Wednesday, July 15, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५९ –

‘भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही’, असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.

श्रीराम!
पूर्वीच्या काळी (काही ठिकाणी अजूनही) पहाटे ‘वासुदेव’ यायचे. निद्राधीन लोकांना जणू जागे करून भक्तिरसात न्हाऊ घालण्याचेच त्यांचे काम. पारमार्थिक जगात संत या वासुदेवाचे कार्य करतात. दृश्याच्या निद्रेत निजलेल्यांना जागे करून शाश्वत प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आपल्या श्रेष्ठ संतांनी असे काही अभंग रचले, ज्यांना देखील ‘वासुदेवी अभंग’ म्हटले गेले. संतश्रेष्ठ नामदेव अशाच एका वासुदेव अभंगात म्हणतात,

“बाबा अहंकार निशी घनदाट|
गुरुवचनी फुटली पहाट||
भक्ति भेटली बरवंट|
तिने मार्ग दाविला चोखट गा||”

आजच्या श्रीमहाराजांच्या वचनात “कळणे” हा शब्द तीन वेळा आला आहे. म्हणजेच भगवंताचे स्वरूप ‘न कळणे’ हीच परमार्थ मार्गातली धोंड आहे. वेदांत ज्याला ‘अज्ञान – Ignorance’ म्हणतो तो हाच. आणि नामदेव महाराज म्हणताहेत, हे जे अज्ञान आहे, ते अहंकाराच्या घनदाट अंधःकारामुळे आहे. मात्र या घनदाट अंधःकारावर एक चोख इलाज आहे – “गुरुवचन”!
सद्गुरू लीलामृतात चवथ्या अध्यायात आपण वाचतो,
“गुरुवचन तो वेदांत| गुरुसेवा हा धादांत|
गुरुकृपा तोचि सिद्धांत| गुरुपुत्रासी||”
म्हणजेच तथाकथित मायेचा पडदा भेदण्यासाठी केवळ गुरुवचन प्रमाण मानून जो शिष्य मार्गक्रमण करेल त्यालाच “कळेल”!

आणि श्रीमहाराज म्हणतात,
“नामापरते सत्य न मानावे!”

असे म्हटले जाते, संत आयुष्यभर जे बोलतात ते तर महत्त्वाचे असतेच; परंतु या भूलोकातील देहाचे कार्य संपवताना ते जे बोलतात, त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. श्रीमहाराज देह त्याग करताना म्हणाले,
“जेथे नाम तेथे माझे प्राण| ही सांभाळावी खूण||”

या सर्व गोष्टी एकाच दिशेकडे बोट करतात – नाम हेच भक्ताचे सर्वस्व आहे – असावे – व्हावे. परमार्थ मार्ग अनेक आहेत. मात्र सर्व मार्गातील संत एका गोष्टीवर ठाम आहेत, की शरणागती शिवाय ज्ञान नाही. आणि जेव्हा या शरणागती बद्दल शास्त्रीय दृष्टीने विचार झाला तेव्हा देखील सर्व संतांच्या लक्षात एकच गोष्ट आली जी त्यांनी अनुभवली - भगवंताचे नाम, ज्याचा उगम परा वाणीतल्या ॐकारापासून झाला, ज्याने सगुण साकार भगवंताला त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाशी सांधले, त्याचाच आधार घेणे क्रमप्राप्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महायोग्याने ग्वाही दिली, “म्हणोनि नाम वज्रकवच| तोचि निर्गुणाचा अभ्यास||” आणि स्पष्ट सांगितले, “नाम अनुभव वेदांचा!” श्रीमहाराज म्हणतात, तुम्हाला नामाचे – खऱ्या साधन मार्गाचे व साध्याचे सम्यक ज्ञान देण्यात संतांचा काय स्वार्थ होता? ज्याचा त्यांना फायदा झाला व ते “जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनं” यातून मुक्त झाले, त्याचा फायदा जगताला मिळून अनेकांचा उद्धार व्हावा ही एकच तळमळ त्यांना होती! आम्ही न बघितलेल्या परंतु विज्ञानाने सिद्ध केलेल्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो, मग संतांनी ज्याचा चोख अनुभव घेतला त्यावर सुरुवातीला विश्वास ठेवून मार्ग अक्रमण्यात गैर काय? नामाशिवाय कोणत्याही साधनाने संपूर्ण अहंकाराचा लय आणि त्यापुढे जाऊन भगवंताचे प्रेम संभवत नाही हे त्रिवार सत्य श्रीमहाराजांनी परोपरीने सांगितले. म्हणूनच आपल्या परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांनी आपली जिव्हा नामाला विकली व त्यानंतर पुन्हा तथाकथित शास्त्रोच्चार त्या जिव्हेने केला नाही! 

भक्ति महाराणी दैन्यतेच्या सिंहासनावर विराजमान होते! जोवर स्थूल आणि सूक्ष्म अहंकाराने अंतर्याम भरलेले आहे, तोवर भक्ति महाराणीचे आगमन हृदयाकाशी होत नाही. नामाचे महत्त्व इथे आहे. जोवर आम्ही नामाशिवाय इतर साधने ‘करतो’, तोवर आमच्यातला मीपणा विरत नाही. कारण इतर साधनांना बाह्य जगतातून काही ना काही मदत लागते. जसे, योग मार्ग असेल तर या शरीराच्या काही क्रिया व अनुशीलन करणे आवश्यक आहे. ज्ञान मार्ग असेल तर बुद्धीने त्याचे सम्यक आकलन व मनन करणे गरजेचे आहे. ते मार्ग देखील खरे तर शरणागती मध्येच शेवटी स्थिरावतात – स्थिरावावेत; मात्र यात देह मन बुद्धी या उपाधींचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे साधक ‘कर्मात’ अडकण्याची भीती आहे हे निश्चित. संपूर्णपणे निरुपाधिक साधन, जे साध्यरूपच आहे ते म्हणजे भगवंताचे नामच होय.

तीन गोष्टी आहेत -- कर्म – क्रिया – सहज कर्म. कर्म हे बहुतेक वेळा बाह्य गोष्टींवर आधारित असते. क्रिया ही साध्याप्रत घेऊन जाण्याचे साधन आहे. सहज कर्म मात्र साधकाला कर्म बंधनातून मुक्त करते, कारण सहज कर्मात कर्तेपणाचा संपूर्ण लय होतो. आणि असे सहज कर्म केवळ भक्तीनेच घडू शकते. अशा भक्ताचा प्रत्येक दिवस आणि त्यामधील प्रत्येक कर्म याचा हेतू भगवंत, कर्माचा प्रेरक भगवंत, ज्याच्यासाठी ते कर्म करायचे तो भगवंत आणि अहंकार त्याच्याच चरणी लीन झाल्यामुळे त्या कर्मफलाचा भोक्ताही पुन्हा भगवंतच! अशी निरुपाधिक भक्ति साधण्यासाठी नामाखेरीज अन्य उपाय नाही. अशा भक्ताला कर्मबंधनात अडकण्यासाठी वाव राहिलाच कुठे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज नामाबद्दल म्हणतात, “सुलभ आणि सोपारे केलेसे दातारे!!!” अहाहा! कुणी सोपे केले? दातारे! ज्याने नाम दिले त्या गुरूने हे सोपे केले आणि म्हणून आम्हाला परमार्थ मार्ग सुलभ झाला म्हणताहेत संतांचे मुकुटमणी ज्ञानदेव! अशा रीतीने नामसाधक आपल्या साधनेचा उगम, मध्य आणि कळस सर्व आपल्या गुरूमध्ये पाहत असल्यामुळे मीपणाला वाव न राहता सहजच हृदयामध्ये पारमार्थिक दैन्य – लीनता प्रकटते आणि भक्ति महाराणीच्या रम्य विलासाने त्या भक्ताचे हृदय भरून जाते!

म्हणून श्रीमहाराज म्हणतात, “अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे!” वाचावेत का सांगताहेत? कारण, गावाला वळसा मारून आल्याशिवाय काखेत कळसा आहे हे बहुधा कळत नाही! पण ते म्हणतात, हरकत नाही. द्राविडी प्राणायाम केल्याशिवाय तुम्हाला नामाचा सहजपणा मनावर ठसणार नाही. बहुतेक सर्व साधकांचा थोडाबहुत हा अनुभव आहेच. मुळात गुरुकृपेने ज्यांना थोडेतरी नामाचे प्रेम लाभले, त्यांना इतर काहीही केले, वाचले, ऐकले, तरी त्याचा मनबुद्धिला होणारा आनंद हा थोडा काळ टिकतो हे लक्षात येते. जगातली कितीही वेगवेगळी सुंदर ठिकाणे बघितली, तरी जसे आपल्या घरी परत आल्यावर मनाला समाधान वाटते, त्याप्रमाणेच इतर काहीही केले तरी असे नामाचे प्रेम लाभलेला साधक नामाला बसल्यावर त्याला “आपल्या घरी” आल्याचा परमानंद होतो व विश्रांती लाभते. आणि मग “नाम हेच एकमेव सत्य आहे” या उदात्त अनुभूतीत त्याची साधना हा त्याचा स्वभाव बनतो आणि भगवंताचे प्रेम तो प्रत्येक क्षणी अनुभवतो!

||श्रीनाम समर्थ||

Monday, July 6, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५८ –

भगवंताचे नाम हे बॅटरीसारखे आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा ते प्रकाश देते. ते आपल्या खिशामध्ये, म्हणजे हृदयामध्ये राहू शकते. तिने आपले अंग भाजत नाही, तसे नामाने आपल्याला वैराग्याचे कष्ट नाहीत; आणि कुठेही ते बरोबर नेता येते.

श्रीराम!
महाराजांची वचने दर वेळी नवीन अनुभूती, नवीन अर्थ आणि नवीन आनंद देतात. खरोखर वचनांची संगती हे गुरूंचे अनुसंधान टिकवण्यासाठी श्रेष्ठ साधन आहे यात शंकाच नाही. पुन्हा वचने ही मुख्यतः अर्थरूप असल्यामुळे ती देखील नामाप्रमाणे जणू सगुण सद्गुरू आणि त्यांचे सदा विद्यमान असे निर्गुण रूप या दोन्हींना सांधतात. किती भाग्यवान आपण, ज्यांना आपल्या सद्गुरूंनी हा अनमोल ठेवा दिला! आजच्या वचनात श्रीमहाराज नेहमीप्रमाणे नामाचेच महत्त्व आणि श्रेष्ठत्व सांगत असले तरी ते दोन अंगांनी अतिशय महत्त्वाचे असे वचन आहे. वरवर बघितले तर असे वाटण्याची शक्यता आहे की महाराज इथे आम्हाला नाम हवे तेव्हा उपयोगाला येईल, म्हणजे संकटात काम देईल असे सांगत आहेत. अर्थात ते अयोग्य नाहीच. नामाला शरण गेलेला साधक हा प्रत्येक गोष्टीतच नामाला शरण जातो. जसे, गुरुदेव रानडे म्हणायचे, नामात विश्व निर्माण करण्याची शक्ती आहे, साधा रोग नाही बरा करणार? अनेक असे श्रेष्ठ साधक श्रीमहाराजांच्या चरित्रात देखील वर्णन केले गेले ज्यांनी शारीरिक आजारपणात नाम हेच औषध मानून त्यावरची आपली निष्ठा दाखवून दिली. अशा प्रसंगात, इतर कुणाप्रती शरणागती नसून केवळ नामावर पूर्ण श्रद्धा असल्यामुळे असे अनन्य नामभक्त आपल्या मुक्कामी सहज पोचले. पण अशी निष्ठा अत्यंत कठीण आहे यात शंका नाही. बॅटरी म्हणण्याचे कारण म्हणजे जेव्हा संपूर्ण अंधाऱ्या खोलीत आपण बॅटरी घेऊन जातो तेव्हा हळूहळू त्या खोलीत प्रकाश होतो असे होत नाही. बॅटरी लावल्या लावल्या सबंध खोली एकदम उजळून निघते. तद्वत नामाची बॅटरी ज्याने सोबत बाळगली त्याचे अध्यात्मिक आयुष्य हळूहळू प्रकाशित होते असे त्याला प्रकृतीच्या पडद्यामुळे वाटले तरी देखील नाम मिळणे आणि ते गुरुकृपेने मुखात येणे याचा अर्थच सबंध लौकिक आणि अलौकिक जीवन प्रकाशित होणे होय. श्रीमहाराज म्हणायचे, नाम मुखात येते आहे म्हणजे कुंडलिनी जागृत झाली असलीच पाहिजे. याला म्हणतात नामाच्या शक्तीवरचा विश्वास.

मात्र “आपल्याला पाहिजे तेव्हा नाम प्रकाश देते” हे वचन याहीपेक्षा जास्त अर्थगर्भित आहे. याचा जोड “नामात राहणे” याच्याशी लागतो. नामात राहणे ही ‘सहज प्रक्रिया’ आहे, कारण नाम हे स्वयंभू, स्वयंपूर्ण आणि स्वयंप्रकाशी आहे. जो नामाच्या – नामीच्या – भगवत तत्त्वाच्या चिंतनात निरंतर राहतो, त्याला ‘आता मी नाम घेतो, किंवा आता मी नामाला बसतो’ अशी आठवण स्वतःला करून द्यावी लागत नाही. याचा जोड पुन्हा ‘नाम हेच शुद्ध चैतन्य आहे’ याच्याशी लागतो. जसे, ‘आता मी अमुक गोष्टीबद्दल विचार करतो’ असा मुद्दाम विचार करावा लागत नाही. किंवा ‘माझा हात खाजवत आहे, तर दुसऱ्या हाताला असे सांगावे लागत नाही की खाजव’; ती प्रक्रिया सहज घडते. शुद्ध चैतन्य किंवा ज्याला कृष्णमूर्ती Choiceless Awareness म्हणतात, ते मी आहे, तेच मी आहे, अशी ज्ञानी मनुष्याला आठवण करावी लागत नाही; तो सहजच त्याच्याशी एकरूपत्व अनुभवतो. खूप सूक्ष्म (subtle) आहे हे. “ॐकाररूपि तन्नाम हृन्मन्दिर निवासि च” म्हणते पूज्य बाबांची नामचंद्रिका (ॐकार रूप असलेले नाम हृदयाच्या गाभाऱ्यात निवास करते; त्याचा निवास व्हावा म्हटलेले नाही, निवासी आहेच!). गीता म्हणते, “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति|” (ईश्वर सर्व भूतमात्रांच्या हृदयात राहतो; राहावा म्हटलेले नाही). हे नाम – भगवंत आणि शुद्ध चैतन्य यांचे एकरूपत्व दाखवण्यासाठी पुरेसे आहे. श्रीमहाराजांसारखे संत जे नामरूप आहेत आणि त्याचे श्रेष्ठ शिष्यगण जे नामरूप झाले त्यांना त्या नामरूपत्वाची जाणीव सतत असली तरीही लोककार्य करण्यासाठी, आमच्यासारख्यांना शिकवण्यासाठी त्या वरच्या पातळीवरून खाली येऊन ते आम्हाला सांगावे लागते व याची सुरुवात प्रपंचात देखील नामाचा प्रकाश पडेल हे सांगण्यापासून होते. मग जेव्हा जरूर असते तेव्हा हवा तसा त्या चैतन्याचा ते उपयोग करतात; जणू नाम (जे शुद्ध चैतन्य आहे) ते आपल्या खिशात वागवतात. श्री रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी श्रीमती शारदा माता या त्यांच्या शिष्यांना प्रत्यक्ष माता भवानी स्वरूप होत्या, त्यांना तशी अनुभूती होती. रामकृष्णांनी देह ठेवल्यावर बऱ्याच वर्षांनी एकदा त्यांच्या जवळच्या शिष्याने मा शारदांना विचारले, ‘माता, तुम्ही प्रत्यक्ष शिवा-स्वरूपिणी’ आहात हे तुमच्या सतत अनुभूतीत असते का?’ तेव्हा अगदी सहजपणे त्या म्हणाल्या, “तसे नसते. तसे झाले तर एवढे सगळे काम मी कशी करू शकेन? मात्र जेव्हा जरूर असते, तेव्हा मी त्या मूळ रूपाचा आधार घेऊ शकते.” अजून एक रामकृष्णांचेच थोर शिष्य गमतीने म्हणायचे, “चैतन्य स्वरूप हे आपल्या आवडत्या उशीप्रमाणे असते. जेव्हा वाटेल तेव्हा त्या उशीवर पडून आपण आनंद उपभोगू शकतो!” हे सांगण्याचे कारण, श्रीमहाराज जे म्हणताहेत, नाम आपल्याला पाहिजे तेव्हा प्रकाश देते, याचा अर्थ, ते प्रकाशमानच आहे; फक्त ते नामाचे खरे भगवत स्वरूप आपल्याला हवे तेव्हा (हुकमी) दृग्गोचर होते! यामुळेच नामाच्या दिव्य भव्य शक्तीत सतत राहणारा श्रीमहाराजांसारखा संत देखील लोकांमध्ये राहून अमाप लोककार्य करू शकतो.

अग्नी आणि भाजणे हे एकरूप आहे. मूळ शुद्ध स्वरूपात चैतन्य शक्ती धारण करणे जिवाला जवळजवळ अशक्य आहे, कारण त्यामध्ये वैश्वानर भगवंताचे वैश्विक रूप सामावलेले आहे. मात्र जेव्हा ही वैश्विक शक्ती संतांनी परा शक्तीच्या कृपेने नाम रूपाने हृदयात धारण केली तेव्हा ती शक्ती परमशीतल झाली. संतांच्या प्रेमभावाचे त्यावर गोड सिंचन झाले व त्यामुळे वैश्विक शक्ती बीज रूपाने असलेले नाम आपले शुद्ध चैतन्याचे दाहकत्व विसरून योग्यांच्या देखील हृदयाला गारवा प्रदान करणारे असे झाले. शुकादिक परमहंस देखील नामाची महती भागवतात गातात याचे कारण हेच.

श्रीमहाराज म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या, ते विवेक – वैराग्य मी सांभाळतो आणि म्हणूनच आजच्या वचनात म्हणतात, नामाने वैराग्याचे कष्ट नाहीत. परमार्थ मार्गासाठी दृश्यापासून वैराग्याची आवश्यकता आहे हे खरेच. मात्र वैराग्य मिळवण्यासाठी देहदुःख किंवा ताकदीचे इंद्रियदमन या गोष्टी श्रीमहाराजांना मान्य नाहीत. कारण ते म्हणतात, त्याची आवश्यकताच नाही. जो नाम घेईल, त्याच्या मागे वैराग्य लागेलच. नामाने हळूहळू जगाचे स्वरूप प्रकट व्हायला लागते व जो नामात राहू लागतो, त्याला नामाचे प्रेम आल्याने स्वाभाविकच जगताबद्दल व देहासंबंधी उदासीनता येते. उदासीनता म्हणजे व्यग्रता नसून ‘जे आहे ते असो, जे नाही ते नसो’ अशी भावना होऊन निष्काम कर्मयोगात राहणे होय. असे हे परमसुंदर भगवंताचे नाम आपल्याला कुठेही बरोबर नेता येते, यापेक्षा साधनेची सुलभता अजून कोणती? जे आपले आत्मस्वरूपच आहे असे नाम – त्याला सोडून आपण कुठे जाणार? मात्र हे लक्षात यायला गुरुकृपा भाकून निरंतर नामात ‘राहता यावे’ अशी कृपा करावी अशी मनापासून प्रार्थना करणे जरूर आहे. कारण, पेढा गोड आहे असे नुसते सांगून त्याचा गोडवा कसा कळणार? तोंडात टाकला तरच कळणार. तसा नामाचा पेढा तोंडात धरून या संसारात पद्मपत्राप्रमाणे राहणारा खरा ‘योगी’ होय!

||श्रीनाम समर्थ||

Friday, July 3, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५७ –

पूर्वीच्या काळी अस्त्रे वापरीत असत, त्यामध्ये एकमेकांना मारक अशी अस्त्रे असत. एकाने सर्पास्त्र सोडले की दुसऱ्याने गरुडास्त्र सोडावे, इत्यादी. याप्रमाणे मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर उलट भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे, म्हणजे विषय आपोआपच नाहीसा होईल.

श्रीराम!
कोणत्या गोष्टींनी जीव आपल्या स्वरूपापासून च्युत होतो याचे कारण सांगताना शंकराचार्य म्हणतात, “अविद्या – काम – कर्म” (Ignorance – Desire – Desire prompted action). श्रीमहाराज म्हणतात, परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल संशय असणे याचे नाव अज्ञान. या अज्ञानातून वासना जन्म घेते आणि वासनेतून जे कर्म घडते ते बंधनकारक झाल्यामुळे जीव आनंदस्वरूप भगवंताचा अंश असूनही दुःख भोगतो. दोन्हीचा अर्थ तत्त्वज्ञान दृष्ट्या एकच. एकीकडे महाराज म्हणतात, “वासना मुळात नव्हतीच. आपण तिला आहे म्हटली की ती अस्तित्वात आली. आता ती नाही असे आपण म्हटले की ती नाहीशी होईल.” हे वचन अक्षरशः ब्रह्मवाक्य आहे. पूर्ण असलेला जीव अविद्येमुळे स्वतःला अपूर्ण समजला, या अविद्येतून वासना उदय पावली की दृश्यातील अमुक गोष्ट मिळाली (पैसा, लौकिक, नातेसंबंध, कीर्ती, वगैरे) तर मी पूर्ण होईन. पण ह्या अपूर्ण वस्तूतून पूर्णता येऊ शकणार नाही ह्याचे आकलन न झाल्याने जीव विषयात गुंतला.

सर्व साधना ही आपल्या मूळ स्वरूपाला मिळवण्यासाठी करायची नाही; ते स्वरूप आपल्याला प्राप्तच आहे. केवळ आम्ही अपूर्ण आहोत आणि वासनेतून आम्हाला पूर्णत्व मिळेल या अविद्येचा समूळ निचरा होण्यासाठी साधन आहे. यालाच आजच्या वचनात श्रीमहाराज अस्त्राची उपमा देतात. श्रीमहाराज एकीकडे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाचे एकत्व स्पष्ट करताना म्हणतात, वेदांती ज्याला ‘ब्रह्म’ असे म्हणतात, त्यालाच भक्त ‘नाम’ असे म्हणतात. आजच्या वचनात विषयाचे अस्त्र मायेने सोडणे म्हणजेच आमच्या अविद्येने आम्हाला ठकवणे होय. कारण मायेचे अस्तित्वच भ्रमात आहे. महाराज म्हणायचे, जी नाही पण आहे अशी वाटते ती माया. “नामापरते सत्य न मानावे” हे महाराज जे म्हणतात त्याचे महत्त्व इथे आहे. मानावे म्हटले आहे खरे, कारण आम्हाला आज त्याची जाणीव नाही. मात्र नामापरते सत्य नाहीच, ब्रह्मापरते सत्य नाहीच; केवळ आमच्या अविद्येने आम्हाला दोरी साप भासते आहे. आणि या अविद्येला समूळ नष्ट करायचे असेल तर त्याला नामाच्या अस्त्रानेच करता येईल असे स्पष्टपणे आजच्या वचनात महाराज आम्हाला सांगत आहेत.

श्रीमहाराज म्हणायचे, विषय त्रास देऊ लागला की समजावे की नाम कमी पडते आहे, याचे कारण हेच की नाम हे एकच असे परम सत्य आहे याची जाणीव नाम घेत गेल्याने जी अध्यात्मिक शक्ती गुरुकृपेने साधकात येते त्या बळावरच तो स्वरूपाच्या जाणीवेत स्थित होऊ शकतो व मायिक भ्रमाचा निरास करू शकतो. विषयाचा उगम कुठे आहे? तर मनात आहे. जोवर ‘मी देह आणि मन आहे’ हा भ्रम जिवंत आहे, तोवर विषय खरे वाटतात असे महाराज म्हणतात. आमची सर्व अविद्या “जे खोटे आहे ते खरे मानण्याने आणि जे खरे आहे ते तितकेसे खरे न वाटण्याने” आहे. मात्र जे सत्य आहे, ते नाम सूर्यप्रकाशासारखे आहे. आम्ही जर म्हणालो, सूर्य मला माहित नाही, मी सूर्याला ओळखत नाही, तरी देखील त्या सूर्याचा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. तद्वतच आज आम्ही नामाला हवे तितके सत्यत्व दिले नाही, तरी सत्य वस्तु स्वयंभू, स्वयंपूर्ण असल्यामुळे नाम जपत गेल्यानेच त्याचे सत्यत्व आणि विषयाचे मिथ्यत्व प्रकट होत जाईल हेच महाराजांना आजच्या वचनातून सुचवायचे आहे. म्हणूनच ते म्हणायचे, जे सोडायचे त्याचा जास्त विचार करण्यापेक्षा जे धरायचे ते भगवंताचे नाम, त्याचे अखंड स्मरण हे धरावे म्हणजे सोडण्याच्या गोष्टी आपोआप सुटून जातील. वैराग्य ही अवस्था वासनेच्या कायमच्या मुक्तीपासून अनुभवण्याची गोष्ट आहे, वैराग्य म्हणजे बाहेरून काही सोडणे नव्हे तर आतून त्या गोष्टीची इच्छाच न होणे होय. अशा रीतीने नामप्रेम आणि विषयप्रेम या एकमेकांना मारक गोष्टी आहेत असे महाराज म्हणतात.

वेदांतात ‘साधनेने काय साधते’ या प्रश्नाचे उत्तर आहे, “प्राप्तस्य प्राप्तिः निवृत्तस्य निवृत्तिः||” -- जे तुम्हाला कायम प्राप्तच असे सत्य आहे तेच तुम्हाला दृष्टिगोचर होते व जे कधी नव्हतेच ते नाहीसे होते. म्हणून श्रीमहाराज म्हणतात, नामात जो मनापासून राहील, त्याला नाम हेच परम सत्य आहे याची अनुभूती येईल, नाम हेच साध्य आहे हे कळेल. म्हणजेच हे नव्याने कळायचे आहे असे नव्हे. जे आहेच त्याची प्रचीती म्हणजे ‘दर्शन’ आणि जे नव्हतेच ते ‘देह – मनाचे व्यापार’ ते नाहीसे होऊन स्वरूपानंदात सु-स्थित होणे म्हणजेच “नामाचे खरे दर्शन” होय!

||श्रीनाम समर्थ||



Sunday, June 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५६ –

भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर मग दुःख असले म्हणून बिघडले कुठे?

श्रीराम!
“यत्न कसून करीन मी यश दे रामा, न दे, तुझी सत्ता|
हाचि निरोप गुरूंचा मानावा राम सर्वदा कर्ता||”
या निरोपाच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला प्रयत्नाचे महत्त्व आणि रामाची सत्ता या दोन्ही गोष्टी सांगताहेत. याचे कारण - आम्ही देहात असल्या कारणाने आमचे सुख आणि दुःख हे देहावर अवलंबून आहे असे आम्ही समजतो, कारण आमचा आणि इतरांचा देह आणि त्याच्याशी निगडीत व्यवहार हे आमच्या ज्ञानाचे क्षेत्र आहे. त्यामुळेच श्रीमहाराज एकीकडे म्हणतात, “देहबुद्धी असेपर्यंत प्रयत्नच श्रेष्ठ आहे.” हे सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या वचनात ज्या दुःखाचा उल्लेख श्रीमहाराज करत आहेत, ते या देहबुद्धीच्या क्षेत्रातले दुःख आहे. समर्थ दासबोधात जे आधिभौतिक, आधिदैविक आणि आधात्मिक तापांचे (दुःखांचे) वर्णन करतात ती सर्व प्रकारची दुःखे आजच्या व्च्नातल्या ‘दुःख’ या संज्ञेत समाविष्ट होतात. आमच्या समजुतीनुसार ही दुःखे बहुतेक वेळा आमच्या प्रयत्नांवर अवलंबून असल्यामुळे ‘अमुक गोष्ट केली असती तर बरे झाले असते’ असे आम्हाला देह, वस्तु, व्यक्ती, नातेसंबंध, परिवार, कामकाज, धंदा – व्यवसाय अशा अनेक बाबतीत वाटते आणि जेव्हा आमच्या अपेक्षेनुसार परिणाम या दृश्य क्षेत्रात दिसत नाही तेव्हा आम्हाला दुःख होते.

सर्व अध्यात्म शास्त्र हे या पायावर आधारित आहे, की या दृश्य जगात जे जे आहे त्यात शाश्वत सुख नाही. ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ हे वाटणे देहबुद्धीत जगणाऱ्या मनुष्यासाठी अगदी स्वाभाविक आहे. कारण त्याचे सुख आणि दुःख दोन्ही बाह्य गोष्टींवर अवलंबून असते आणि बाह्य गोष्टींवर आमचा बहुतांशी ताबा नसतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात,
“जो त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थासी” कारण हे मायारूपी दुःख आल्याशिवाय शाश्वत समाधान नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे, तिचा अनुभव संत समाजाने घेतलेला आहे, हे आमच्या गावीही नसते आणि आम्ही आमचेच दुःख कवटाळून बसतो. सबंध गावाने वाळीत टाकून सुद्धा आमची ज्ञान माऊली म्हणते, “अवघाचि संसार सुखाचा करीन| आनंदे भरीन तिन्ही लोक||” कुठून आली ही गर्जना?? जगाच्या दुःखमय असण्याशी हे विपरीत नाही का असे वाटणे स्वाभाविक आहे. या गर्जनेचा उगम आहे, “शांतीची पै शांती निवृत्ती दातारू| हरिनाम उच्चारू दिधला तेणे||” ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत, शांतीचे आगर असलेल्या सद्गुरूंनी (निवृत्तीनाथांनी) हरिनाम दिले (नाममंत्र दिला) आणि तेणे जाहले सकळ काम!

‘सदगुरूंकडून नाम मिळणे’ याचे महत्त्व काय आहे हे ज्याला समजले त्याचे जग बदलले नाही तरी जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. प्रारब्धाने येणारी दुःखे भोगावी लागली तरी त्याची झळ नाम जणू शोषून घेते हा सर्व नाम साधकांचा अनुभव आहे. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात,

आनंदे करूनि संसारी असावे| नाम आठवावे श्रीरामाचे||
नामाचिया योगे संसार तो चांग| येरव्ही ते अंग व्यर्थ जाय||
ऋषीमुनी सिद्ध संत महानुभाव| रामनामे भाव सुखे केला||
नामे होय सुख, नामे निरसे दुःख| रामनाथ एक हृदयी धरा||

अगदी हेच श्रीमहाराज आजच्या वचनात सांगत आहेत. फक्त अट आहे, नामाचा “नाद” लागला पाहिजे! ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात,
“आवडी आणि लाजवी| व्यसन आणि शिणवी|
पिसे आणि न भुलवी| तरी तेचि कायी||”
नामाची – भगवंताची – परमार्थाची आवड कशी हवी? तर त्या आवडीची लाज वाटता कामा नये. त्यापुढे जाऊन त्याचे रूपांतर व्यसनात झाले तर त्याचा कंटाळा कधीही येता कामा नये. त्या व्यसनाने इतके भुलवले पाहिजे की त्याचे वेड लागले पाहिजे म्हणतात ज्ञानदेव. याला “नामाचा नाद” लागणे म्हणतात.

नाम पूर्ण असल्यामुळे ज्याला असा नामाचा नाद लागला तो साहजिकच त्या नामाच्या धुंदीत स्थिरावतो. त्याचे मन बुद्धी कर्म ही सर्व नामाच्या अवतीभोवती घोटाळतात. उत्तर भारतात काही घरांतून बाळकृष्णाची उपासना चालते. घराच्या मुख्य खोलीत मध्यभागी याचा दरबार असतो. सकाळी उठल्यापासून बाळकृष्णाला उठवणे, स्नान घालणे, मग नैवेद्य बनवून त्याला खाऊ घालणे या गोष्टी रात्री त्याला झोपवेपर्यंत नित्यकर्मात मोडतात. असे नामाच्या अवतीभोवती आमचा दिवस घोटाळू लागला की आम्हाला नामाचा नाद लागला असे म्हणावयास हरकत नाही. असा जो नामाच्या नादात स्वतःला विसरतो त्याला साहजिकच या देहाशी संलग्न दुःखांचा विसर पडतो. सुरुवातीला तो नाम घेताना तात्कालिक असतो; मात्र जर सततच्या अभ्यासाने आणि गुरुकृपेने हे नाम सहज चालू लागले की मग मात्र त्याचा देह मन बुद्धीशी त्रयस्थासारखा संबंध राहून तो अलिप्तपणे साक्षीभावात राहतो. कर्तव्य कर्म उत्तम करताना देखील हे साधू शकते हे आम्हाला सर्व प्रापंचिक संतांनी दाखवून दिले आहे, त्यामुळे त्याबाबतीत तक्रार करण्यासाठी आम्हाला कुठेही जागा नाही.

हे वचन श्रीमहाराजांनी आमच्यासारख्या देहाला केंद्र करून राहणाऱ्या लोकांसाठी सांगितले खरे, मात्र यातून त्यांना आम्हाला त्यापलीकडे नेण्याची इच्छा आहे, जेथे प्रापंचिक दुःख हे देखील सुखाचे वाटू लागते आणि सुखामध्ये तो हरखून जात नाही. गीतेत स्थितप्रज्ञाची व्याख्या करताना भगवंत म्हणतात, “दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहः||” – कोणतेही दुःख आले असता जो उद्विग्न होत नाही वा सुखात देखील स्थिरबुद्धी राहतो, “आत्मन्येवात्मना तुष्टः!”- जो स्वतःमध्ये (बाहेरील कोणत्याही आलंबाशिवाय समाधानी – आनंदी राहतो तो स्थितप्रज्ञ होय. आणि हे होण्यासाठी भगवंताच्या नामाचा सर्वतोपरी आधार घेणे, त्यात टिकून राहणे, तो अनुभवणे आणि त्यात मस्त होणे हा राजमार्ग आहे.

एकदा श्रीमहाराजांनी विचारले, “भगवंत प्रकट झाले तर काय मागाल?” जेव्हा अपेक्षित उत्तर आले नाही तेव्हा ते स्वतःच म्हणाले, “मी माझेपणाची जाणीव काढून घे, असे मागीन” काय ज्ञान भक्ति वैराग्याचा सागर भरला आहे या एका उत्तरात! आजच्या वचनात महाराज आम्हाला हेच सांगत आहेत की एकदा नामाच्या अभ्यासाने, त्याला अनुसरून गुरुकृपेने आलेल्या नामाच्या प्रेमाने दुःखाची जाणीवच कमी होईल, कारण दृश्य विश्वाचे नश्वरपण मनावर ठसून भगवंताची लीला म्हणून आम्ही आमच्या आयुष्याकडे बघू शकू आणि सुख दुःखाचा एकाच पद्धतीने आनंद लुटू शकू. चित्रपटात जर फक्त एकाच तऱ्हेचा आनंदाचा बाजार दाखवला तर आम्ही कंटाळतो ना, तसेच भगवंताच्या चित्रपटातील पात्रे त्याच्या दिग्दर्शनाखाली सुख दुःखाची पात्रे रंगवताहेत या सत्य जाणीवेत नाम मग्न करते व तो संसारात राहून सर्वतोपरी त्यावर तरंगत राहतो; कारण तो नामात – भगवद्भावात बुडून गेलेला असतो!

||श्रीनाम समर्थ||

Wednesday, June 24, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५५ –

अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे.

श्रीराम!
नाथपंथीय योगीराज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज रामनामाबद्दल म्हणतात,

रामनाम मुखी तो एक संसार| एऱ्हवी अघोर नरक हा||
संसार नरक रामनाम सार| तरले पामर पतित देवा||
अजमिळा नामे तरला पतित| नारायण त्वरित आले तेथे||
“हरिनाम हेच शास्त्र पै जयाचे|” तयासी यमाचे भय नाही||

परमार्थाला “Path of Enquiry” असेही म्हटले जाते. हा शोधमार्ग आहे, ज्यामध्ये साधक परमात्म तत्त्वाचा शोध घेतो. या जगात जन्म घेतल्यानंतर जे चार पुरुषार्थ वेदांमध्येही सांगितले गेले, त्या सर्व पुरुषार्थांचे सार असेल तर हा शोध घेणे होय. किंबहुना त्या चारही पुरुषार्थांचा सुयोग्य वापर करून मनुष्याने आपल्या मूळ पुरुषाचा शोध घ्यावा, जेणेकरून त्याला आपल्या जन्माचे सार्थक करून घेता येईल अशी वेदांची योजना आहे. याचे कारण हेच की जोवर हा शोध पूर्ण होत नाही, तोवर मनुष्याला पुन्हा पुन्हा देह धारण करून देखील अखंड समाधान मिळणार नाही आणि दुःख निवृत्ती – आनंद प्राप्ती साधणार नाही. म्हणून विविध मार्गांनी हा शोध घेण्याचे कार्य अखंडपणे या मृत्युलोकात चालू आहे. आम्हाला जाणीव नसली तरी हा शोध घेणाऱ्या महात्म्यांच्या पुण्यांशामुळेच थोडी सकारात्मकता कलियुगात देखील इथे टिकून आहे.

मुमुक्षुत्व असलेल्या शिष्याच्या या शोधाची सुरुवात सद्गुरू भेटीपासून खऱ्या अर्थाने होते. श्रीमहाराज म्हणतात तसे “परमार्थ समजून करावा” हे वाक्य ज्याने हृदयी धरले त्याला सद्गुरू उपदिष्ट मार्गात स्थिरावल्याशिवाय चैन पडत नाही. मग अनेक अंगांनी याच मार्गावर राहून तो या शाश्वत तत्त्वाचा माग घेतो. परंतु, जशी घार अनेक दिशांना जाते, आपल्यासाठी भक्ष्य शोधते पण तिचे सर्व लक्ष तिच्या घरट्यातील पिल्लांकडे असते, तशाच रीतीने जो सद्गुरू उपदिष्ट मार्गात राहतो तो विविध मार्गांनी समजून घेण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी त्याचा खुंटा हा एकच असतो – असावा आणि तो खुंटा म्हणजे सद्गुरूंनी दिलेले नाम!

खरे बघायला गेले तर हा खुंटा इतका ताकदवान आहे की एकदा त्या खुंट्याला चिकटले तर अजून काही करण्याची आवश्यकताच नाही. परंतु श्रीमहाराज म्हणतात, वाचनापासून साधनेला जोर येतो. त्यामुळे नामस्मरणाला पूरक असे वाचावयास हरकत नाही. याबरोबर प्रत्येक साधकाची एक पूर्वावस्था असते, या जन्मातीलच नव्हे तर मागील अनेक जन्मांची. त्यानुसार त्याचा स्वाभाविक कल हा भक्तिमार्ग, योगमार्ग किंवा ज्ञानमार्ग यांपैकी एकाकडे जास्त असतो. अर्थातच हे त्या साधकांबद्दल खरे आहे ज्यांच्या मनातून सांसारिक आसक्ती नाहीशी नाही तरी निदान क्षीण होऊ लागली आहे. हे होईपर्यंत स्वाभाविक कल कळणे शक्य नाही. सांसारिक आसक्ती आहे तशीच आहे आणि तत्त्वज्ञानाचे ग्रंथच्या ग्रंथ वाचत असू तर देहबुद्धीच पोसली जात नाही ना याकडे साधकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. हे कळावे कसे हे सांगताना श्रीमहाराज म्हणतात, ‘जे वाचतो ते आचरणात येते की नाही हे जो सतत तपासत राहतो त्याला वाचलेले पचते आहे म्हणायला हरकत नाही, त्यानेच वाचावे.’  

आजच्या वचनात तर श्रीमहाराज म्हणतात, अत्यंत कठीण प्रमेये असलेले ग्रंथ वाचण्यास देखील हरकत नाही. सद्गुरू हे आम्हाला खुबीने समजावतात, त्यांची खुबी ज्याला कळली त्याला सद्गुरूंची अशी वचने जाणून मौज वाटते की कसे महाराज दोन्ही गोष्टी एकत्र सांधतात. आधी महाराज म्हणतात, कठीण प्रमेये असलेले ग्रंथ वाचावे पण सोप्यातले सोपे नाम घ्यावे. कसे आहे, ही वचने आमच्यासाठी तेव्हाच आहेत, जेव्हा आम्ही त्यांचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो. जो असे करील तो वाचनासोबत नाम सांभाळील हे निश्चित. आणि असे नाम जो सांभाळील ना, त्याचे वाचन एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच राहील. त्याबरोबरच जे जे तो वाचेल त्याचा अन्वयार्थ तो महाराजांच्या – आपल्या सद्गुरूंच्या वचनांशी, त्यांनी दिलेल्या साधनेशी लावेल. म्हणून श्रीमहाराज हे सांगण्याची रिस्क घेताहेत की ग्रंथ वाचा पण नाम सांभाळून वाचा, म्हणजे त्या नामाची शक्ती – त्या नामाचे हळुवार निपजणारे प्रेम जे वाचन तुम्हाला नामाशी – तुमच्या गुरूंशी जुळवणार नाही त्याकडे जाऊच देणार नाही. नाम हेच सत्य आहे ही जाणीव नामच दृढ करील. जसे तुकाराम महाराज म्हणाले, “तुका म्हणे नाम| तेणे पुरे माझे काम||” मूळ सत्य हेच आहे की कोणतेही सद्ग्रंथ एकच गोष्ट सांगतात, त्यामध्ये भेद नसतोच; आमची पृथक बुद्धी संतांच्या सांगण्यामध्ये भेद शोधते आणि मग बुद्धी भ्रमित होऊन गुरूंनी दिलेल्या साधनेला दुरावते.

यासाठीच सद्गुरू सांगतात, एक तर वाचताना नाम न सोडता वाचावे किंवा ते वाचन आमच्या साधनेला पोषक असेच असावे. भक्तिमार्गी संताचा शिष्य जर खूप जास्त योगशास्त्र वाचू लागला तर अजून देहबुद्धीत असल्यामुळे त्याला ज्या साधनेद्वारा ‘मी देह नाही’ हे समजून घ्यायचे आहे, तोच देहाला जास्त महत्त्व देऊन देह-साधनेला लागेल. वास्तविक योगातले देहाचे कष्ट देखील देहबुद्धीतून बाहेर पडण्यासाठीच आहेत हे लक्षात न घेतले तर केवळ देह-पोषण होईल. यासाठी वाचन सावधानतापूर्वक झाले पाहिजे असे श्रीमहाराज सांगतात.

मार्गातली विविधता ही भगवत् प्राप्तीच्या शोधाला वास्तविक रम्यता आणते. कोणतेच ‘वाद’ खरे नसून सर्व मार्गातला ‘संवाद’ महत्त्वाचा आहे हेच खरे संत ग्रंथ सांगतात. त्यामुळे तो संताने लिहिलेला ग्रंथ असेल आणि तो योग्य व्यक्तीकडून समजून घेतला तर त्यात बुद्धिभेद होण्याचा धोका नसतो. भक्तिमार्गी साधकांसाठी तर रामायण – भागवतासारखे सद्ग्रंथ नामाचे महत्त्व आणखी दृढ करणारे आहेत.

भगवंतांनी गीतेत “गिरामस्म्येकमक्षरम्” असे सांगून ॐकार रूपी नाम म्हणजे मूळ तत्त्व आहे हे स्पष्ट केले. त्याच मूळ तत्त्वाचा भक्तिरूपी विकास म्हणजे सद्गुरूंनी दिलेले सगुण ब्रह्माचे नाम होय. त्यामुळे दोन्हीत भेद नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे ज्या मूळ तत्त्वाबद्दल विविध ग्रंथांमध्ये विविध ग्रंथकारांनी आम्हाला सांगितले, ते तत्त्वच आम्हाला सद्गुरूंनी नाम रूपाने दिले आहे हे ‘शास्त्रीय सत्य’ आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणताहेत, शेवटी सोप्यातले सोपे नामच घ्यावे, कारण ते साधना दृष्टीने सोपे असले तरी तेच एक अंतिम सत्य आहे!

गीतेत भगवंतांनी अनन्यतेचे महत्त्व सांगितले आणि ती अनन्यता गुरूपदिष्ट नामाबद्दल असणे हेच भक्तिमार्गाचे सार आहे. म्हणूनच श्रीमहाराज म्हणतात, काहीही करा, काहीही वाचा पण नाम सोडू नका, कारण संत एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे,

योग याग व्रत नेम दान धर्म|
नलगे साधन जपता हरि||
साधनाचे सार नाम मुखी गाता|
हरि हरि म्हणता कार्यसिद्धी||

||श्रीनाम समर्थ||



Sunday, June 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५४ –

भगवंताचे नाम ही ठिणगी आहे. ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल येवढी मोठी होऊ शकते. ज्याप्रमाणे अग्निहोत्र्याच्या कुंडातला अग्नि थोडा धुगधुगीमध्ये असतो, त्यावर फुंकर घालून त्याचा जाळ करता येतो. त्याप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवू; त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल आणि तो जाळ जगभर पसरेल.

श्रीराम!
एक तत्त्वज्ञानी म्हणतो, “डोळ्याची एक पापणी हलली तरी त्याचा परिणाम दूरच्या आकाशगंगेतल्या चांदणीवर होतो.” हे सांगण्यामागचा हेतू हा की कोणतेही सामान्यातले सामान्य कर्म देखील त्याचा परिणाम दाखवल्याशिवाय राहत नाही. याचे कारण ज्याला वेदांतामध्ये Eternal Consciosness किंवा Awareness म्हणून संबोधतात, त्यायोगे सबंध विश्वात एकच तत्त्व भरून आहे. ज्ञानमार्गी त्याला तत्त्वरूपाने बघतात तर भक्तिमार्गी रामरूपाने बघतात. ॐकार हे त्याच ज्ञानाचे मूळ तर नाम हे त्या रामतत्त्वाचे मूळ; त्यामुळे दोन्हीत भेद नाही. आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायाने – “ॐकाररूपि तन्नाम हृन्मन्दिरनिवासि च|” (नामचंद्रिका) – तुझे जे नाम ॐकार रूप आहे तेच हृदयाच्या गाभाऱ्यात वसलेले आहे. सबंध विश्वाचे साम्राज्य त्या नाम धारकाच्या हृदयात आहे ज्याला नामात सर्वतोपरी प्रीति आहे.

जर एखादे सामान्य कर्म त्याचा परिणाम या जगावर सोडल्याशिवाय राहत नाही तर नाम, जे विश्वाचा उगम आहे, ते परिणाम दाखवल्याशिवाय राहील? मांडुक्य उपनिषद सांगते,
“ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवद्भविष्यदिति सर्वमोङ्कार एव|
यच्चान्यत्त्रिकालातीतं तदप्योङ्कार एव||”
-- एकमेव नित्य वस्तु ॐकारच आहे. जे काही जगात दिसते आहे, ते सर्व प्रकाशित करणारा हाच ॐकार (नाम) आहे. जे घडून गेलेले आहे, जे घडते आहे, जे घडणार आहे, तो ॐकारच (नाम) आहे. या तीनही काळाच्या पलीकडे जे सर्वव्यापी तत्त्व (भगवंत) आहे, तो देखील ॐकारच आहे.
हा एकच उपनिषदातील श्लोक श्रीमहाराज नामाला ठिणगी का म्हणत आहेत हे सांगायला समर्थ आहे. सर्वव्यापक तत्त्व जे नाम आहे; तेच नाम सगुण ब्रह्माच्या अनुषंगाने संतांच्या वैखरीत सदा सर्वकाळासाठी स्थानापन्न झाले. जे ब्रह्मांडी होते ते पिंडी विराजले म्हणून विश्व चेतवणाऱ्या वन्हीचे रूपांतर ठिणगीत झाले, त्याशिवाय नामाला धारण करणे आमच्या सारख्या जीवांना अशक्य आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणताहेत, ही ठिणगी फुलवणे म्हणजे त्या सर्वव्यापी ईश्वराला साद घालणे होय आणि जेव्हा जेव्हा ही साद शुद्ध चित्ताने घातली गेली तेव्हा तेव्हा सबंध जग भरून जाईल इतकी ती ठिणगी मोठी झाली आणि तो नामधारक विश्वरूपच बनला!

अजून एके ठिकाणी श्रीमहाराज म्हणतात, “जसा मारुतीमध्ये देव – अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला.” आजच्या वचनात जे श्रीमहाराज म्हणतात, त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल... तो साधक किंवा सिद्ध असाच असेल ज्याने मारुतीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवले. भक्तिमार्गाचा उद्गाता आहे हनुमंत! श्रीमहाराजच एके ठिकाणी म्हणतात, “हनुमंताचे ब्रह्मचर्य, भक्ति, दास्य आणि परोपकार या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल!” खरोखर ज्या साधकाला आजच्या वचनाप्रमाणे त्या नामाच्या ठिणगीचा जगभर पसरलेला जाळ – म्हणजेच नामाचे सर्वव्यापित्व अनुभवायचे आहे, त्याने हनुमंताचे चरित्र अभ्यासले पाहिजे. काय आहे हनुमंताच्या चरित्रात? आपण जेव्हा कुणाचेही चरित्र बघतो, तेव्हा त्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या निरनिराळ्या घटना दिसतात. मात्र जेव्हा हनुमंताचे चरित्र बघतो, तेव्हा मात्र त्याच्या लहानपणच्या काही बाललीला वगळता संपूर्ण आयुष्यात केवळ आणि केवळ राम भक्ती, राम नाम, राम कार्य आणि राममय जीवन हेच दिसून येते. हनुमंताला श्रीरामाशिवाय बघणेच शक्य नाही, त्याची तशी इच्छाच नाही! हे होणे म्हणजे भक्तिमार्गात पाय रोवून स्थिर होणे आहे.

नामाची ठिणगी म्हणण्यामागे नामाच्या अभ्यासाने निर्माण होणारी भगवत्प्राप्तीची तळमळ देखील अभिप्रेत आहे. नाम हे साधन म्हणून जेव्हा सद्गुरू आम्हाला देतात, तेव्हा त्यात सद्गुरूंची संपूर्ण अध्यात्मिक शक्ती साठवलेली असल्याने मुळातच ते शक्तिरूप असते. मात्र आमची ग्रहण क्षमता कमी असल्याने आम्ही ते नाम सर्व शक्तीनिशी धारण करण्यास असमर्थ होतो व आमची देहबुद्धी आणि त्याला लागून असलेल्या कामना त्या शक्तीच्या अभिव्यक्तीच्या आड येतात. तरी देखील त्याच्या प्रचंड शक्तीमुळे धुगधुगी असतेच. जर त्यावर सतत सत्संगाची फुंकर घातली गेली तर त्या धुगधुगीचे रूपांतर खऱ्या तळमळीच्या अग्नीत होते हे सर्वसंतमान्य असे सत्य आहे. आणि श्रीमहाराज आम्हाला म्हणूनच सांगतात की नामाचा संग हाच खरा सत्संग आहे, ज्यायोगे तुम्हाला ही तळमळ लागेल. ज्याला खरी तळमळ लागली त्याच्या मनातून विषय आणि संसारासक्ती स्वाभाविकच हद्दपार होते व तो साधक शुद्ध साधनेस लागतो. शुद्ध साधनेचा प्रारंभ हीच नामाच्या ठिणगीवरची फुंकर आहे.

मात्र जीवाची शक्ती अपूर्ण आहे; त्यामुळे खरा शरणागत साधक म्हणतो, महाराज, मी तुम्हाला धरले आहे असे मला वाटते; परंतु माझ्या शक्तीने मी तुम्हाला धरणे मला शक्य वाटत नाही. त्यामुळे तुम्हीच मला धरावे आणि माझ्यात ती तळमळ जागी करावी. ही प्रार्थना जो मनापासून करतो, त्याच्या नामाच्या ठिणगीवर फुंकर घालण्याचे काम सद्गुरूच करतात. गंमत अशी की ही फुंकर परमदिव्य, परमशांत आणि परमतेजस्वी अशा भगवद्रूप सदगुरूंकडून आलेली असल्याने ती तळमळीच्या अग्नीचे रूपांतर देखील परम सौम्य आणि मृदु अशा अनुभूतीत करते आणि साधकाला अंतर्बाह्य गुरुप्रेमात न्हाऊन टाकते. जो गुरूच्या प्रेमात बुडाला त्याची साधना – नामस्मरण ही एक दिव्य परंतु सहज अनुभूती होते व बघता बघता सगुण निर्गुणाला लांघून तो नामाच्या परम दिव्य प्रकाशात गुरुकृपेने स्थिरावतो!

||श्रीनाम समर्थ||


Saturday, June 20, 2020

Informing about YouTube Channel --

।।जय श्रीराम।।

By the grace of Shri Maharaj, here is the YouTube channel that will connect us through Shri Maharaj's stories in English, chintan on some random verses of Bhagavad-Gita and many other things over a period of time. By His grace, I hope all these initiatives taken up by His Power will lead us on the path of devotion more firmly and encourage us to chanting the Divine Naama. Those interested may subscribe and share the YouTube channel with their near and dear ones.

https://www.youtube.com/user/shreyadeshpande

।।श्रीराम समर्थ।।