Friday, April 24, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८ –

इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल, ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते.

श्रीराम!
गीतेच्या अकराव्या अध्यायात भगवंत म्हणतात, “नाहं वेदैर्न तपसा न दानेन चेज्यया”| अर्जुना, हे जे माझे विश्वरूप तू पाहिलेस, म्हणजेच माझ्या स्वरूपाचे जे ज्ञान तुला झाले, ते वेदाध्ययनाने होत नाही, तपानेही होत नाही किंवा यज्ञानेही होत नाही. मग कशाने होते? तर “भक्त्या तु अनन्यया शक्य!!” हे स्वरूपाचे ज्ञान केवळ अनन्य भक्तीनेच होऊ शकते. आणि या अनन्य भक्तीचा पाया आणि कळस असेल तर ते म्हणजे भगवंताचे नाम!

बदल किंवा परिवर्तन हे दोन प्रकारचे असते. एक बाहेरून आणि एक आतून. योग साधनेसाठी किंवा ज्ञान मार्गासाठी प्रप्रथम साधकाला बाहेरून अनेक प्रकारची तयारी करावी लागते. अष्टांग योगात पहिल्या चार पायऱ्या बहिरंग साधनेत मोडतात. ज्ञान मार्गासाठी साधक ‘साधन-चतुष्टय-संपन्न’ असावा लागतो. ही पूर्वतयारी नसेल तर साधक त्या मार्गांवर प्रवेश सुद्धा मिळवू शकत नाही. आणि जर समजा, त्याने या पायऱ्या ओलांडून पुढे पाऊल टाकले तरी देखील प्रत्येक पायरीगणिक घसरण्याचा संभव फार. हे मार्ग कर्मप्रधान असल्यामुळे तिथे अहंकार वाढण्याचीच भीती जास्त आणि अहंकार हे सर्व दुर्गुणांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे इतर साधनांमध्ये अतिशय सावधानता बाळगण्याची जरूर आहे, जी आजच्या युगातील मनुष्यास खरोखर फार अवघड आहे म्हणतात महाराज. आणि जसे त्यांनी वरच्या वचनात म्हटले आहे, की साधले केव्हा म्हणता येईल? जेव्हा ते कायमचे साधेल तेव्हा. तात्पुरते साधण्याला साधले म्हणता येणार नाही.

याउलट ज्याला भक्तिमार्गावर पाऊल ठेवायचे आहे, त्याच्यासाठी कोणताच Criteria नाही. किंबहुना जर काही अंगी तपोबल, विद्येचे बळ, सामर्थ्य असेल तर ते भक्तिमार्गात आड येण्याचीच शक्यता जास्त, कारण भक्तीचा पाया आहे श्रद्धा! आणि या एकमेव भांडवलावर मनुष्य नाम साधनेस प्रारंभ करू शकतो. किंबहुना श्रीमहाराज तर म्हणतात, जो केवळ गुरूने दिले म्हणून नाम घेण्यास सुरुवात करेल, त्याची श्रद्धा देखील त्या नामाच्या बलाने पुष्ट होऊ लागेल. श्रद्धा पुष्ट होणे याचाच अर्थ अंतःकरणातील मलीनता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणे. श्रीराम बिभीषणाला म्हणतात, “निर्मल मन जन सो मोहि पावा| मोहि कपट छल छिद्र न भावा||” ज्याचे मन कपट धूर्तपणा यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होऊन निर्मल झालेले असते, तेच मला येऊन मिळतात. हेच महाराज म्हणतात, नामाने आतून सुधारणा होते. सर्व अध्यात्म किंवा परमार्थ हा Internal Evolution आहे. आज जे माझ्या मनाचे स्थूल गुणधर्म आहेत, ते कमीकमी होत जाऊन मनाला सूक्ष्मता येणे व त्याचे उन्मन होणे हे सर्व अध्यात्म साधनेचे रहस्य आहे. आणि म्हणूनच नाम साधना ही सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ होय!

मग महाराज “थोडा उशीर होईल” असे का म्हणत आहेत हा प्रश्न पडणे साहजिक आहे. याचा अर्थ नामामध्ये काही कमी आहे का किंवा काही दोष आहे का? तर मुळीच नाही. नाम हे परम शुद्ध, परम पवित्र, परम शक्तिशाली, परम मंगल असेच आहे. नाम जपणाऱ्या शिष्याच्या एकविध भावामध्ये कमी असेल आणि तो संपूर्ण शरणागत नसेल तर उशीर होणे स्वाभाविक आहे. प्रपंचात फापटपसारा वाढवण्याचा छंद जडलेल्या आम्हाला परमार्थात देखील एकच एक नाम हृदयाशी धरून ठेवणे अनेकदा जमत नाही. सदगुरूंकडून नाम मिळून किती वर्षे झाली यापेक्षा सद्गुरू भेटल्यावर आम्ही “त्यांचे किती लवकर झालो” यावर साधनेची एकाग्रता आणि प्रेम अवलंबून असते. आणि त्यांचे व्हायला आजवर जे जे अवडंबर गोळा केले ते त्यांच्या पायी द्यावे लागते. इथे हरणारा जिंकतो. जसे सूरदास म्हणतात,

“अप बल तप बल और बाहु बल, चौथो बल है दाम|
सूर किसोर कृपा ते सब बल, हारे को हरिनाम||”

संतांना माहित असते की जोवर कोणत्याही बलामध्ये भगवंताचे बळ जोडलेले नाही तोवर त्याची किंमत शून्य असते. म्हणून सूरदास म्हणतात, भगवंताची कृपा हे एकमेव बळ माझ्यात आहे, कारण बाकी सर्व बळ मी हरलो आहे आणि अशा सर्व बळ हरून निर्बल झालेल्यालाच हरिनामाचा आश्रय घेणे शक्य आहे! म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, “तृणादपि सुनीचेन”, गवताच्या पात्यापेक्षाही ज्याचा भाव दैन्य झाला, तोच भक्तीचा अधिकारी असतो. आणि हे हरायला त्या त्या व्यक्तीच्या स्थूल व सूक्ष्म अहंकारामुळे वेळ लागतो. परंतु असे असले, तरीही अगदी वैखरीने घेतलेले देखील एक नामही व्यर्थ जात नाही. संतश्रेष्ठ तुलसीदास मोठी गोड उपमा देतात. म्हणतात, शेतात दाणे पेरताना आपण कसेही पेरतो; त्याचे तोंड कुणीकडे आहे बघून मग पेरत नाही आणि तरीही पीक सगळीकडे सारखेच येते. तसे कसेही घ्या पण जर नाम घेतले तर त्याचे फळ मिळतेच. श्रीमहाराजही हेच सांगतात आणि पुढे जोडतात, श्रद्धेने घेतलेत तर जास्त बरे आणि वृत्ति सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे! आणि हे महाराजांनी सांगितलेले पाळून जो नामात राहील त्याची प्रगती वेगाने होईल आणि प्रगतीशी देखील संबंध सुटून तो “स्थिती”त स्थिरावेल! आणि हे परिवर्तन मुळापासून झालेले असल्याने ते कायमचे असेल हे निश्चित!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. श्रीराम! भक्तीचे श्रेष्ठत्व आणि भक्तीमध्ये नामाचे श्रेष्ठत्व सुयोग्य पद्धतीने मांडणारं चिंतन. सद्गुरूंचे वचन आणि त्याचा हा चिंतनात्मक विस्तार साधनेतली मुक्कामाची शाश्वती देणारा आहे.परत परत वाचन मनन करून आत उतरवावं असं दिग्दर्शन यात घडलं, हीच गुरूकृपा!
    सादर नमन!!! 🙏🌿🙏

    ReplyDelete