Sunday, April 19, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३ –

आपण नामस्मरण ‘करतो’, पण ते कसे? एका माणसाने रखेलीचे प्रेम आपल्यावर रहावे म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह केला, दुसऱ्या एकाने पुष्य नक्षत्रावर सोने विकत घेऊन आपल्या ठेवलेल्या बाईला दिले; तसे, आपण नाम घेतो, पण त्याचा उपयोग विकारांचे दास्यत्व वाढविण्यासाठी आपण करतो!

श्रीराम!
आपले श्रीमहाराज म्हणजे करुणासमुद्र! कधीही दुसऱ्याचे अंतःकरण न दुखावण्याचे व्रत आजन्म सांभाळणाऱ्या श्रीमहाराजांचे इतके प्रखर बोल क्वचितच वाचायला / ऐकायला मिळतात. पण एक स्वामी म्हणायचे, श्रीमहाराज म्हणजे गिरमीट आहे गिरमीट. गोड बोलतील पण आतडी बाहेर काढतील! म्हणजे काहीही झाले तरी आपल्या प्रिय शिष्यांची देहबुद्धी ते उरू देणार नाहीत, कारण हेच सद्गुरूंचे कार्य आहे! दुसरी गोष्ट अशी की नाम म्हणजे श्रीमहाराजांचा प्राण! माय बाप बंधू सुहृद नाम! महाराजांचे एक वाक्य आहे. अत्यंत महत्त्वाचे. महाराजांच्या आयुष्याचे किंवा संताच्या आयुष्याचे मूलभूत तत्त्व सांगणारे असे ते वाक्य आहे. जेव्हा त्यांना विचारले, महाराज, आपले लहानपण कसे गेले? यावरच्या उत्तरात महाराज सांगतात, “अगदी लहानपणापासून माझ्यावर नामाचे संरक्षणछत्र होते. मला नाम घेण्यास कोणी सांगितले नाही. नाम बरोबर घेऊनच मी आलो. आजोबांचे माझ्यावर विशेष प्रेम होते; पण मला मात्र एका नामाशिवाय काहीही आवडत नव्हते व आजही आवडत नाही!” याचा अर्थ महाराजांचे आजोबांवर किंवा सहवासातील इतरांवर प्रेम नव्हते का? तर तसे खचितच नाही; परंतु, याचा अर्थ हा की एका नामाव्यातिरिक्त ते कुणातही आणि कशातही गुंतले नाहीत! आणि असा संत ज्याने नामापरते कधीच काहीच सत्य मानले नाही, त्याला आमच्यासारखे लोक चुकीच्या कारणाने नामस्मरण करताना दिसतात तेव्हा किती दुःख होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! तरीही त्यांनी सर्वांवर निरतिशय प्रेम करून परोपरीने निष्काम नामाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला!

सर्वात अवघड गोष्ट जर जगात कोणती असेल तर ती म्हणजे निष्कामता. आज आम्ही प्रत्येक जण जन्मल्यापासून या देहाला मी मानून त्याचेच कोडकौतुक करवून घेण्यात धन्यता मानत आहोत. जे नातलग - मित्र या देहभावनेला पुष्ट करतात, आमच्यासाठी काही करतात, मान देतात, स्तुती करतात ते चांगले लोक अशी पक्की धारणा आमची झालेली आहे. म्हणजेच या जगात आल्यानंतर देह आणि देहसंबंधी सर्व व्यवस्थित राहिले तर आम्ही सुखात आहोत या भ्रमालाच आम्ही सत्य समजलेलो आहोत. आणि हीच आमची व्यवहारातील भावना आम्ही परमार्थात वापरतो!

नाम कशासाठी घ्यायचे, साधन कशासाठी करायचे, गुरु कशासाठी हवे यासंबंधी मूलभूत आकलनातच अनेकदा गडबड झाल्यामुळे अनंत काळपर्यंत साधन करूनही आम्हाला शांती कधी मिळालीच नाही. किंबहुना शांती आणि समाधान हेच जीवनाचे सार सर्वस्व आहे याचाच आम्हाला विसर पडला. हे झाल्यामुळे श्रीमहाराजांसारख्या संतांनाही कधी कधी निष्ठुर होऊन काही गोष्टी आमच्या कानावर घालाव्या लागतात. वरच्या वचनात महाराजांनी खूपच कटु वचनात आमच्या नाम घेण्याच्या वृत्तीची निर्भत्सना केलेली असली आणि आम्ही इतके चुकीच्या मार्गाने जात नसलो, तरीही कोणतीही वासना किंवा लौकिक कामना ही त्याज्यच आहे हेच यातून महाराजांना सुचवायचे आहे हे निश्चित!

परम मंगल, परम शक्तिशाली नाम काहीही करण्यास समर्थ आहे यात वादच नाही; परंतु आमची कूपमंडूक वृत्ति आम्हाला त्या नामाचे अनंत रूप दाखवण्यात असमर्थ ठरते. पूज्य आनंद सागर महाराज जो त्यांच्याकडे ‘नाम द्या’ म्हणून यायचा त्याला म्हणायचे, ‘बघ हं, नाम घेतल्यावर काहीतरी घरात वाईट झाले तर मग मला बोल लावू नकोस!’ याचा अर्थ तसे नामाने होते असे त्यांना अभिप्रेत होते का? मुळीच नाही! याचा अर्थ हा, की ते नाम घेण्यास आलेल्याची वृत्ति तपासत. याला नाम कशासाठी हवे आहे? घर संसार व्यवस्थित चालणे यासाठी हे पुण्यपावन नाम नाही, त्याने घरसंसार मंगलमय होईल परंतु तेच ध्येय असणाऱ्या प्रापंचिक नामसाधकाची ऊर्ध्व गती होणार कशी? ज्यांना त्यांच्या या कठोर बोलण्यामागची जीवाच्या अध्यात्मिक उन्नतीची तळमळ जाणवली, महाराजांनी दिलेल्या नामाची किंमत जाणवली, तेच त्यांच्याजवळ टिकले!  

वचनातील शेवटचे वाक्य मर्म आहे! विकारांचे दास्यत्व वाढविण्यासाठी नामाचा उपयोग करू नका असा स्पष्ट इशारा श्रीमहाराजांनी यात दिलाय! अरे, ज्या विकारांमुळे अनंत जन्म तुम्ही इथे परत परत येत राहिलात, त्याच विकारांची पुष्टी व्हावी म्हणून जर नाम वापरले तर तुम्ही तरून जाणार कसे? श्रीमहाराज म्हणायचे, अध्यात्म बोलायला अनेकांना येईल, जगणारा क्वचित असतो! आणि हे न झाले तर आम्हीही महाराजांच्या हिंगजिऱ्याच्या गिऱ्हाईकांमध्येच स्थान पटकावणार!

केशर कस्तुरी भरभरून देणारा सद्गुरू भेटलेला असताना ते न मागणे आणि त्याही पुढे जाऊन त्याची इच्छाच न होणे यासारखा दैवदुर्विलास नाही!

||श्रीनाम समर्थ||

4 comments:

  1. किती किती किती महत्त्वाचं चिंतन आहे हे!!!
    😷😷😷
    याचे मनन, निदिध्यासन घडलं तरच सूक्ष्म साधन घडेल!🙏🙏

    ReplyDelete
  2. अधिकाधिक नाम घेत गेल तर विकारांपासून सुटका आपोआप होईल का ? प्रापंचिक ऐहिक भौतिक सुख लाभाव हि सर्वांची च इच्छा असणार ना?
    प्रापंचिक आणि आध्यात्मिक प्रगती दोन्ही एका वेळी शक्य नाही का ?

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीमहाराज म्हणतात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहणे म्हणजे परमार्थ. सर्वांची इच्छा तीच माझी इच्छा आणि म्हणून ती योग्य या भावनेतूनच आपण जन्म मरणाच्या चक्रात अडकलोय. हे केवळ तत्त्वज्ञान नव्हे, सत्य आहे!

      जोवर देहबुद्धी आहे, तोवर प्रापंचिक प्रगतीची कामना असणार हे खरं, पण निदान तेच एकमेव ध्येय आहे ही भावना तरी नसावी. किंबहुना साधनाचा हा निव्वळ by product आहे ज्यायोगे माझा संसार सद्गुरूंच्या इच्छेने उत्तम होतो आहे ही दृढ भावना असावी. By product ला मुख्य प्राप्तव्य समजल्यामुळे सर्व घोळ आहे. परमार्थ हा मुख्य धंदा, प्रपंच हा जोड धंदा हे डोक्यात असेल आणि जे जसे घडेल त्यास सद्गुरू इच्छा समजुन सहजी आनंदाने स्वीकारण्याची वृत्ति असेल तर प्रपंचच परमार्थ बनेल असं महाराज म्हणतात.

      पण खरं संत तत्त्वज्ञान हे शुद्ध भक्ती प्राप्त करण्यातच आहे, हे मनात दृढ धरून त्यानुसार आपल्या प्रापंचिक कामना नामस्मरण साधनेने कमी कमी होत जाव्यात ही प्रार्थना करण्याची इच्छा तरी व्हावी, म्हणजे कृपा होऊन ध्येय निश्चित होण्याची बुद्धी कधीतरी आपल्याला सद्गुरू देतील! श्रीराम समर्थ आहे!

      Delete
  3. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete