Wednesday, July 5, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८६ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८६ -

"खायलाप्यायला पोटभर, बायकामुले, घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कोठे आहे हे आपल्याला कळत नाही. ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे."


~ जय श्रीराम 🙏

संतश्रेष्ठ नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात,

"मी माझे करिता गेले हे दिवस। न धरीच विश्वास नामी।का करिशी साठा प्रपंच विस्तार। न तुटे येरझार नामाविण।।" 

या अभंगातल्या 'मी - माझे' यामध्ये आजच्या बोधवचनात महाराजांनी सांगितलेल्या आमच्या तळमळीचे कारण आहे. जन्माला आल्यापासून ज्या ज्या गोष्टींवर आम्ही मनुष्य जन्माच्या 'गरजा' म्हणून शिक्का मारला, त्या गोष्टी वाढत जाऊन कधी त्या गरजांचे रूपांतर इच्छा-आकांक्षा-वासना-लोभ यांमध्ये होते हे आमचे आम्हालाच कळत नाही, किंवा कळले तरी सामाजिक व्यवस्था अशा गोड नावाखाली आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु एका वचनात महाराज म्हणतात, 'हरकत नाही; जर खावे, प्यावे, मजा करावी हे करून तुम्ही सदैव आनंदात राहू शकत असाल तर हे तत्वज्ञान देखील मला मान्य आहे; पण असे दिसत नाही!' असे जे जन वरकरणी सुखी दिसतात, त्यांना आतमध्ये त्रिविध तापांनी पछाडलेले दिसते व त्या तापांवर एक प्रकारे पांघरूण घालण्यासाठी ते अजूनच लौकिक छानचुकीमध्ये स्वतःला गुरफटून घेतात. 

श्रीमहाराज आम्हाला आजच्या वचनात घोर अज्ञाननिद्रेतून जागे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणतात, तुम्हाला सर्व काही आहे प्रपंचात, तरीही काळजी आणि तळमळ का लागते? हे समजून घेणे म्हणजेच अध्यात्मिक तत्त्वज्ञान जाणून घेणे होय. हे जाणून नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समजून नाम घेणे होय. 

आजच्या वचनात महाराज 'दुःखाचे स्थान' असा उल्लेख जो करत आहेत, त्या दुःखाचे कारण मुळात आहे, 'अपूर्णता'! कितीही गोष्टी असल्या तरी मृत्युलोकात त्या वस्तू, व्यक्ती, पदार्थाच्या नश्वर स्वभावामुळे त्या स्वतः पूर्ण बनू शकत नाहीत व त्यांना आधार समजणाऱ्या आम्हाला पूर्णत्व प्रदान करू शकत नाहीत. आणि अपूर्णता हेच दुःखाचे मूळ कारण आहे, ज्यायोगे आम्ही या देहालाच सर्वस्व मानून आयुष्य कंठतो. 

वचनात म्हटल्याप्रमाणे भगवंताचे नाम मुख्यत्वेकरून काय करते तर हे दुःखाचे स्थान कोणते आहे याची जाणीव गुरुकृपेने उत्पन्न करते! काय खोली आहे पहा महाराजांच्या या सांगण्याला! कशामुळे ही जाणीव उत्पन्न होते? तर विवेकामुळे. म्हणजेच महाराज आम्हाला सांगताहेत की विवेक देखील भगवंताच्या नामानेच उत्पन्न होईल. महाराज जे म्हणतात की तुम्ही फक्त नाम घ्या, ते विवेक-वैराग्य मी बघून घेतो; याचा अर्थ जो सतत नाम जपेल त्याचा विवेक नामरूप महाराज जागृत करतीलच, एवढेच नव्हे तर तो विवेक अखंड ठेवतील! 

ज्याचा विवेक तीक्ष्ण आहे, त्यालाच दुःखाचे खरे स्थान नामाच्या योगे कळल्याने तो साधक नामदेव महाराजांनी वर म्हटल्याप्रमाणे 'साठा-प्रपंच-विस्तार' ओढवून घेणार नाही. दोन तऱ्हा असतात - एक तो जो आहे तो प्रपंच भगवंताने दिला म्हणून त्याच्या इच्छेने त्याच्या स्मरणात अखंड राहून देहाने कर्तव्य समजून करत राहतो आणि दुसरा तो जो आहे त्या प्रपंचात फसून, त्याला सत्यत्व देत आणखी गोष्टी जमा करत, आणखी कर्मे ओढवून घेऊन त्यांच्या काळजीने व तळमळीने दुश्चित्त होतो. पहिल्या प्रकारचा असतो, तो भक्त होण्यास पात्र ठरतो. भागवतात संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी अशा भक्ताचे वर्णन फार सुरेख केले आहे. भगवंत म्हणतात, 

"माझे भक्त जे उत्तम। त्यांचा धर्म अर्थ मीचि काम।

मज वेगळा मनोधर्म। अन्यथा कर्म करू नेणे।।

माझे भजन उत्तम कर्म। मज अर्पे तो शुद्ध धर्म।।

मज कामने हा शुद्ध काम। ज्याचा आराम मजमाजी।।" 

यामध्येही भजनाला- म्हणजेच नामाला उत्तम कर्म म्हटले आहे! कर्म ते ज्याचे फळ टाळता येत नाही. आणि भगवद्भजन हे असे कर्म आहे, ज्याच्या सेकंदासेकंदाचा हिशोब होतो. या हिशोबाचे फळ मिळते तळमळ रहित, काळजी-चिंता विरहित असे अखंड समाधान! 

अशा तऱ्हेने महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचा पहिला परिणाम असेल तर तो म्हणजे सर्व काही असूनही  दुःख - तळमळ का लागते याचा सम्यक बोध होय. या बोधाची परिणती नामाला मनापासून धरण्यात आणि सद्गुरुंच्या प्रार्थनेत होते व नामसाधन आणि सद्गुरूप्रार्थनेचे फलितच नामात गोडी होय! 

हे झाले की मगच वरच्या नामदेवांच्या अभंगात ते पुढे म्हणतात तशी अवस्था होईल -- 

"नामा म्हणे ऐसे रामनामी पिसे। तो उध्दरैल आपैसे इहलोका।।"

ज्याला रामनामाचे वेड लागेल तो स्वतःचा उद्धार तर करीलच; पण या इहलोकालाही उद्घरील, जसे श्रीमहाराजांनी "कोट्यानुकोटी उद्घरिले लोक, रामनाम एक बोधुनिया!!"

।।श्रीनाम समर्थ।। 🙏

No comments:

Post a Comment