Saturday, July 29, 2023

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८९ --

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८९ - 


"नावडते काम जबरदस्तीने करावे लागते, आवडते काम सहज होते. आवड आणि दुःख एकाच ठिकाणी निर्माण होतात. म्हणून जेथे आवड निर्माण होते, तेथेच तिला 'नामाने' मारणे जरूर आहे."


जय श्रीराम 🙏


घणाचा घण्ण असा घाव बसावा तसे हे वचन आहे श्रीमहाराजांचे! Power-packed. प्रत्येक वाक्य स्वतःमध्येच एक अध्याय आहे. या आधीच्या वचनामधली 'आवड' कशाच्या संदर्भात हवी याचे पुरेपूर स्पष्टीकरण देणारे असे हे वचन आहे. 


मुले जेव्हा परीक्षेचा अभ्यास करतात, तेव्हा बहुतेक वेळा जो विषय आवडीचा असतो, त्याचाच अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असतो; पण आई सांगते, अगोदर जो विषय नावडता आहे, तो हातावेगळा कर, म्हणजे नंतर त्याबद्दल काळजी राहणार नाही. अशा वेळी जर आईचे ऐकणारे मूल असेल तर जबरदस्तीने का होईना आधी नावडता विषयाचा अभ्यास करते आणि जर केवळ परीक्षेसाठी करत नसेल तर हळूहळू अभ्यासातूनच त्या नावडत्या विषयाची गोडीही त्याला लागू शकते. 


आमची अनादि आई - सद्गुरू - आम्हाला हाच बोध वचनाच्या पहिल्या वाक्यातून देताहेत. नामाच्या अभ्यासाला सुरुवात करत असताना पूर्वीची सवय नसल्यास ते कर्म नावडते होते म्हणतायत महाराज. ते एकीकडे म्हणतातच की नामामध्ये गोडी येईपर्यंत आपणच त्यात गोडी घालून ते घ्यावे लागते. पूज्य बाबा बेलसरेंनी याबद्दल आनंदसाधनेत जे मुख्य कारण सांगितले आहे, ते म्हणजे कंटाळा. पूज्य बाबा म्हणतात, जोवर कामनापूर्तीसाठी नाम व्हायचे तोवर कंटाळा यायचा नाही; पण ही लालूच (गुरुकृपेने) गेल्यावर मात्र जपाला बसण्याचा कंटाळा येऊ लागला आणि त्यावर दिवसातला थोडाथोडाच वेळ वरचेवर जप करून त्या जपाच्या शक्तीने जेव्हा शरीर-मनाचा ताण कमी होऊ लागला तसतसा कंटाळा कमी होऊन नामात उत्साह वाटू लागला. (हा अनुभव पूज्य बाबांच्या अगदी सुरुवातीच्या साधनकाळातील आहे.) म्हणजेच नामाला, महाराज म्हणतात तसे, सुरुवातीला थोडी जबरदस्ती हवीच.


एक गोम आहे या महाराजांच्या वचनात, ती अशी की, आवडते काम सहज होते असे जे सांगितले आहे, त्यामध्ये हळूहळू नाम घेणे आवडू लागतेच हा त्यांचा आशीर्वाद अध्याहृत आहे! आपल्या आत्म्याचा प्राण आहे नाम! हे न कळल्याने आम्ही इतर गोष्टी, वस्तू, व्यक्तींना 'माझा प्राण आहे' असे चुकीने संबोधत आहोत. नामाच्या जोडीला म्हणूनच महाराजांच्या वचनांमध्ये रमण्याचा, त्यांचे चिंतन करण्याचा अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने आम्हाला नाम आवडू लागेल आणि आवडीच्या गोष्टीच्या आड काहीच येत नाही हे आपण सर्वांनी अनुभवलेले आहे! फक्त वचनातल्या दुसऱ्या वाक्याप्रमाणे आमच्या so called आवडींनी दुःखच निर्माण केले आहे, करत आहेत, करत राहतील! कारण, जिथे अपूर्ण गोष्टींमुळे लौकिकात सुख वाटेल, त्याची दुसरी बाजू कोणत्या ना कोणत्या प्रकारे, कधी ना कधी दुःख देणारच हा या मृत्यूलोकाचा नियम आहे आणि सृष्टिनियमात कधीही पालट होत नसतो. त्यामुळे महाराज म्हणतायत, 'आवड आणि दुःख एकाच ठिकाणी निर्माण होतात!' 


समर्थ उगीच म्हणाले नाहीत दासबोधात की, 

"संसार म्हणिजे महापूर। 

माजी जळचरे अपार।

डंखू धावती विखार। 

काळसर्प।।" 

ही जळचरे म्हणजे भगवंतास - नामास सोडून आमची असणारी 'आवड' होय. त्या आवडीने लाचार होऊन काळसर्पाच्या विळख्यात असंख्य योनी आम्ही फिरत आहोत. नाही, ही नकारात्मकता नव्हे. आमचे अंतरंग जागृत होण्यासाठी संतांनी ठोठावलेले दार आहे. नुसते दार ठोठावून उठोत वा न उठोत म्हणून सोडून देणारे ते संत कसले! दार ठोठावून ते उघडेपर्यंत दारातच बसून राहणारी आमची ब्रह्मचैतन्य माय आहे. दार उघण्यासाठी ज्यामुळे दार घट्ट बसले आहे त्या विपरीत आवडींना 'नामाने मारा' म्हणून सांगते आहे. जसे महाराज एके ठिकाणी म्हणतात, वृत्तींच्या तोंडी नाम द्यावे. आमच्या आवडीमुळे मनात निर्माण झालेला कर्मास उद्युक्त करणारा विचार म्हणजे वृत्ति. वृत्तिनिर्मिती आणि कर्म यांमध्ये नामाला घालावे असे महाराज सांगतात, म्हणजे नामाच्या शक्तीने ती वृत्ति जागीच थिजून जाईल. 


पूज्य अंबुराव महाराज होते, त्यांच्याकडे कुणीतरी या मनाच्या वृत्तींमुळे नाम होत नसल्याची तक्रार करत होते, त्यांना उसळून ते म्हणाले, "नामाच्या बळापुढे कल्पनेचे (मनोकल्पित विचारांचे) बळ कितीसे? अगदी तुच्छ! तुम्हाला हे कळते का??" गरज आहे ती फक्त दार ठोठावणाऱ्या सद्गुरुरायाच्या हाकेला नामाने ओ देण्याची! केवळ ते दार उघडण्याचा अवकाश, केवळ सद्गुरूंची संपूर्ण सत्ता मानण्याचा अवकाश, वरच्या दासबोधातल्या ओवीच्या पुढे समर्थ म्हणाले तसे, 

"जे अंकित ईश्वराचे। 

तयास सोहळे निजसुखाचे।

धन्य तेचि दैवाचे। 

भाविक जन।।" 

अशा अलोट, अमाप, अथांग अशा कारणरहित आनंदाचे धनी गुरुकृपेने होण्यास विलंब लागणार नाही! 


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

No comments:

Post a Comment