Tuesday, June 22, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७९ --

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७९ –

 

रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण, आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा बाण. रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे. त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे. कारण रामाच्या जवळ राहणारे आणि अगदी अचूक रामाकडे नेणारे नामाशिवाय दुसरे कोणतेच साधन नाही.

 

श्रीराम!

रामारायांच्या बाणाचा वेध इतका लक्ष्यानुसंधानी आहे की आजतागायत “रामबाण” हा शब्द “अचूकते” बरोबर समानार्थक वापरला जातो. तुलसी रामायणात संतश्रेष्ठ तुलसीदासांनी भगवान शिव शंकरांच्या मुखी एक अप्रतिम असे श्रीराम स्तवन घातले आहे. उत्तरकांडातल्या या काही ओळी उद्धृत करण्याचा मोह इथे आवरत नाही. भोलेनाथ आपल्या आराध्याची स्तुती करताना म्हणतात,

 

“दससीस बिनासन बीस भुजा| कृत दूरि महा महि भूरि रुजा||

रजनीचर बृंद पतंग रहे| सर पावक तेज प्रचंड दहे||”

-- दहा शिरे व वीस भुजा असणाऱ्या रावणाचा विनाश करून पृथ्वीचा महारोग दूर करणाऱ्या हे श्रीरामा, राक्षससमूह रूपी जे कीटक होते, ते सर्व तुमच्या बाणरूपी अग्नीच्या प्रचंड तेजाने भस्म झाले.

“महि मंडल मंडन चारुतरं| धृत सायक चाप निषंग बरं|

मद मोह महा ममता रजनी| तम पुंज दिवाकर तेज अनी||”

-- तुम्ही या पृथ्वीमंडलाचे अतिसुंदर भूषण आहात. तुम्ही श्रेष्ठ बाण, धनुष्य व भाता धारण केलेले आहात. मद, मोह आणि ममतारूपी रात्रीच्या घोर अंधाराचा नाश करण्यासाठी तुम्ही सूर्याचे तेजोमय असे किरण आहात.

“मनजात किरात निपात किए| मृग लोग कुभोग सरेन हिए|

हति नाथ अनाथनि पाहि हरे| बिषया बन पावंर भूलि परे||”

-- कामदेवरूपी भिल्लाने मनुष्यरूपी हरिणांच्या मनात कुभोगरूपी बाण मारून त्यांना पाडले आहे. हे नाथ, पाप-तापाचे हरण करणारे हे हरी, त्या कामाला मारून विषयरूपी वनात भटकणाऱ्या या बिचाऱ्या अनाथ जीवांचे रक्षण करा.

 

पुढे म्हणतात,

“मुनि मानस पंकज भृंग भजे| रघुबीर महा रनधीर अजे|

तव नाम जपामि नमामि हरी| भव रोग महागद मान अरी||”

-- हे मुनींच्या मनरूपी कमळातील भ्रमरा, हे महान रणधीर आणि अजिंक्य असणाऱ्या रघुवीरा, मी तुम्हाला भजतो. हे हरी, मी तुमचे नाम जपतो आणि तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही जन्म-मरणरूपी रोगाचे महान औषध आहात आणि अहंकाराचे शत्रु आहात!

 

हे नीळकंठेश्वराच्या कंठातील गोड कवनच जणू आजच्या वचनात महाराजांनी आम्हाला साध्या सोप्या भाषेत रामरायाच्या स्मरण रूपी बाणाचे महत्त्व सांगताना सांगितले आहे. या जगाच्या नश्वरतेतून बाहेर पडून शाश्वत सत्याकडे जाण्याचा मार्ग हा दृढ स्मरणातून जातो म्हणतात महाराज आणि म्हणतात या स्मरणाला उत्तम उपाय नाम; म्हणून नामाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे.

 

या आजच्या वचनात दोन वाक्ये अतिशय महत्त्वाची व भावार्थाच्या दृष्टीने गूढ आहेत.

“रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे. त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे.” –

लक्ष्याच्या दिशेने बाण सोडल्यानंतर श्रीराम जणू त्या लक्ष्याशी तादात्म्य पावत असत, इतके त्यांचे धनुष्यप्राविण्य अफाट होते. कोणतेही कार्य जेव्हा सामान्य व्यक्ती देखील पूर्ण लक्ष देऊन करतो, त्यावेळी ती त्या कार्याशी व त्या कार्यातील घटकांशी जणू एकरूप होत असते, तिला स्वतःचे वेगळेपणाने भान नसते. यालाच एका दृष्टीने ध्यान म्हणता येईल. Mindfulness किंवा Mindful Meditation असा शब्दही यासाठी आपण आजकाल ऐकतो. याचप्रमाणे, जो नाम स्मरतो, तो जेव्हा त्या नामाशी – म्हणजेच नामीशी तादात्म्य पावतो, त्यावेळी तो वेगळेपणाने उरत नाही, नाम हे केवळ साधन म्हणून त्याच्यासाठी उरत नाही. जसा श्रीरामांचा बाण पुन्हा भात्यात येऊन बसतो, तद्वत हे नामरूपी स्मरण त्या साधकाला आपल्या खऱ्या मी-शी (भगवंताशी) तादात्म्य पावण्याची कला शिकवते आणि मग तो नामरूपच होतो! अशा दृष्टीने इथे महाराज म्हणताहेत, नाम अगदी रामबाण आहे!

 

प्रत्येक श्रीमहाराजांचे वचन हे त्या त्या स्तरावरच्या साधकाला अतिशय उपयोगी पडते. आज अजून आम्हाला नाम म्हणजेच राम आहे या मूळतत्त्वाचा (बुद्धीने परिचय असला तरी) अनुभूतीच्या दृष्टीने परिचय नाही आणि म्हणून तसे न सांगता महाराज आम्हाला सांगताहेत, रामाच्या जवळ राहणारे नामाशिवाय दुसरे काही नाही. त्यामुळे नामच आम्हाला त्या मूळ तत्त्वाचा परिचय घडवून आणू शकते हे यातून त्यांना सांगायचे आहे. म्हणूनच अजून एकीकडे महाराज म्हणतात, “स्तोत्राने भगवंताची भेट घेणे म्हणजे त्याला पत्र पाठवण्यासारखे आहे. आणि नामस्मरण हा थेट संवाद आहे!” त्यामुळेच नामासारखे साधन ज्याने दृढ धरले त्याला भगवंताच्या अस्तित्वाचे भान मनामध्ये जागवण्यासाठी जास्त कष्ट पडत नाहीत आणि अस्तित्वाचे एकदा खरेखुरे भान आले म्हणजे नामाचा विसर पडो म्हटले तरी पडत नाही म्हणतात महाराज. एकदा पूज्य बाबा बेलसरेंनी महाराजांना विचारले, महाराज, तुम्हाला कधी नामाचा विसर पडलाय का?” एकदम उसळून महाराज म्हणाले, “जिथे रोमारोमात नाम आहे, तिथे विसर कसा पडेल?” हा तो परेतून उगम पावून अंतिम लक्ष्याच्या दिशेने वैखरीतून जपलेला नाम – बाण, जो पुन्हा त्याच परावाणीत (भात्यात) स्थित होऊन अंतिम समाधान देतो!

 

हे ज्याला कळले तो भोलेनाथांसारखेच भक्तीचे वरदान प्रभूंकडे मागतो, जे म्हणाले,

“बार बार बर मागउं हरषि देहु श्रीरंग|

पद सरोज अनपायनी भगति सदा सतसंग||”

-- हे श्रीराम, मी तुम्हाला वारंवार हेच वरदान मागतो की, मला तुमच्या चरणकमलांविषयी दृढ भक्ति आणि भक्तांचा सत्संग नेहमी मिळो. हे लक्ष्मीपती, प्रसन्न होऊन मला हेच वरदान द्यावे!”

 

|| श्रीनाम समर्थ ||

No comments:

Post a Comment