम समर्थ||  

3 comments:

  1. डोळ्यात अंजन घालणारे आणि नामज्योत प्रज्वलित करणारे बोधवचन व त्यावरील चिंतन! श्रीराम समर्थ! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  3. श्रीनाम समर्थ
    🌷🌷🌼🌷🌷

    ReplyDelete