Thursday, June 24, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८० --

 
श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८० –

 

वासनेच्या भक्षयामध्ये आपले मरण आहे. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे.

 

श्रीराम!

संपूर्ण मनाच्या श्लोकात आणि दासबोधात ‘विवेक’ ही जणू Central Theme ठेवलेल्या समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटले,

“विवेके क्रिया आपुली पालटावी|

अति आदरे शुद्ध क्रीया करावी||

जनी बोलण्यासारखे चाल बापा|

मना कल्पना सोडि संसारतापा||”

 

कल्पना – वासना – वृत्ति – कृती – परिणाम असा क्रम आहे, प्रपंचातही आणि परमार्थातही! मनुष्य जन्माला आल्यापासून विविध कल्पना करतो. आपल्या देह मन बुद्धि सकट सर्व मी आहे व याला लागलेले सर्व माझे आहे, हे सर्व कल्पनांचे मूळ आहे. या कल्पनासृष्टीतून मनुष्याच्या विविध वासनांचा जन्म होतो. मला अमुक मिळाले तर मी सुखी होईन हे त्यामागचे कारण देखील कल्पनामयच असते हे सहज लक्षात येईल. याच वासना सततच्या चिंतनाने मनामधून चित्तात प्रवेश करत्या झाल्या की त्या वासनांची वृत्ति बनते. मला अमुक गोष्ट मिळवायची आहे व ते मिळवण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी करण्याबद्दलचा जो कल्पनाधिष्ठित विचार तीच वृत्ति होय. त्यातून कृती जन्म घेते व एकदा कृती घडली की त्यानुसार फलप्राप्ती वा परिणाम जीवास अनुभवावा लागतो. या चक्रालाच संतांनी ‘वासनाचक्र’ असे नाव दिले.

 

ज्यावेळी मायेच्या थपडा खाऊन अथवा संतकृपेने झालेल्या शुद्ध विचाराचा परिणाम म्हणून मनुष्य आपल्या आयुष्याकडे थोडे का होईना त्रयस्थाप्रमाणे बघू लागतो त्यावेळी संत सद्गुरू त्याला सांगतात, तुझ्या वासना भगवंताकडे वळव. अनेक जणांच्या मनात हा प्रश्न रुंजी घालतो की जर आम्ही परमार्थ मार्गास लागलो, तर आमच्या विविध वासनांचे खच्चीकरण किंवा suppression होऊन आतमध्ये खदखद निर्माण होणार नाही का? त्यावेळी महाराजांसारखे संत आम्हाला योग्य दिशा देतात आणि सांगतात, do not suppress but divert.

 

जन्मोजन्मी साठलेली वासनांची शिदोरी अचानक रिकामी कशी होणार? परंतु जर हा मार्ग मनापासून चालण्याची इच्छा असेल तर वासनांची दिशा बदल. पण अनेकदा याचा अर्थ लक्षात येत नाही. काही विशेष प्रक्रिया आहे का यासाठी असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर विशेष प्रक्रिया नसून तोच क्रम इथेही लागू करा असे संत सांगतात. म्हणजे, कल्पना – वासना – वृत्ति – कृती – परिणाम याच क्रमाने आपल्याला विरुद्ध दिशेला जायचे आहे. महाराज म्हणतात, जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे म्हणजे परमार्थ. हे पोहणे म्हणजेच अगोदर आपल्या रूढ कल्पनांना तिलांजली देऊन संत – सद्गुरू – संतसाहित्य - संतविचार या कल्पनांनी आपले मन भरण्याकडे आपली दृष्टी वळवणे. कोणत्याही कल्पनेतून वासना निर्माण होणारच. या सद्गुरू उपदिष्ट भगवद् कल्पनांतून ज्या निर्माण होतात त्या वासना परमार्थाला हितकारक अशा असतात. साधन व्हावे, सहज सेवा घडावी, सर्वात आत्मरूप बघण्याचा अभ्यास व्हावा, संत ग्रंथ वाचन – संत श्रवण करण्यास मिळावे यासारख्या वासना भगवद् कल्पनातून स्वाभाविक निर्माण होतात. या वासना साधन – अभ्यासाने, अहर्निश प्रार्थनेने व सद्गुरू कृपेने दृढ झाल्या, की या वासनांमधूनच पारमार्थिक वृत्तीचा जन्म होतो. श्रीमहाराज जे म्हणतात, “परमार्थ हा स्वभाव बनावा” तो स्वभाव म्हणजेच पारमार्थिक वृत्ति होय. या वृत्तीतून स्वाभाविकच आपल्या ध्येयानुकूल कृती साधकाकडून होते. जास्त नामस्मरण व्हावे, नामचिंतनातच स्वतःला रमवावे, बहिर्मुखता कमीकमी करून आतमध्ये दृष्टी वळवावी हे त्या कृतीचे स्वरूप असते. आणि परीस स्पर्श झाल्यावर जसे लोखंडाचे सहजच सोने बनते, त्याची इच्छा असो वा नसो; तद्वत भगवद् संबंधी कल्पना, वासना, वृत्ति आणि कृतीने साधक सहजच शुद्ध होत होत अंतिमतः आपले मरण आपल्या डोळ्यांनी बघून जीवन्मुक्त होतो. हाच प्रवास आजच्या वचनात महाराज आम्हाला सांगत आहेत.

 

जन्मोजन्मी आम्ही ज्या वासनेला गोंजारून स्वतःचा अंतिम उद्धार यमाच्या भक्ष्यस्थानी घातला व त्याच वासनांनी “पुनरपि जननं पुनरपि मरणं” करत राहिलो, त्याच वासना गुरुकृपेने जेव्हा “नामाच्या” भक्ष्यस्थानी पडतात तेव्हा त्यांचे भस्म होते. महाराज म्हणतात, “ज्या ठिकाणी देहबुद्धी असते तेथेच वासना उत्पन्न होतात. देह मीच आहे या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची कधीच तृप्ति होत नाही. पण जो नाम घेऊ लागला, त्याचे मन हळूहळू बाहेर धावण्याचे कमी होते. बाहेरची धाव कमी झाली की वासनेचा जोर आपोआप कमी होतो. पुढे तेच मन नामामध्ये रंगून जाते. ज्या मनाने वासना भोगायची, तेच मन दुसरीकडे रंगू लागल्यावर वासना अपोआप क्षीण होते. काही दिवसांनी ती मरून जाते. वासना सूक्ष्म आहे, म्हणून तिचा काटा काढण्यास सूक्ष्मच अस्त्र पाहिजे, ते म्हणजे नाम होय!”

 

ही वासना शुद्ध कशी होते याचे technique देखील महाराजांनी सांगितले आहे –

“पापवासना अथवा वाईट विचार मनात येऊन लगेच त्यानुसार देहाने कुकर्म घडणे हा सर्वात खालचा – तामसी प्रकार होय. त्यापेक्षा वरच्या दर्जाचे ते की ज्यांच्या मनात वाईट विचार येतात पण त्यांना संयमाने आवर घालून ते कुकर्म ते प्रत्यक्षात घडू देत नाहीत. हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल. याहून श्रेष्ठ, सात्विक वृत्तीचे जे असतात, त्यात पापसंकल्पना मुळीच नसते. आणि वासनांचा सर्वोच्च व शुद्ध सात्विक प्रकार म्हणजे, सद्गुरू आणि भगवंत यांच्याखेरीज काहीही विचार मनात न येणे. संत व सिद्ध पुरुष हे असे असतात. सतत नामस्मरण राहिले म्हणजे माणूस अपोआप या पायऱ्यांनी वर चढतचढत श्रेष्ठत्वास पोचतो!”

 

तामसिक व राजसिक वासनांनीच जन्मोजन्मीचे महादोष निर्माण होतात आणि म्हणूनच सद्गुरू उपदिष्ट नामसाधनेचे आत्यंतिक महत्त्व; जेणेकरून समर्थ म्हणतात तसे,

 

“जयाचेनि नामे महादोष जाती|

जयाचेनि नामे गती पाविजेती|

जयाचेनि नामे घडे पुण्य ठेवा|

प्रभाते मनी राम चिंतीत जावा||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ||

 

|| श्रीनाम समर्थ ||  

1 comment: