Monday, June 21, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७८ --

 

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७८ –

 

नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच ‘निष्ठेचे नाम’ असे म्हणतात. तेच नाम मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे.

 

श्रीराम!

आपल्या एका गोड अभंगात संतश्रेष्ठ सावता माळी म्हणतात,

“नामाचिया बळे न भिऊ सर्वथा|

कळिकाळाच्या माथा सोटे मारू||

वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी|

विठ्ठल गाऊनि नाचो रंगी||”

 

हे आहे नामाचे बळ. या संतनिष्ठेला अनुलक्षून आजच्या वचनात महाराज आम्हाला सांगताहेत नामात कशी निष्ठा असावी! महाराजांच्या वचनातला ‘खात्री’ हा शब्द संशयाच्या विरुद्ध शब्द आहे. जेव्हा मनुष्य भक्तिमार्गाच्या साधनेमध्ये सद्गुरू उपदिष्ट नाम साधना मुख्य ठेवून मार्ग चालू लागतो, तेव्हा सर्वात मोठी धोंड जर या मार्गावरची असेल तर ती म्हणजे संशय. अगोदरच सर्वत्र बुद्धिभेदाचे वातावरण असताना ‘नुसते नाम घेऊन काय होणार?’, ‘नामाला अजून कशाची तरी जोड दिली पाहिजे’ वगैरे गोष्टी आजच्या चिकित्सक युगात मनामध्ये थैमान घालतात. आणि ज्या साधनेमुळे मन clutter-free व्हायचे त्या ऐवजी जास्तच cluttered – विखुरलेले बनते. त्यामुळे नामासोबत आपल्याला आपली नामातली निष्ठा कशी वाढीस लागेल याकडे सूक्ष्मतेने लक्ष देणे आवश्यक होते. अर्थात महाराज म्हणतात तसे, सर्व शंका नाम घेत गेल्यानेच दूर होतात; परंतु हे होण्यासाठी तरी दृढतेने नामास धरणे आवश्यक आहे. म्हणूनच भक्तिमार्गात संत वचनांवर श्रद्धा असणे हा साधनेचा पाया आहे. महाराज म्हणतात, औषध घेण्याआधीच मला त्याचा उपयोग होतो याचा प्रत्यय द्या म्हटले तर तो वैद्य काय करील? तो म्हणेल, अगोदर औषध घे, म्हणजे तुला त्याचा उपयोग कळून येईल आणि रोग निवारण होईल. हे जसे, तसे हा दुर्धर भवरोग नाहीसा होण्यासाठी संत – सद्गुरूंच्या वचनांवर श्रद्धा ठेवून जो साधनेस लागतो, त्याचे मन सहजीच अमन होण्याकडे वळू लागते आणि मग तेच मन त्याला श्रीचरणांशी कायमचे संलग्न करते.

 

जमखंडीच्या एका 22 वर्षांच्या मुलाची महाराजांवर श्रद्धा होती. त्याला अयोध्येत श्रीमहाराज असताना केवळ चार दिवस त्यांचा सहवास घडला होता. अयोध्येहून त्याला निरोप देताना महाराजांनी त्याला सांगितले होते, “आपण भगवंताचे नाम घेतले म्हणजे तो आपल्याला सांभाळतो, म्हणून दिवसातून तीन वेळा तरी त्याचे नाम घ्यावे.” हे शब्द त्याच्या मनात खोलवर रुजले आणि रोज झोपताना फक्त तीन वेळा “श्रीराम” म्हणुन तो निजत असे. त्यानंतर चार-सहा महिन्यांनी त्याची प्रकृति फारच बिघडू लागली आणि वैद्यांनी सरळसरळ सांगितले की आता त्याचे आयुष्य फार तर महिनाभर असावे. त्याला दुसरे काही करता येईना पण महाराजांचे शब्द सारखे आठवत म्हणुन तो पडल्या पडल्या नामस्मरण करी. त्याला महाराजांची आत्यंतिक ओढ लागून तो गोंदवल्यास निघून आला. महाराज त्याला तीर्थ देऊन स्वतःजवळ जेवायला घेऊन बसायचे. पंधरा दिवसांनी त्याचा अंतकाळ समीप आलेला लक्षात येऊन महाराजांनी त्याला मांडीवर घेऊन रामाचे तीर्थ पाजले आणि मग अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण झाले. त्याचे सर्व उत्तरकार्य महाराजांनी स्वतः केले आणि मग म्हणाले, अशा लोकांची निष्ठा बाहेर दिसत नाही पण ती आतमध्ये असते. केवळ महाराजांच्या दोन वाक्यांवर दृढ विश्वास ठेवल्याने त्याच्या आयुष्याचे सोने झाले. इथे एवढे करून त्याचा प्राण काही वाचू शकला नाही असा विचार आपल्या मनात आला तर आपली अजून नामावर दृढ श्रद्धा नाही हेच ध्वनित होईल. ज्याची श्रद्धा आहे त्यालाच या अशा नामात साधलेल्या अंताचे महत्त्व कळून नामावर विश्वास दृढ होईल.

 

ज्याचा नामावर विश्वास दृढ झाला, त्याची देहबुद्धी स्वाभाविकच क्षीण होऊ लागते, कारण त्याने सर्व उपाधी – विरहित अशा नामाचा आश्रय घेतला. त्यामुळे देह – मन व इतर सांसारिक उपाधींना त्यागण्याची जरूर न भासता त्या उपाधीच नाम साधकास सोडून जातात हे गुरुकृपेने प्रत्ययास येते. हे होण्यासाठी नामाने काय साधायचे आहे याचे भान आजचे वचन आपल्याला देते. भगवंत – प्राप्ती / अखंड आनंद – प्राप्ती / अखंड शांती / अखंड समाधान (सर्व समानार्थी आहेत) साधायचे आहे, हे ध्येय प्रथम निश्चित होणे जरूर आहे. पूज्य बाबा बेलसरे नेहमी सांगत, ध्येय निश्चितीला परमार्थात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. आमचे ध्येय आहे मुंबईला जाण्याचे आणि आम्ही गाडीत बसलो चेन्नईला जाणाऱ्या तर आम्ही मुंबईस कधीच पोचणार नाही. हे जसे खरे, तसे जर आमचे ध्येय आहे प्रापंचिक सुख-समाधानाच्या गोष्टी मिळवण्याचे तर आम्ही त्या परमार्थाच्या अंतिम ध्येयाप्रत कधीच पोहोचणार नाही हे अगदी साहजिक नाही का? आणि हे ध्येय निश्चित करण्याचे स्वातंत्र्य भगवंताने मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येकास बहाल केले आहे. त्याचा सुयोग्य वापर करणाऱ्यास स्वाभाविकच त्या निश्चल निष्ठेची ओढ लागते. खरोखर, नामाच्या निष्ठेच्याही अगोदर तशी निष्ठा जडावी ही ओढ लागली की मग सद्गरु कृपेचा वर्षाव अनुभवास येतो.

 

अशा दृढ वृत्तीने जो नामास वरतो व आपल्या लौकिक आशा – आकांक्षांचे क्षुद्र स्वरूप समजून घेऊन त्यांची तिलांजली त्या नाम – दीपात देतो, त्याने जपलेले नामच मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र असते म्हणताहेत इथे महाराज. म्हणजे, नाम हे नित्यच मंगल आणि पवित्र आहे; परंतु जो जीव असा निष्काम प्रेम भावनेने नाम जपतो, तो त्या नामाच्या निज-स्वरूपासारखा मंगल आणि पावित्र्याचे धाम बनतो! आणि मग जसे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात निडरपणे म्हणतात तसे म्हणू शकतो,

“काळाचेही काळ| आम्ही विठोबाचे लडिवाळ||

करू सत्ता सर्वांठायी| वसो निकट वास पायी||

ऐसी कोणाची वैखरी| वदे आमुचे समोरी||

तुका म्हणे बाण| हाती हरिनाम तीक्ष्ण||”

 

|| श्रीनाम समर्थ ||

3 comments:

  1. श्रीराम! अहाहा... श्रीमहाराजांनी केलेला हितोपदेश साचभावे वर्तवला आहे. विशुद्ध हेतू आणि निर्भेळ श्रद्धा खूप छान अधोरेखित केली आहे. बऱ्याच दिवसानंतर सात्विक आणि कल्याणकारी चिंतन वाचायला मिळाले आहे. मनन आणि आचरणाचा प्रामाणिक प्रयत्न करू. खुप खुप आभार. श्रीराम समर्थ!!!🙏🌿🙏

    ReplyDelete