Friday, July 14, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८७ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८७ - 

"भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे. एक, प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी; आणि दुसरी, भगवंताच्या प्राप्तीसाठी."


जय श्रीराम! 🙏

समर्थ करुणाष्टकांत म्हणाले,

अनुदिन अनुतापें तापलों रामराया।

परमदिनदयाळा नीरसी मोहमाया।।

अचपळ मन माझें नावरे आवरीता।

तुजविण शिण होतो धांव रे धांव आता।।

आम्ही आमची अंतर्स्थिती अशी आहे का याची चाचपणी केली तर लक्षात येईल की इतकी तीव्र इच्छा त्रिविध संसारतापातून बाहेर पडण्याची आमची नाहीच. आमचे वैराग्य हे बहुतेक वेळा क्षणिक असते, ज्याला समर्थ 'हेकांडपिसे वैराग्य' म्हणतात दासबोधात. आणि जर काही काळ जरी खरे वैराग्य एखाद्या साधकाला आले तरी कलियुगी दृश्याचा मारा इतका प्रचंड आहे, की ते वैराग्य कधी डगमगू लागते कळतही नाही. आणि जोवर मनास - वृत्तीस - अंतरंगास थोडे तरी वैराग्य आवडू लागत नाही, तोवर मुमुक्षुत्व लाभणे कठीण! 

हेच लक्षात घेऊन आम्हाला आज श्रीमहाराज सांगताहेत की मी जे अभिमंत्रित नाम तुम्हाला देत आहे, त्या नामामध्ये मुख्यतः दोन शक्ती आहेत. जसे, स्वच्छ पाणी हे एखाद्या मातीने मलिन झालेल्या भांड्यातली माती अगोदर नाहीशी करते आणि मग पुन्हा ते भांडे स्वच्छ करते; तसे, नाम हे अगोदर आमच्या चित्तात प्रपंचरूपाने साठलेल्या वृत्तींचा सम्यक बोध आम्हाला करवते. अनंत जन्मांच्या संस्कारांमधून आमची वृत्ति कशी बाहेर धावणारी झाली आहे व इतके धावूनही कसा त्या वृत्तीला शांत करणारा कायमचा आश्रय कसा मिळालेला नाही, ह्याचे आकलन देखील आम्हाला सद्गुरुप्रदत्त नामच करवून देते. हे झाले की मगच जसे आमच्या तुकाराम महाराजांना वाटले तसे वाटू लागेल --

किती वेळा जन्मा यावे। किती व्हावे फजीत।

म्हणऊनि जीव भ्याला। शरण गेला विठोबासी।।

प्रारब्ध हे पाठी गाढे। न सरे पुढे चालता।

तुका म्हणे रोकडी हे। होती पाहे फजिती।।

अशी फजिती होत आहे हे कळणे म्हणजे सद्गुरू कृपा - नाम कृपा होणे होय! म्हणून महाराज म्हणतात, प्रपंच हा मोडक्या वस्तू सुधारण्याचा कारखाना आहे. आपल्याला वाटते, हे ज्याला कळले तो आयुष्यात नकारात्मक होईल; पण याउलट होते. नामाच्या साहाय्याने प्रपंचाचे असे नश्वर, घटवाढ असणारे, असक्तीपूर्ण स्वरूप कळल्यानंतर त्या साधकाची तक्रार क्षीण होत जाऊन नाहीशी होते, कारण खरे प्रपंचाचे स्वरूप कळणे म्हणजेच त्याचा सहज स्वीकार होणे होय. मग प्रापंचिक हवेनकोपण घटले की खरी आसक्ती कशामध्ये हवी हे गुरुकृपे कळों येई! 

मग चोखोबांसारखी आर्त हाक साधक परमेश्वर चरणी करतो -

कोण आता माझा करील परिहार।

तुजविण डोंगर उतरी कोण।

तू वो माझी माय तू वो माझी माय।

दाखवी गे पाय झडकरी।।

बहुत कनवळा तुझिया गा पोटी।

आता नको तरी करू सेवा।।

चोखा म्हणे मज घ्यावे पदरात।

ठेवा माझे चित्त तुमच्या पायी।। 

ही आहे आजच्या वचनातल्या दुसऱ्या भागाची - भगवंताच्या प्राप्तीची सुरुवात. ज्या नामाने प्रपंचाचे स्वरूप अंतरंगात समजावून सांगितले, त्याच नामाने हळूहळू अंतरंग परिवर्तन गुरुकृपेने घडून जीव त्या शाश्वत आईच्या मांडीवर विसावतो! अमृताची दृष्टि घालूनिया वरी। शीतल हा करी जीव माझा।। या आर्त हाकेला ती माय नामामध्येच स्वतःचे दर्शन देऊन कृतकृत्य करते आणि तो जीव धन्य होतो!

।।श्रीनाम समर्थ।। 🙏

No comments:

Post a Comment