Tuesday, July 25, 2023

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८८ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८८ -


प्रत्येक मनुष्याला कशाची तरी आवड असते. ज्यामध्ये पडले असता दुःखाची जाणीव कमी होते तिचे नाव आवड होय. त्या आवडीमध्ये आपण राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे.


जय श्रीराम 🙏


श्रीमहाराजांची वचने हे वरकरणी पाहता बहुतेक वेळा खूप सोपी साधी आणि आचरायला देखील सुलभ वाटतात, कारण इतक्या सोप्या भाषेत त्यांनी आम्हाला सांगितले आहे. पण त्यांच्या शब्दांतला terseness (व्यापकपणा) त्यावर चिंतन करताना त्यांच्या कृपेने जाणवून येतो. आजच्या वचनातल्या पहिल्या तीन ओळी वाचल्या की माझ्यासारख्या सामान्याला प्रथम हेच वाटते की, वाह! सद्गुरू मला जे आवडत आहे त्यामध्येच राहायला सांगत आहेत. मग मला काय आवडते? तर अनंत जन्मांच्या संस्कारांनुसार मला हा प्रपंचच गोड वाटतो. त्यामधल्या विविध गोष्टी - जसे खाणेपिणे, लेणे, उत्तम जीवनशैली, भरघोस पैसा मिळवणे व साठवणे, मनोरंजनात्मक गोष्टी, माझ्या लौकिक कीर्तीत वाढ, या देहमनाला सुखावणाऱ्या लोकांमध्ये रमणे आणि अधूनमधून सद्गुरूंनी हिताचे आहे असे सांगितले आहे म्हणून नाम घेणे, बस्स! 


परंतु असे वाटले म्हणजे आम्ही महाराजांच्या वचनातली दुसरी ओळ समजावून घेतली नाही. -- 'ज्यामध्ये पडले असता दुःखाची जाणीव कमी होते तिचे नाव आवड होय. ' या सर्व वरच्या गोष्टी कमीजास्त प्रमाणात मिळूनही माझी दुःखाची जाणीव कमी झाली का? की अजून वाढली? की त्या दुःखाच्या जाणिवेत अधूनमधून फुंकर बसावी म्हणून मी या वरच्या क्षणिक सुखावणाऱ्या गोष्टींना 'आवड' समजले? उत्तर स्पष्ट आहे. संत म्हणाले, "जोवरी नाही भगवंताचे अधिष्ठान। तोवरी नाही नाही आराम।।" आ-राम! ज्याला चहूबाजूंनी रामाने घेरले त्यालाच आराम मिळतो, हा या शब्दाचा खरा अर्थ आहे. आणि हाच आनंदाचा अर्थ आहे! संत सोपानदेव म्हणाले तसे, "सोपान प्रेमा आनंद हरीचा। तुटला मोहाचा मोहपाश।।" श्रीहरीचा आनंद एकच असा आहे, ज्याने सर्व देहमनबुद्धिला जडलेले मोहाचे पाश तुटून केवळ हरीचा मोह त्याची जागा घेतो. महाराज या 'आवडी'बद्दल सांगत आहेत आजच्या वचनात, ज्यामध्ये पडले असता - हाही शब्दप्रयोग गोड आहे. ज्या ठिकाणी - सद्गुरूंवर प्रेम असते, तिथे दुरून नमस्कार करत नाहीत शिष्यगण. दंडवत घालतात- म्हणजे पायांवर 'पडतात' काठीप्रमाणे! असा जो 'त्या आवडीमध्ये पडला' तोच तरला हे आज महाराज सांगत आहेत. 


म्हणजेच जी आपली आवड आहे त्याचे मुख भगवंताकडे वळवावे असे महाराजांना सुचवायचे आहे. "तुका म्हणे अवघी जोडी। ते 'आवडी' चरणांची।।" मगच "अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण।।" म्हणाले तुकाराम महाराज. 


अशा रीतीने कोणत्या आवडीने दुःखाची जाणीव खरोखरच कमी होईल हे जाणून घ्यावे असे महाराज सांगत आहेत. एकीकडे महाराज म्हणाले, गुरूची सेवा खूप सोपी. कशी? तर गुरूला जे आवडते ते आपल्याला आवडले की झाली सेवा! त्यांना परमेश्वराशिवाय दुसरे काही आवडतच नाही, ते आपल्याला आवडले की गुरु सेवा झाली - हीच खरी सेवा! म्हणून महाराज आजच्या वचनात आम्हाला सांगताहेत की या आवडीमध्ये आपण 'राहावे'! मुक्काम तो, जिथून उठावे - हलावे - इतर काही करावे - अजून कुठे जावे असे वाटत नाही. याला 'राहणे' म्हणताहेत महाराज. भगवंताची आवड अशी लागावी की त्यापरते काही - त्याइतके काही न आवडावे! प्रभू श्रीराम विभीषणास म्हणाले, "सब कै ममता ताग बटोरी। मम पद मनहि बाँध बरि डोरी।।" - जो सर्वच्या सर्व गोष्टींमधल्या ममत्वाच्या धाग्यांना गुंडाळून एक दोरी वळतो आणि त्या दोरीने आपले मन माझ्या चरणांशी बांधतो, असा तो मला प्रिय होतो. 


असे ज्याने केले त्याला त्या भगवंताच्या आवडीमध्ये सुरुवातीला महाराज वचनात म्हणतात त्याप्रमाणे 'जबरीने नाम घ्यावे' लागले तरी त्या अभूतपूर्व अशा आवडीने त्या जबरदस्तीचे रूपांतर गुरुकृपेने सहजतेमध्ये होईल आणि त्याच्यासाठी भगवंताची आवड व नाम हे एकरूप बनतील! ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच म्हणाले,


समाधीचे साधन। ते रामनाम चिंतन।

चित्त सुखसंपन्न। हर्ष जीवनी केला।।

कोटी तपाचिया राशी। जोडीती रामनामापाशी।

नाम जपता अहर्निशी। वैकुंठपद पाविजे।। 


अशा रीतीने हे 'रामनामाचे चिंतन' - ती हृदयीची आवडी समाधीचे साधन कसे बनू शकते याचे प्रत्यंतर गुरुकृपेने येईल. 


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

No comments:

Post a Comment