Wednesday, April 22, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६ –

नामात राहणारा पुरुष फार थोर असला पाहिजे.

श्रीराम!
एक तत्त्वज्ञानी म्हणतो, Thoughts are places; choose wisely where you want to live!” म्हणजे चित्तातले विचार हेच मनुष्याच्या राहण्याचे ठिकाण असते; त्यामुळे तो म्हणतो, तुला कुठे राहायचे आहे, हे तू हुशारीने ठरव. म्हणजेच तुझे चित्त अशा उत्तम विचाराने भरलेले वा भारलेले असू दे, जेणेकरून तुला त्याच्यातच रमायला आवडेल. श्रीमहाराज जेव्हा म्हणतात, “नामात राहणारा” त्याचा अर्थ ज्याच्या चित्तात नाम भरून आहे आणि नामाव्यतिरिक्त विचाराला तेथे फारसा थारा नाही! मन आणि चित्त या दोन संज्ञा महत्त्वाच्या आहेत. मनात अनेक विचार येतात; तो मनाचा धर्मच आहे. श्रीखंडाचा विचार आला तर मनःचक्षूंसमोर श्रीखंड येते; पण जेव्हा श्रीखंडाचा विचार वरचेवर येऊ लागतो तेव्हा मन श्रीखंडरूपच होते, तेव्हा ते चित्त बनते आणि ते श्रीखंड चित्तात वास करते. तद्वत सद्गुरूंनी दिलेले नाम त्याच्या अभ्यासामुळे व सद्गुरू कृपेने जेव्हा चित्तात वास करते, तेव्हा मनात विचार कोणतेही असोत, त्या नामाच्या स्थानाला धक्का लागत नाही व साधक नामाला आपले घर मानू लागतो. पूज्य बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणतात, “नाम हे रमणस्थान व्हावे”. प्रपंचातली अनेक कर्तव्य कर्मे केल्यानंतर जर मनाला कुठे विश्रांती मिळणार असेल, विसावा मिळणार असेल तर ते म्हणजे भगवंताचे नाम! असा अनुभव ज्या साधकाला येऊ लागतो, त्याला नाम ‘घ्यावे’ लागत नाही, तो नामात ‘राहतो’!

असा पुरुष फार थोर असला पाहिजे म्हणताहेत महाराज. स्वाभाविक आहे. कारण,

(१) त्याचे आयुष्यातले ध्येय निश्चित झाले आहे – परमार्थ तोवर अवघड आहे, जोवर मनुष्यजन्माचे ध्येय निश्चित होत नाही. भगवंत गीतेत सांगतात, “व्यवसायात्मिका बुद्धि: एकेह कुरुनंदन!” म्हणजे मनुष्यजन्मासारखे उज्ज्वल वरदान पदरात पडल्यानंतर तुझ्या बुद्धीचा निश्चय होणे जरूर आहे म्हणतात भगवंत. जो नामात राहतो, म्हणजेच भगवंत चिंतनात राहतो, त्याचे ध्येय असे निश्चित झालेच असले पाहिजे आणि ध्येयनिश्चिती म्हणजे अर्ध्याहून अधिक पल्ला गाठणे म्हणतात सर्वच संत. म्हणून अशी व्यक्ती थोरच यात शंका नाही!

परमार्थ मार्गावरील सर्व गडबड हा एक मुद्दा स्वतःचा स्वतःशी स्पष्ट न झाल्यामुळे आहे. मनुष्य प्रवाहपतित होऊन जातो. अनेक लोक जे करत आहेत आणि बाह्यतः सुखी दिसत आहेत, ते न करता मी भगवंताच्या – त्याच्या नामाच्या नादी लागणे हा मूर्खपणा तर ठरणार नाही ना? याच प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता अर्धे आयुष्य निघून जाते! आणि असे आहे, की एक तर निश्चय असतो किंवा निश्चय नसतो. ‘माझा 50 टक्के निश्चय झालेला आहे की आता मला परमार्थ खुणावतो आहे’ वगैरे वाक्ये केवळ आत्मवंचना होय. सरधोपट मार्ग आक्रमताना आम्ही सारासार विचार करताना दिसत नाही. अनेक लोक अमुक चित्रपट बघताहेत म्हणजे मीही बघितला पाहिजे असा आमचा सारासार विचार (!) असतो. अनेक संतांनी, सद्गुरूंनी अनुभव घेऊन, छातीवर हात ठेवून “तू इकडे फक्त ये, मी तुझा उद्धार करीन आणि तुला शाश्वत आनंदाप्रत नेईन” हे जे सांगितलेले आहे, तिथे आम्ही आमची so called सारासार बुद्धी वापरतो आणि ती अजूनही ‘असाराच्या’ जास्त आश्रयाला असल्यामुळे ‘सार’ आमच्या हातून निसटते. त्यामुळे अशी ज्याची बुद्धी स्थिर होऊन सारग्राही झाली तो निश्चितच थोर होय म्हणतात महाराज!

(२) हे जग वासनाधिष्ठित आहे. मनुष्याचा जन्मच मुळी वासनेतून आहे. या वासना अनंत जन्म गोळा झालेल्या वृत्तींमधून जन्मतात, विकारांमधून जन्मतात. त्यांची परिणती ऊर्मी मध्ये होते आणि ऊर्मी आली की कृती घडते हा क्रम आहे. या चक्राची मनुष्याला किंवा जिवाला अनंत जन्मांच्या संस्कारांमुळे इतकी सवय झालेली आहे की त्यातून बाहेर पडणे ही खरोखर ‘जीव के बस की बात नहीं है!’ मग जमायचे कसे? तर, सद्गुरू अनुग्रहामुळे, कृपेमुळे, सत्संगामुळे मनुष्याची अशी वृत्ति जागी होते – व्हावी की मला यातून बाहेर पडायचे आहे. ही तळमळ ज्याला लागली त्याच्यावर गुरुकृपा झालीच आणि या कृपेचे स्वरूप म्हणजेच नामात गोडी! ही गोडी लागलेला मनुष्य हा खऱ्या अर्थाने गुरुपुत्र असतो आणि त्याच्यावर साहजिकच विशेष गुरुकृपा असते, किंबहुना तो चालतीबोलती कृपाच असतो! आणि अशी हा कृपापात्र (ज्याच्या पात्रात – भांड्यात फक्त कृपा वसते) व्यक्तीच “थोर” या संज्ञेस लायक असते!

(३) श्रीमहाराजांना जेव्हा कुणी विचारत, की महाराज, कुंडलिनी जागृत करण्यासाठी काही करावे का? तेव्हा श्रीमहाराज हसून म्हणायचे, “अरे, ज्याच्या मुखात नाम आहे, त्याची कुंडलिनी जागृत झाली असलीच पाहिजे!” नाम मुखात, चित्तात वसणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे! म्हणजेच त्याची निष्ठा दृढ हवी की नामच मला या भवसागरातून तारणारे आहे, गुरूंच्या शब्दांवर पूर्ण विश्वास हवा, संपूर्ण अनन्यता हवी. अनन्य साधकच शेवटपर्यंत पोहोचू शकतो. भगवंताप्रत किंवा शाश्वत समाधानाप्रत जाण्याचे असंख्य मार्ग आहेत. बहुतेक वेळा गडबड अशी होते की सदगुरूंकडून नाम घेऊन अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनंतर कुणाचा काही अनुभव ऐकला की वाटते, मला तर काही अनुभव नाही, म्हणजे मला बहुधा नामाच्या जोडीला अजून काहीतरी करणे आवश्यक आहे. हाच तो बुद्धिभेद करणारा विकल्प! याला विटाळ समजून दूर ठेवतो व सद्गुरूंनी दिलेल्या नामाव्यातिरिक्त अन्य उपासनांचा आश्रय जो कदापि घेत नाही तोच थोर शिष्य. श्रीमहाराज म्हणतात, ब्रह्मदेवाने जरी सांगितले तरी नामाची निष्ठा कमी होऊ देऊ नये! असा नामनिष्ठ - नामात राहणारा साधक – शिष्य थोर असेल यात काय नवल?

(४) मनुष्याचे थोरपण त्याच्या जास्तीत जास्त निस्वार्थ होण्यात दडले आहे. एके ठिकाणी महाराज म्हणतात, संपूर्णपणे निस्वार्थी होणे म्हणजे परमार्थ! नाम साधन हे असे निस्वार्थतेकडे घेऊन जाणारे साधन आहे. कारण सद्गुरुंकडून नाम मिळण्याअगोदर बहुतेक जणांचा समज असा असतो, की धार्मिकता म्हणजेच अध्यात्मिकता. मनुष्य धार्मिक आहे, बऱ्यापैकी नीति पाळतो, देवाची पूजा अर्चा करतो, देवळात जातो, काही मंत्र विधी करतो तो धार्मिक असे म्हटले जाते. पण जर असे करणाऱ्या बहुतेक लोकांना विचारले, किंवा त्या लोकांनीच जर आत्मपरीक्षण केले तर हा धार्मिकपणा बव्हंशी ‘लौकिक गोष्टींचा मोह’ किंवा ‘काही अनिष्ट होऊ नये याची भीती’ यांवर अवलंबून असतो. तिथे निर्भयता नसते आणि अध्यात्मिकतेत किंवा परमार्थात मोह वा भीती यांना स्थानच नाही! सद्गुरू उपदिष्ट साधनेचा पायाच मुळी ‘अंतःशुद्धी घडून त्या अनंताचा साक्षात्कार करून घेणे’ हा आहे. त्यामुळे जो साधक नामात राहतो, त्याची अंतःशुद्धी बऱ्याच प्रमाणात झालेली आहे म्हणावयास नक्कीच हरकत नाही. कारण जोवर लौकिक कामना, भय निवारण वा तत्सम इच्छा असतील, तोवर नामात राहण्याइतके नामास चिकटणे शक्य होणार नाही! जेव्हा या गोष्टी bucket list मधून हद्दपार होतील आणि bucket मध्ये फक्त एक नामचिंतनच उरेल तेव्हाच ती थोरवी साधकास प्राप्त होईल!

असे अनेकानेक मुद्दे सांगता येतील, जेणेकरून नामात राहणारा थोर हे निश्चितच सिद्ध होईल, किंबहुना तो सिद्धच आहे! ज्याला नाम मिळाले व जो नामाला चिकटला, यापेक्षा मोठी सिद्धी ती कोणती?? मनुष्य जीवनाचे इतिकर्तव्य ते हेच!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. ध्यान मूलं गुरु मूर्ति, पूजा मूलं गुरु पदम् । मन्त्र मूलं गुरु: वाक्यं, मोक्ष मूलं गुरु कृपा ।।
    जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. श्रीराम! लौकिक कामना, आणि भयनिवारण हे हेतू bucket list मधून काढण्याचा आणि नाम चिंतनाचे बिज मुरवण्याचा यत्न कसून करीन मी! 🙏🌿🙏

    ReplyDelete