Saturday, April 18, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २ –

ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला नोकरीचे कष्ट माहीत नसतात, त्याप्रमाणे ज्यांना नामापरते सत्य नाही ही भावना आहे, त्यांना साधनाचे कष्ट नाहीत! पण एखाद्या गरीब यात्रेकरूजवळ आगगाडीत बसून जाण्याइतके पैसे नसले तर तो पायी यात्रा करतो आणि उशिराने का होईना पण तीर्थाला पोचतो, तसे आज आपण नाम ‘घ्यायला’ सुरुवात करू, म्हणजे आज ना उद्या आपण नामात रंगून जाऊ.

श्रीराम!
श्रीमहाराज पूज्य ब्रह्मानंद महाराजांबद्दल म्हणतात, “ब्रह्मानंद बुवांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणा बरोबर नाम सांभाळले. तुम्हाला जितके देहाचे प्रेम आहे, तितके त्यांचे नामावर होते.” वरच्या बोध वचनात जे महाराज म्हणतात की श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला नोकरीचे कष्ट नसतात, ते अशा सत्शिष्यांबाबत अक्षरशः खरे आहे. त्यांच्या आत्मिक विवेकामुळे ते लवकर उमजून जातात, काय सत्य, काय असत्य आणि कशाचा पाठपुरावा केल्यामुळे मला खरा आनंद मिळणार आहे! माझ्या आयुष्याचे ध्येय काय आहे ह्याबद्दल जराही शंका मनात न राहिल्यामुळे हे लोक वेगाने उद्दिष्टाच्या दिशेने जातात.

आणि महाराज जे म्हणतात, साधनाचे कष्ट नाहीत, याचे कारण हे की साधन हेच त्यांचे साध्य बनून जाते. नामात जेव्हा नामीचा बोध होऊ लागतो, श्रीमहाराजांचे किंवा सद्गुरूंचे दर्शन नामात होऊ लागते, तेव्हाचा आनंद त्रिभुवनातल्या आनंदाला पुरून उरणारा असतो. सूर्याला अंधार माहित नाही, तद्वत सद्गुरूंच्या अंतःकरणातील चिद्रूपाचा आनंद ज्याला थोडाही जाणवला, त्याला कसले आलेत कष्ट? पूज्य बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणतात, तसे, अशा साधकाचे आयुष्यच भगवंताची लीलाभूमी बनून जाते!

म्हणूनच सर्व संत एका महत्त्वाच्या गोष्टीवर भर देताना दिसतात. ती म्हणजे, तुम्ही सद्गुरूंनी दिलेले साधन तर कराच पण त्या अगोदर त्यांचे बना! Be His child first and then enjoy the ride with Him! पण असे प्रेम सहवासाने येते म्हणतात श्रीमहाराज आणि तो सहवास सद्गुरूंना जे अत्यंत प्रिय आहे त्या नामात राहिल्याने मिळतो. तो सहवास कसा मिळतो, ते सान्निध्य कसे जाणवते, ते आतले दर्शन कसे होते, त्यांचे मार्गदर्शन कसे लाभते या प्रश्नांची उत्तरे कुणीही सत्शिष्य देऊ शकत नाही; किंबहुना जोवर उत्तर देता येते आहे तोवर खरे सानिध्य जाणवलेले नाही. एक वेळ भगवंताचे गुणवर्णन करता येईल; परंतु सद्गुरूंच्या प्रेमाला आजवर उपमा कुणालाही शोधता आलेली नाही, येणार नाही!!

महाराजांना सांगायचे आहे की ज्याचा असा सत्यासत्य विचार प्रबळ आहे, त्याचा आगगाडीचा मार्ग आहे, तो इतरांच्या तुलनेत लवकर मुक्कामी पोहोचेल; परंतु याचा अर्थ अशी दृढ भावना नसणाऱ्यांनी निराश व्हायचे कारण नाही हे महाराजांनी पुढच्या वचनाच्या भागात मुद्दाम सांगितले आहे! ही आहे सद्गुरू माऊलीची करुणा!!! एकदा श्रीमहाराज पूज्य बाबा बेलसरेंना म्हणाले, वर्गात एक मुलगा first class येण्यापेक्षा शंभर मुले third class मिळवून का होईना पास होणे यात खरे शिक्षकाचे कौशल्य आहे! हे याबाबतीत होते, की हरकत नाही, तुमची अजून तेवढी निष्ठा दृढ नाही ना? तरीही मी तुम्हाला तारेन; फक्त तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा. हे मात्र तुम्हाला केले पाहिजे. प्रवासाला सुरुवात तर करा म्हणतात महाराज. नुसते मला अमुक गावी जायचे आहे जायचे आहे असे म्हणून उपयोग होत नाही, इकडून निघाले तर आज न उद्या पोचू, तसेच हे आहे.

नाम घेणे आणि नामात राहणे या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. परंतु पहिली नाम घेण्याची अवस्थाच आपल्याला दुसऱ्या नामात राहण्याच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाऊ शकते. मला अजून नामात रस येत नाही, कंटाळा येतो, ही सबब सांगून वैखरीने जो नाम घेण्याचे टाळतो, जो नेमाने नामाला बसत नाही, तो कधीच दुसऱ्या अवस्थेला पोहोचत नाही. श्रीमहाराजांना एकाने विचारले, मी जाता येता नाम घेतो, एकीकडे बसून घेण्याची जरूर आहे का? तेव्हा महाराजांनी त्याला विचारले, “तुम्हाला मुलगा आहे ना? तो अभ्यास एकीकडे बसून करतो की जाता येता करतो? त्याने जसे अभ्यास बसून करणे तुम्हाला आवश्यक वाटते तसेच दिवसातील काही वेळ तरी एके ठिकाणी बसून नामाचा अभ्यास घडणे आवश्यक आहे!”
आणि इतर कितीतरी व्यवहारातील कामे आपण इतक्या एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करतो, जी आपल्या सवयीची असतात तरीही! मग नाम हे तर अदृश्य अलौकिक आनंदजगताचे प्रवेशद्वार आहे; मग त्याच्या अभ्यासाकडे किती लक्ष देणे जरूर आहे! हे जो मनापासून करील तो नामात रंगेल म्हणतायत महाराज! नामात रंगणे म्हणजेच त्या नित्यानंदात मग्न होऊन शाश्वत सुख भोगणे होय.

आजही पुन्हा पूज्य बाबांची नाम चंद्रिका उद्धृत करण्याचा मोह होतोय –

नामैव परमानन्दो नामैव भगवान् स्वयम् |
स्वस्वरूपं च नामैव नामैव परमं पदम् ||

हे असे नाम आहे आणि म्हणून संत म्हणतात, या नाम तत्त्वज्ञानाचा बोध आपल्याला तेव्हा होईल, जेव्हा “नामापरते सत्य न मानावे” हे श्रीमहाराजांचे बोल आपण हृदयात ठसवू, त्यानुसार गुरुकृपेने विवेक जागृत ठेवू, अखंड सावध राहू आणि त्या सद्गुरुपदिष्ट नामाच्या अभ्यासात जास्तीत जास्त काळ घालवू!

||श्रीनाम समर्थ||




2 comments: