Wednesday, April 29, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १३ –

“नामात एका आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही!”

श्रीराम!
“नंद” याचा अर्थ मोद, संतोष. म्हणूनच ज्याने प्रत्यक्ष भगवंताच्या बालरूपाला आनंदाने खेळवले तो गोकुळीचा “नंद”! आणि “आ-नंद” म्हणजे सर्व बाजूंनी जिथे केवळ संतोषच आहे, त्याशिवाय इतर काहीही नाही. या दृश्य जगात, अगदी पृथ्वीपासून स्वर्गलोकापर्यंत जे जे म्हणून काही ‘सुख’ या संज्ञेत बसते, त्या प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू आहे. पृथ्वीवरचे सुख, जे जे म्हणून आपण उपभोगतो, ते निर्भेळ सुख नसते हे तर आपल्याला माहीत आहेच. भगवंत स्वतः म्हणतात, “अनित्यं असुखं लोकं”... इथे खरे सुख नाही. ज्याला आपण सुख समजतो, तो केवळ सुखाचा आभास होय. आपण आजवर अनंत जन्मांतून स्वर्ग लोकापर्यंतची यात्राही अनेक वेळा केलेली आहे. गीतेत भगवंत म्हणतात त्याप्रमाणे, “क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति” जो जीव काही पुण्यकर्मे, सत्कर्मे केली म्हणून स्वर्गलोकाला गेला, तो देखील स्वर्गलोकातील भोग भोगून तो पुण्यांश क्षीण झाला, म्हणजे पुन्हा या इथे जन्म घेतो व प्रारब्धाप्रमाणे सुखदुःख भोगतो; म्हणजे स्वर्गलोकापर्यंत देखील खरा आनंद मिळणे संभवत नाही. मग आनंद आहे कुठे हा प्रश्न विवेकवंत मनुष्याला पडणे स्वाभाविक आहे. किंबहुना हा प्रश्न पडणाऱ्यासच मनुष्य ही संज्ञा आहे असे उपनिषदे सांगतात; कारण, इतर कोणत्याही योनीमध्ये ‘मी कोण आहे’ याचा शोध घेण्याचा विवेक आणि बुद्धी जिवाला नाही. तो मान केवळ मनुष्यजन्मातच मिळालेला आहे. मनुष्यालाच अंतर्मुख होऊन खऱ्या आनंदाचा शोध घेण्याचा हक्क आहे. आणि हा आपला हक्क आणि खरा स्वार्थ ज्या मनुष्यांनी यथायोग्य वापरला त्यांना संत म्हणतात!

श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, “मी समाधानाचा शोध लावला आहे!” हा जो त्यांचा शोध त्यालाच “आनंद” ही संज्ञा आहे. ही अशी अवस्था आहे, जिला दुसरी बाजूच नाही. संत आज आनंदात आहेत आणि उद्या काही घडले म्हणजे त्यांचा तो आनंद मावळला असे दिसत नाही. तसे असेल तर ते संत नव्हेतच. म्हणजेच हा शाश्वत आनंद आहे आणि शाश्वत असल्यामुळेच तो त्या शाश्वत तत्त्वापासूनच आलेला असला पाहिजे. मूळ स्थिर असल्याशिवाय येणारा कोंब टवटवीत असणे शक्य नाही. त्याचप्रमाणे संतांचा आनंद हा त्या आनंदरूप भगवंताच्या साक्षात अनुभूतीतून आलेला असल्यामुळे तेथे दुःख नाही! बहुतेक सर्व संतांना लौकिक आयुष्यात अतोनात कष्ट दुःख सहन करावे लागलेले असूनही ते आनंदसागरात डुंबत राहतात. कारण त्यांना आनंदाचे निधान असे “भगवंताचे नाम” त्याची या लौकिक जगातील खूण म्हणून मिळालेले असते व त्याला ते आपल्या आयुष्याचे सर्वस्व मानतात. खूण यासाठी की सुरुवातीला सर्व जणच नामाचा साधन म्हणून अवलंबन करतात; आणि त्यावेळी श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये त्याचा वास “ही माझ्या देवाची खूण आहे” या भावनेने असतो. परंतु, दृश्य जगातील खुणेमध्ये आणि अलौकिक जगातील नामाच्या खुणेमध्ये एक मोठा फरक हा की दृश्य जगातील खूण, जसे, एखाद्या गावाच्या दिशेने असलेली पाटी, ही केवळ त्या गावाकडे कोणत्या दिशेने जायचे याचा निर्देश करते. तिथे त्या खुणेचे कार्य संपते. परंतु, नामाची खूण ही त्या सच्चिदानंद परमात्म्याकडे घेऊन जाणारी नुसती खूण न उरता सबंध प्रवासातली सोबतही असते आणि मुक्कामी पोहोचता पोहचता ‘खूण आणि मुक्काम एकच आहेत’ याची अनुभूती देणारी असते! आणि याच अनुभूतीला संत “समाधानाचा शोध” म्हणतात!

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, 

"सेवितो हा (नाम) रस, वाटी तो आणिका | घ्यावे होऊ नका रानभरी || 
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू | नका चडफडू घ्या रे तुम्ही ||"

वरच्या बोधवचनात जे महाराज म्हणतात, नामात एका आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही, याचा सरळ सरळ अर्थ हाच की नामात एका भगवंताशिवाय दुसरे काहीही नाही, किंवा नाम हाच भगवंत आहे!

दोन मार्ग आहेत, एक – सद्गुरूंनी दिलेले नाम घेत राहून या अनुभूतीप्रत जाणे. बहुतेक तार्किक विचारदृष्टी प्रबळ असलेले साधक या मार्गाने प्रवास करतात. पण त्यांची चिकाटीही वाखाणण्यासारखी असते. तर्काला ते साधनेच्या आड येऊ देत नाहीत. त्यामुळे थोडे उशिरा का होईना ते या समाधानाप्रत पोहोचतात, कारण मार्गात थोडे उशिरा का होईना त्यांना ‘शरणागती’ चे स्टेशन पार करावेच लागते.

मात्र, दुसरा गट असा जो सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्वास ठेवतात की नाम हाच भगवंत आहे. नाम हाच आनंद आहे. या निष्ठेच्या जोरावर त्यांचा साधन प्रवासाची सुरुवातच शरणागतीने होते व त्यामुळे त्यांचे साधन हे साधन न उरता तीच आनंद-यात्रा बनते.

मार्ग कोणताही असो, आपल्याला नामाच्या सिद्धीशी मतलब आणि ती सिद्धी म्हणजे “अखंड आनंदावस्था!” ही ज्याने सद्गुरू कृपेने प्राप्त केली त्याचा मनुष्यजन्म सुफळ संपूर्ण झाला हे निश्चित!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. ओघवतं आणि आ'नंद'दायी नामरसाळ चिंतन! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete